मुंबई (अभिनंदन परुळेकर) : Kailash Mansarovar Pilgrims Safe Journey नेपाळ - तिबेटमधील आक्स्मीत आलेल्या जलप्रलयाच्या संकटात राज्यातील अनेक नागरिक अडकले होते. कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले होते. त्यात १७ पुरूष आणि २० स्त्रीयांचा समावेश आहे. याची तातडीने दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी सागा येथे पर्यटक,भाविक अडकल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले. त्यांचे काठमांडू येथून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे अत्यंत आवश्यक होते. (Kailash Mansarovar Pilgrims Safe Journey)
ही माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने पत्रव्यवहार व समन्वय साधण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही तत्परतेने आवश्यक मदत व सहकार्य केले.
या सर्व प्रयत्नांना यश आले असून सर्व ३७ भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार व्यक्त केले आहेत. (Kailash Mansarovar Pilgrims Safe Journey)