स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे अध्यक्ष ए. बालकृष्णन यांचे निधन

    27-Aug-2026   
A. Balakrishnan Passed Away
 
मुंबई : (A. Balakrishnan Passed Away) स्वामी विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष ए. बालकृष्णन यांचे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.०५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. भारतीय वायुसेनेत काही काळ सेवा बजावल्यानंतर बालकृष्ण १९७३ मध्ये विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या पहिल्या तुकडीत सहभागी झाले. एकनाथ रानडे यांच्या प्रेरणेने त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशात कार्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या काळात १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या परिणामातून अरुणाचल प्रदेश सावरत होता. दि. ३ मे १९३८ रोजी केरळमध्ये जन्मलेल्या बालकृष्ण यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा आणि समाजकार्यासाठी समर्पित केले होते.(A. Balakrishnan Passed Away)
 
अरुणाचल प्रदेशात त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात ज्ञानाचा प्रसार करण्याचे काम केले. विवेकानंद केंद्राच्या 'मानव निर्माण आणि राष्ट्र निर्माण' या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अरुणाचल प्रदेश सरकारने २०१४ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राज्य पुरस्काराने सन्मानित केले होते. एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राला 'जीवंत स्मारक' बनविण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बालकृष्ण यांनी स्वतःला वाहून घेतले होते. स्वामी विवेकानंद यांचा विश्वबंधुत्व आणि सहिष्णुतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच राष्ट्र आणि समाजसेवेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. (A. Balakrishnan Passed Away)
 
बालकृष्णन यांनी आपले पाच दशकांहून अधिक आयुष्य स्वामी विवेकानंदांचे विचार आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. विवेकानंद केंद्राच्या सुरुवातीच्या 'जीवनव्रतीं'पैकी एक म्हणून त्यांनी देशभरात अथक परिश्रम घेतले. ईशान्य भारताशी त्यांचा विशेष आणि घनिष्ठ संबंध होता. शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विवेकानंद केंद्राचा संपूर्ण परिवार आणि त्यांच्या चाहत्यांप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. ॐ शांती.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान (A. Balakrishnan Passed Away)
 
बालकृष्णन हे कर्मयोगाचे साक्षात प्रतीक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन स्वामी विवेकानंद यांच्या विश्वबंधुत्व आणि मानवसेवेच्या संदेशाच्या प्रसारासाठी तसेच राष्ट्र आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे साधे जीवन, निःस्वार्थ सेवा, त्याग आणि हिंदुत्वाविषयीची अढळ निष्ठा ही सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. बालकृष्णन हे स्वामी विवेकानंदांचे कार्य पुढे नेण्यासाठी कन्याकुमारीस्थित विवेकानंद केंद्राच्या आजीवन समर्पित जीवनव्रती दलातील पहिल्या पिढीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने समाजाने एक महान आत्मा गमावला आहे. त्यांच्या पुण्यात्म्यास परमगती आणि मोक्ष प्राप्त होवो हीच प्रार्थना.
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (A. Balakrishnan Passed Away)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर