मेट्रो मार्गिका '७ अ'च्या उंचीबाबत अंतिम अहवालाची प्रतीक्षा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतिम तांत्रिक अहवालाकडे लक्ष

 
Metro Line 7A Height Issue
 
मुंबई (Metro Line 7A Height Issue) : मेट्रो मार्गिका '७ अ' प्रकल्पातील विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादेचा मुद्दा सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतिम तांत्रिक अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पासाठी सिस्ट्रा-सीईजी-एसएमसीआयपीएल यांची जनरल कन्सल्टंट/इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रकल्पाचे डिझाइन तसेच आवश्यक परवानग्यांचा समन्वय करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.
 
मेट्रो मार्गिका '७ अ' ही गुंदवली (अंधेरी पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यंत जाणारी ३.४ किमी लांबीची मेट्रो मार्गिका आहे, जी एमएमआरडीएद्वारे विकसित केली जात आहे. या कामाअंतर्गत विमानतळ परिसरातील मेट्रो उन्नत मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, २६० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे काम पाडण्याची आणि पुन्हा नव्याने बांधकाम करण्याची नामुष्की एमएमआरडीएवर येण्याची शक्यता आहे. (Metro Line 7A Height Issue)
 
या मेट्रोच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त उंचीचा पुरेसा विचार डिझाइन आणि नियोजनाच्या योग्य टप्प्यावर करण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादेत ओएचइ यंत्रणेसाठी किती अतिरिक्त उंचीची परवानगी मिळू शकते, याबाबत सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. (Metro Line 7A Height Issue)
 
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून या संदर्भातील अंतिम तांत्रिक अहवाल किंवा पुष्टीकरण अद्याप प्राप्त झालेले नाही. किती उंचीची परवानगी देता येईल आणि त्यानुसार मेट्रो मार्गिकेच्या डिझाइनमध्ये किंवा प्रकल्पाच्या नियोजनात कोणते बदल आवश्यक ठरतील, हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमएमआरडीए त्याचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
 
यासंदर्भात मेट्रो प्रकल्पाचे संचालक बसवराज एम. बी. यांनी स्पष्ट केले की, विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादा आणि ओएचइ यंत्रणेची आवश्यकता यांचा तांत्रिक समन्वय साधण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पातील आवश्यक बदलांबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. (Metro Line 7A Height Issue)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर