आज श्रावण पौर्णिमा अर्थात, संस्कृत दिवस. याच दिवशी आपण रक्षाबंधनही साजरे करतो. त्यानिमित्ताने पुरातन संस्कृत साहित्याचा विचार केल्यास, विशेषतः पुराणांमध्ये रक्षासूत्र आणि रक्षाबंधनाचाही उल्लेख आढळतो. परंतु, रक्षाबंधनाची तत्कालीन संकल्पना ही फक्त भावा-बहिणीपुरती मर्यादित नसून, पती-पत्नी, राजा-प्रजा, देव-भक्तांपर्यंत अशी व्यापक होती. भगवान विष्णूने पृथ्वीरक्षणासाठी घेतलेले दहा अवतार हेही रक्षणाचेच प्रतीक. पैकी कूर्मावतारावेळी केलेल्या समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या १४ रत्नांनादेखील एकामेकांचे ‘सहोदर’ अर्थात, बहीण-भाऊच मानले जाते. त्या रत्नांची आज रक्षाबंधनानिमित्ताने ही कथा...
आज श्रावण पौर्णिमा, अर्थात रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे रक्षेचे बंधन; मग नाते बहीण-भावाचे असो किंवा अन्य कोणते. प्रजेचे रक्षण करणार्या राजाला पूर्वी राखी बांधत असत. आजही आपण सैनिकांना राखी बांधतो. पण, केवळ दुर्बलाने सबलाला राखी बांधणे, अशाही चौकटीत या रक्षाबंधनाला बंदिस्त करता येत नाही. अगदी युद्धावर जाणार्या पतीला पत्नी राखी बांधत असे.
समुद्रमंथनावेळी इंद्राची पत्नी इंद्राणीनेदेखील इंद्राला रक्षासूत्र बांधल्याचे उल्लेख ‘भविष्यपुराणा’च्या ‘उत्तर पर्वा’त मिळतात. या रक्षाबंधनाचा अर्थ, ‘तू माझे रक्षण कर’ असा नसून, ‘राखी बांधल्यावर देव तुझे रक्षण करेल,’ असा असावा. तसेच, ‘या राखीच्या रूपाने मी तुझ्या सोबत आहे,’ असा आधारही पत्नी पतीला देत असावी. ‘रक्षासूत्र’ हा आधार होता, त्याला श्रद्धेची बांधणी होती.
याच श्रद्धेने एक भक्त भगवंताला, बहुतकरून कृष्णाला राखी बांधतो. भगवान विष्णूंनी तर संपूर्ण पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी पेलत, ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्| धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥’ असे ‘भगवद्गीते’त म्हटलेच आहे. देव आणि असुर यांनी केलेल्या समुद्रमंथनावेळी कूर्म अवतार धारण करत रक्षणाला धावून आलेल्या श्रीविष्णूंची आणि त्यातून उत्पन्न झालेल्या १४ बहीण-भावांची माहिती सांगणारी आजच्या रक्षाबंधनानिमित्त ही कथा...
देवांचा राजा इंद्राकडून दुर्वास ऋषींचा अपमान झाला आणि त्यांनी इंद्राला त्याचे सर्व वैभव, राज्यलक्ष्मी नष्ट होण्याचा शाप दिला. त्यानुसार, तिन्ही लोकांतील सर्व जीवमात्र मृत्यू पावू लागले; सर्वत्र अराजक माजले, असुरांचा वावर वाढला. हे पाहता, इंद्रासह अन्य देवगणांनी सृष्टीचे रक्षणकर्ते भगवान विष्णूंकडे धाव घेतली.
‘विष्णुपुराणा’त म्हटले आहे, भगवान विष्णूनेही सर्व देवगणांची विनंती स्वीकारत त्यांना अभय दिले. ते म्हणाले की, "तुमचा उत्कर्षकाल येईपर्यंत त्या दैत्यांबरोबर सख्य करावे. सध्या काळाने अनुग्रह त्यांच्यावर केला आहे. देवांनो, एखादे कार्य करण्यासाठी प्रसंगी शत्रूबरोबरही मैत्री करावी लागते. ती तुम्ही करा. जे प्राशन करताच, मृत्यूने ग्रासलेला प्राणीही अमर होईल, असे ‘अमृत’ उत्पन्न होण्यासाठी तुम्ही त्यांच्या मदतीने प्रयत्न करावा. देवांनो, प्रथम तुम्ही आता क्षीरसागरात वेली, गवत, लता, औषधी टाका व मंदार पर्वताची रवी करून, वासुकीचा दोर करून समुद्राचे मंथन करा. या कामी दैत्यच लेश भोगतील व तुम्हाला त्यातून शुभ फल मिळेल, याची मी काळजी वाहीन. हे कार्य सफल होईपर्यंत ते असुर जे जे म्हणतील, त्याला अनुमोदन द्या. साम मार्गाने कामे होतात; क्रोधाने होत नाहीत.”
त्याबरोबरच स्वतः विष्णूनेच वासुकी नागाला समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतापैकी काही वाटा देण्याचे आश्वासन देत, त्याला दोर म्हणून भूमिका बजावण्यास तयार केले.
विष्णूच्या वरदहस्ताने सर्व देवगण आश्वस्त झाले आणि ते क्षीरसागराच्या मंथनास सज्ज झाले. प्रथमतः देवगण वासुकीच्या मुखाच्या बाजूला थांबले. पण, शेपटीच्या बाजूला थांबावे लागल्याने असुरगण अपमानित झाले आणि त्यांनी मुखाच्या बाजूला राहण्याची मागणी केली. देवगणांनी ती मान्य करून स्वतः शेपटाकडची बाजू स्वीकारली.
मंथनास प्रारंभ तर केला; पण पर्वत पाण्यावर कसा तरंगेल? तो बुडणारच ना! अगदी तसेच झाले. सर्व देव पुन्हा विष्णूकडे गेले आणि त्यांना काहीतरी उपाय करायची विनंती केली. यावेळीही विष्णूंनी त्यांच्या रक्षणासाठी धावून येत महाकाय ‘कूर्म’ अवतार घेतला. मंदार पर्वताच्या खाली थांबून श्रीविष्णूंनी आपल्या पाठीवर पर्वत तोलून धरला आणि देव-दैत्यांना मंथन करायला सांगितले. कूर्माला पाठीला खाजवल्यासारखे वाटत होते.
मंथन आणखी जोरात सुरू झाल्यावर समुद्रातील सुसर, कासवे, सर्प इत्यादी जीव घाबरून क्षीरसागराबाहेर आले. वासुकीच्या नेत्रांतून, मुखातून येणार्या आग, धूर आणि उष्म उच्छ्वासांमुळे असुरांचे मुख धूम्रवर्णीय झाले आणि त्यांचे तेज नष्ट झाले. भगवंताच्याच आज्ञेने मेघांनी वृष्टी करून ते पूर्वव्रत केले.
खूप मंथन करूनही समुद्रातून अमृत काही बाहेर येईना. तेव्हा स्वतः विष्णूंनी हातभार लावला. त्यासरशी त्यातून ‘हलाहला’पाठोपाठ एकेक करून १४ रत्ने प्राप्त झाली आणि शेवटी १४वे रत्न म्हणून अमृताची प्राप्ती झाली.
१. हलाहल : हलाहल विषामुळे देव आणि दैत्य दोहोंनाही तीव्र ताप होऊ लागला. ते मिळून शिवांना शरण गेले आणि त्यांना जीव वाचवण्याची आर्त विनवणी केली. त्यांनी तत्परतेने ते सर्व हलाहल ओंजळीत घेऊन प्राशन केले. त्या तीव्र विषाने त्यांचा कंठ निळा पडला, ज्यामुळे त्यांना ‘नीलकंठ’ असे नामही प्राप्त झाले. ओंजळीतून सांडलेले विषाचे काही थेंब पुढे आजूबाजूच्या साप, विंचू आणि इतर काही वनस्पतींनी ग्रहण केले.
२. कामधेनु : हलाहल विषानंतर कामधेनु गाय प्राप्त झाली. ‘भागवत पुराणा’त सांगितल्याप्रमाणे, ती ब्रह्मलोकापर्यंत पोहोचवणार्या यज्ञासाठी आवश्यक घृतादि पदार्थ देणारी होती. त्यामुळे हविर्द्रव्य मिळवण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. ही गाय सर्व मनोवांछित-मनोकामना पूर्ण करणारी होती; म्हणून तिचे नाव ‘कामधेनु’ पडले.
३. उच्चैःश्रवा : कामधेनुच्या नंतर ‘उच्चैःश्रवा’ नावाचा पांढरा शुभ्र घोडा क्षीरसागरातून बाहेर आला. ‘भागवत पुराणा’नुसार, तो इंद्राला हवा होता; पण तो दैत्यराज बळीने घेतला. काही ठिकाणी असाही उल्लेख मिळतो की, त्याला सात तोंडे होती. त्याची कीर्ती इतया शीघ्रगतीने सर्वश्रुत झाली की, त्याला ‘उच्चैःश्रवा’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
४. ऐरावत : उच्चैःश्रवा मिळवण्याची अतृप्त इच्छा इंद्राने या ‘ऐरावत’ नामक हत्तीच्या रूपाने पूर्ण केली. तो स्वतः तर शुभ्र वर्णाचा होताच; पण त्याचे शिखरासारखे चार दात तर कैलासापेक्षाही शुभ्र होते.
५. कौस्तुभ : ऐरावतानंतर ‘कौस्तुभ’ नावाचा पद्मरागमणि क्षीरसागरातून बाहेर आला. त्याला विष्णूने गळ्यात धारण करून आपल्या हृदयाजवळ स्थान दिले. ‘भारतीय संस्कृती कोशा’नुसार तो लाल कमळासारखा कांतिमय होता.
६. पारिजात : कौस्तुभ मण्यानंतर आणखी मंथन केल्यानंतर क्षीरसागरातून पारिजात वृक्ष उत्पन्न झाला. तो देवराज इंद्राने आपल्या नंदनवनात नेला. त्याला स्वर्गलोकीचे भूषण मानले जाते. हा कल्पवृक्ष याचकांना सर्व कल्पित वस्तू मिळवून देत असे, अशी तिन्ही लोकांत त्याची ख्याती आहे.
७. अप्सरा : ‘भागवत पुराणा’नुसार त्यानंतर अलौकिक सौंदर्यवती, नर्तकी अप्सरा प्राप्त झाल्या. रम्भा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, घृताची यांसह सर्व अप्सरा सुंदर वस्त्रधारी आणि गळ्यात सोन्याचा हार धारण केलेल्या होत्या. त्यांच्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी आणि मोहक चालीने देवगण आकर्षित झाले.
८. चंद्रमा : ‘विष्णू पुराणा’नुसार अप्सरांनंतर क्षीरसागरातून चंद्रमा उत्पन्न झाला. त्याला महादेवांनी आपल्या शिरावर धारण केले. त्यावरूनच त्यांना ‘चंद्रशेखर’ असेही ओळखले जाऊ लागले.
९. लक्ष्मी : आतापर्यंत मिळालेल्या बहुतेक गोष्टी देवांनाच मिळाल्या असल्यामुळे दैत्यगण नाराज झाले होते. त्यामुळे आता आलेल्या लक्ष्मीदेवीची ते इच्छा करत होते. फक्त असुरांनाच काय, तर देव आणि मनुष्यांनाही हवीशी वाटावी, असेच तिचे रूप होते. ती प्रगट होताच, विजेप्रमाणे चमकणार्या तिच्या तेजाने सर्व दिशांना झगमगाट पसरला. तिचे सौंदर्य, तारुण्य, रूप-रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. श्रेष्ठ नद्यांचे पाणी भरलेल्या सुवर्णकलशाने तिला अभिषेक केला गेला; फुले-फळे, मृदंग-डमरू-ढोल-नगारे, गान-नर्तन, वस्त्र-दागिने अशा सर्वांनी तिचे स्वागत केले गेले. ‘विष्णू पुराणा’नुसार देवांनी लक्ष्मीचे स्तुतिगान करताना ‘श्रीसूक्त’देखील म्हटले. हातात कमळांची माळा घेऊन सलज्ज नेत्रांनी नूपुरांच्या झंकारासह येणारी लक्ष्मी अवर्णनीय सुंदर दिसत होती. ती एका निर्दोष, सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या शोधात होती. तिने सर्व सद्गुण नित्य वास करणार्या भगवंतांनाच पती म्हणून स्वीकारले आणि ताज्या कमळांची माळ त्यांच्या गळ्यात घातली. त्यापुढेही विष्णूच्या सर्व जन्मांवेळी त्यांच्यासह उपस्थित राहण्याचे तिने वचन दिले. भगवंतांनीही तिला आपल्या वक्षस्थळी स्थान दिले. सर्वत्र पुष्पवर्षाव, शंख-तुतारीवादन, स्तुतिमय मंत्रोच्चार घुमू लागले.
१०. पाञ्चजन्य : लक्ष्मीसोबतच एक दिव्य पाञ्चजन्य शंखसुद्धा क्षीरसागरातून उत्पन्न झाला. त्यालाही विष्णूनेच स्वीकारले. ‘महाभारत’ युद्धावेळी हाच पाञ्चजन्य शंख कृष्णाकडे असल्याचे आपल्याला वाचायला मिळते.
११. शारङ्ग : त्यापाठोपाठ क्षीरसागरातून ‘शारङ्ग’ नावाचे धनुष्य बाहेर आले. त्याचाही स्वीकार श्रीविष्णूनेच केला. त्यामुळे विष्णूला ‘शारङ्गधर’ असे नाव पडले आणि हरीने धारण केल्यामुळे धनुष्याला ‘हरिधनु’ म्हटले गेले.
१२. वारुणी : लक्ष्मीनंतर क्षीरसागरातून कमलनयना कन्येच्या रूपात वारुणीदेवी, अर्थात सुरा उत्पन्न झाली. लक्ष्मीसुद्धा दैत्यगणांना न मिळाल्यामुळे त्यांनी भगवंताकडे वारुणीदेवीची मागणी केली आणि त्यांच्या अनुमतीने वारुणीदेवीचा असुरांनी स्वीकार केला.
१३. धन्वंतरी : आणखी मंथन केल्यानंतर अखेर अमृत बाहेर आले. पण, ते घेऊन येणारी व्यक्तीही मोठी अलौकिक होती. सावळा रंग, भुरभुरणारे कुरळे केस, डोळ्यांत लालिमा, शंखासारखा कंठ, पुष्ट लांब बाहू असा ‘भागवत पुराणा’नुसार पितांबरधारी आणि ‘विष्णू पुराणा’नुसार श्वेतवस्त्रधारी धन्वंतरी स्वतः विष्णूंचाच अंशावतार होता. त्याच्या हातात अमृताचा कलश तर होताच; पण तो स्वतःही आयुर्वेदाचा प्रवर्तक होता. आज आपण जे धन्वंतरीचे ‘आयुर्वेदशास्त्र’ शिकतो, त्याचे मूळ हाच दिव्य पुरुष आहे.
१४. अमृत : अथक परिश्रमांनंतर अखेर धन्वंतरीच्या हस्ते अमृतकलश समुद्रातून बाहेर आला. त्यातील अमृत पिऊन सर्वांनाच अमर व्हायचे होते. कलश पाहताच, असुरांनी तो हिसकावून घेतला. आतापर्यंत घेतलेले एवढे कष्ट वाया जाणार, या भीतीने देवगण भगवंताला शरण गेले. विष्णूंनी आशीर्वाद देताच, असुरगणांत अमृत पिण्यासाठी चढाओढ सुरू झाली. तेव्हा भगवंतांनी स्वतःच एका मोहक स्त्रीचे रूप घेऊन असुरगणांना ‘मोहिनी’ घातली आणि मोठ्या खुबीने ते अमृत देवगणांना मिळवून दिले.
१४ रत्नांमधील बंधुभाव
तिन्ही लोकांच्या कल्याणासाठी केले गेलेले हे मंथन शेवटी अमृत आणि विशेषतः लक्ष्मीच्या आगमनाने सफल झाले. परंतु, पुराणकथेत बहीण-भावांच्या नात्याचा आणखी एक वेगळा संदर्भ मिळतो. लक्ष्मीच्या सोबत आलेली ही सर्व रत्नेही तिची भावंडेच मानली जातात. ‘चाणयनीति’मध्ये ‘पिता रत्नाकरो यस्य लक्ष्मी यस्य सहोदरा’ असे म्हणत शंखाचा उल्लेख केलेला आहे. अर्थात, ‘ज्याचे पिता रत्नाकर आहेत आणि लक्ष्मी ज्याची सहोदर आहे,’ असे शंखाचे वर्णन केले आहे. ‘शुकनासोपदेशा’नुसार, अशा ‘सह-उदर’ म्हणजे, एकाच उदरातून-समुद्रातून प्रगट झालेल्या आपल्या भावडांकडून लक्ष्मीनेही एकेक गुण घेतला आहे. तिने पारिजाताकडून लालिमा, चंद्राकडून कुटिलता, घोड्याकडून चंचलता, विषाकडून वशीकरण शक्ती, सुरेकडून मादकता, कौस्तुभाकडून कठोरता इत्यादी गुणांचा अंगीकार केला आहे. या सर्व सहोदर रत्नांची नावे प्रतिदिन स्मरण केल्याने आपले सदैव मंगल होते, अशी पुराण अभ्यासकांची धारणा आहे. पैकी लक्ष्मीचेच नाव अग्रक्रमाने घेत पुढे इतर सर्व रत्नांची नावे घेतली जातात.
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः|
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः
शङ्खोऽमृतं चाम्बुधे|
रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं
कुर्यात् सदा मङ्गलम्॥
- ओवी लेले