देशपांडेंचा उत्सवी मुखभंग

    27-Aug-2026
 
Sandeep Deshpande Ganeshotsav Controversy
 
गणपतीत आता गरबा बघायचा का?” असा ‘लालबागच्या राजा’ मंडळाला उफराटा सवाल करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा ‘मराठी विरुद्ध गुजराती’ वादाला वेगळा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, मुळात गेल्या दोनएक वर्षांपासूनच अंबानींचे ‘लालबागच्या राजा’ला प्रायोजकत्व होते. मग देशपांडेंनी ही टीका यंदाच का केली? तर त्याचे कारण म्हणजे ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ या मुंबईतील तितक्याच सुप्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाला अदानी कंपनीचे लाभलेले प्रायोजकत्व! याला थेट प्रांतवाद, भांडवलवादाची फोडणी देत देशपांडेंनी शुभकार्यात विघ्नसंतोषीपणाच केला.
 
एकीकडे अशा गोष्टींवर टीका करायची आणि दुसरीकडे आपल्याच पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी तेच अदानी भेटीस जातात, अंबानी कुटुंबीयांशी ठाकरे कुटुंबीय उत्तम संवाद ठेवतात, तेव्हा चुप्पी साधायची, असा हा सगळा दुटप्पीपणा! पण, देशपांडेंनी उत्तर द्यावे की, फक्त ‘स्पॉन्सरशिप’ घेतली, जाहिराती लावल्या म्हणजे मराठी माणसाचे सण गुजराती कंपन्यांच्या हातात कसे जातील? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीदेखील राज ठाकरेंनी अदानी कंपनीवर आरोप केले. पण, निवडणुकीनंतर त्या आरोपांचे पुढे काय झाले? तेही देशपांडेंनी जरा साहेबांना विचारण्याची तसदी घ्यावी. गणेशोत्सवात मंडळांतर्फे विविध कंपन्यांच्या आणि राजकीय पक्षांच्याही स्वागत कमानी उभ्या राहिलेल्या दिसतात. त्यातून या मंडळांच्या उत्सवी खर्चाचा बराचसा भारही हलका होतो. शिवाय या निधीचा समाजोपयोगी कार्यांसाठीही मोठ्या प्रमाणात विनियोग केला जातो. पण, म्हणून मराठी सण त्या पक्षांना, कंपन्यांनाच आंदण दिले असे नाही. म्हणजे, गणेशोत्सवात बॅनरबाजी करून राजकीय प्रसिद्धी मिळवली तर ते क्षम्य; पण त्याच मंडळांनी उद्योजकांचे प्रायोजकत्व घेतले, तर ते मात्र ‘कॉर्पोरेट वॉर’ म्हणणे ही भूमिकाही दुर्दैवीच! दहीहंडी, दसरा, स्थानिक यात्रांमध्येही विविध स्पर्धांच्या माध्यमांतून उद्योजकांचे प्रायोजकत्व लाभते. त्यात गैर काहीच नाही. पण आता एवढी टीका-टिप्पणी करुनही संदीप देशपांडे ‘लालबागचा राजा’, ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’समोर नतमस्तक होतीलच की! बाप्पा त्यांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना!

‘भेटी’गाठी ‘गोकुळ’साठी!
 
गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून, दूध संस्था ठरावधारकांच्या ‘भेटी’गाठी घेण्यासाठी सर्वच पक्षांची नेतेमंडळी अख्खा जिल्हा पिंजून काढत आहेत. यातच आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी चक्क भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरू रंगली. ‘हा प्रचाराचा भाग असतो आणि भेटीगाठी होत असतात,’ असा खुलासा जरी निंबाळकर यांनी केला असला, तरी ‘गोकुळ’मध्ये भाजप-महायुती विरुद्ध काँग्रेस-समविचारी आघाडी अशी थेट लढत. त्यामुळे या परस्परविरोधी आघाडीच्या नेत्यांच्या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनीदेखील राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली होती. तसेच ‘सहकारात सर्वांनी एकत्र आले पाहिजे,’ असे वक्तव्य महाडिक यांनी केले. ‘गोकुळ’च्या पुणे परिसरातील किकवी येथील प्लांट खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचेसुद्धा त्यांनी म्हटले होते. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप रंगले. ‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध करून त्याबदल्यात सतेज पाटील यांना पुन्हा विधान परिषद आमदारकीच्या प्रस्तावाच्या चर्चापण मध्यंतरी रंगल्या. पण, त्या फक्त हवेतीलच चर्चा ठरल्या. कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले महाडिक कुटुंब आणि सतेज पाटील यांच्यातील विविध कारणाने वाढती गाठभेटदेखील सध्या चर्चेची ठरत आहे, तर दुसरीकडे महायुतीतीलच मुश्रीफ गट आणि महाडिक गटात ‘गोकुळ’वरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे. सहकारक्षेत्रातील राजकारण आणि पक्षीय राजकारण हे पूर्णतः वेगळे असते, असेसुद्धा बोलले जाते. सध्या कोण कुणाला भेटते, याचसोबत ठराव कुणाकडे वळतात आणि ‘ठराव-मूल्य’ कितीपर्यंत जाणार यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. याची सर्वच नेत्यांना कल्पना आहे. यापूर्वी, ‘गोकुळ’ निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सग्यासोयर्‍यांना विविध ठिकाणी कायमची नोकरी लावून घेऊन वा अन्य लाभाद्वारे अनेक ठरावधारकांनी ठराव-‘मूल्य’ सिद्ध केले आहे. या अशा मूल्यधारक बाबी मात्र नंतरच समजतात.
 
- अभिनंदन परुळेकर  




संबंधित मजकूर