मुंबई (Dattatreya Hosabale Social Harmony) : स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तीन संकल्पना जगातील अनेक राष्ट्रांनी वेगवेगळ्या स्वरूपात स्वीकारल्या आहेत. ज्या देशांनी केवळ स्वातंत्र्याला महत्त्व दिले, तेथे स्वैराचार वाढला. तर सोव्हिएत रशियासारख्या देशांनी समानतेला प्राधान्य दिले, मात्र तो विचारही टिकू शकला नाही. भारतीय संस्कृतीने स्वातंत्र्य आणि समानतेसोबत बंधुत्वाची जोड दिली असून या तिन्ही मूल्यांचा पाया सामाजिक समरसतेत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. काशीच्या तिलक नगर येथे आयोजित रक्षाबंधन उत्सवात ते बोलत होते.
उपस्थित स्वयंसेवक आणि मातृशक्तीला संबोधित करताना ते म्हणाले, आपली एकता आणि एकात्मता ही विश्वबंधुत्वाच्या संरक्षण व संवर्धनाचा मूलाधार आहे. न्याय्य मार्गावर चालत बंधुत्वाला आधार मानून स्वातंत्र्य आणि समानतेचे रक्षण करण्यासाठी भारताने सामाजिक समरसतेचा स्वीकार केला आहे. योगवसिष्ठमधील एका श्लोकाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, जे सुरुवातीला आपले बंधू नसतात, त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवल्याने आपुलकी वाढते आणि ते आपले बंधू बनतात. परंतु हा सहवास तुटल्यास बंधुत्वाचे प्रेमबंधनही सैल होते. संघातही अपरिचिताला परिचित आणि परिचिताला मित्र बनविण्याची परंपरा आहे. (Dattatreya Hosabale Social Harmony)
ते पुढे म्हणाले की, हिंदू संस्कृती संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानते. "मी आणि सर्व जीव एकाच परमात्म्याचे अंश आहोत," ही भावना उदार अंतःकरणाने स्वीकारली पाहिजे. नातेसंबंधांमध्ये अविश्वास निर्माण झाला की रक्षाबंधनाचे स्नेहसूत्र कमकुवत होते. आपण परस्परांत विभागलो तर त्याचा फायदा विरोधकांना होतो. (Dattatreya Hosabale Social Harmony)
यावेळी त्यांनी भविष्यपुराणातील प्रसिद्ध श्लोक उद्धृत केला. "येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामभिबन्धामि रक्षे मा चल मा चल॥" या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, ज्या प्रकारे महाबली राजा बलीला स्नेहबंधनात बांधले गेले, त्याचप्रमाणे मीही तुम्हाला स्नेहाच्या बंधनात बांधतो. हे बंधन सदैव दृढ राहो. आज कुटुंब आणि समाजात निर्माण झालेल्या अस्थिरतेमागे स्वार्थ हे प्रमुख कारण असून स्वार्थ हा माणसाच्या स्वभावातील विकार बनू नये, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, काशी मध्यचे संघचालक डॉ. हेमंत गुप्ता आणि तिलक नगरचे नगर संघचालक प्रदीप यांनी भगव्या ध्वजाला रक्षासूत्र बांधून उत्सवाची सुरुवात केली. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भीषण पुरात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी संपूर्ण संघ परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या आपत्तीत संकटग्रस्त झालेल्या सर्व बांधवांप्रती संघ परिवाराच्या वतीने सखोल संवेदना व्यक्त करत, शक्य ती सर्व मदत करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Dattatreya Hosabale Social Harmony)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक