मुंबई -(Rakshabandhan )भांडणं, मस्ती, एकमेकांची खेचणं आणि गरजेच्या वेळी खंबीर साथ… भाऊ-बहीणीचं नातंच असं खास असतं! कधी खट्याळ, कधी हळवं, तर कधी शब्दांपलीकडचं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहीणीच्या या खास नात्याचा उत्सव साजरा होत ‘द्विधा’चित्रपटामधून भाऊ-बहीणीच्या याच नात्यातील प्रेम, आपुलकी आणि भावनिक गुंफण उलगडणार आहे.
‘द्विधा’मध्ये अभिनेता निमिष कुलकर्णी आदित्य तर अभिनेत्री मानसी कुलकर्णी श्रावणीच्या भूमिकेत असून, दोघेही चित्रपटात आत्येभाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बालपणापासून एकत्र वाढलेल्या आदि आणि श्रावणीच्या नात्यातील जिव्हाळा, विश्वास, मस्ती आणि असंख्य गोड आठवणींची सुंदर वीण या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मिश्कील संवाद, मजेशीर नोकझोक आणि हळव्या क्षणांतून हे नातं प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे. विशेष म्हणजे, निमिष आणि मानसी यांनी ऑफस्क्रीनही एकत्र खूप धमाल केली असून, त्यांच्यातील ही सहज, मनमोकळी आणि आपुलकीची केमिस्ट्री पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी हि बहीण भावाची जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. (Rakshabandhan)