मुंबई : (JNPA Global Ranking) भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली आहे. अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील आढावा अहवालानुसार, जगातील अव्वल ३० कंटेनर बंदरांच्या क्रमवारीत जेएनपीएने २१वे स्थान मिळवले आहे. २०२५ मध्ये जेएनपीए २८व्या क्रमांकावर होते. त्यामुळे यंदा बंदराने तब्बल सात स्थानांची सुधारणा केली असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत जेएनपीएच्या कामगिरीत १३.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.(JNPA Global Ranking)
जेएनपीएने गेल्या वर्षभरात कार्यक्षमतेवर दिलेला भर, मालाची जलद वाहतूक, जहाज हाताळणीतील सुधारणा आणि बहुविध वाहतूक व्यवस्थेशी (मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी) वाढवलेला समन्वय यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. २०२६च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाले होते.(JNPA Global Ranking)
या काळात जेएनपीएने मालाची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी, अतिरिक्त कार्यात्मक गरजा हाताळण्यासाठी तसेच आयात-निर्यात व्यापाराची सातत्यपूर्णता कायम राखण्यासाठी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना केल्या. प्रतिकूल परिस्थितीतही कार्यक्षम कामकाज सुरू ठेवण्याची आणि व्यापारातील व्यत्ययांना जलद प्रतिसाद देण्याची जेएनपीएची क्षमता यामुळे अधिक अधोरेखित झाली आहे. परिणामी, भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जेएनपीए हे एक विश्वासार्ह प्रवेशद्वार म्हणून अधिक मजबूत झाले आहे.(JNPA Global Ranking)
अल्फालायनर ही लाइनर शिपिंग क्षेत्रातील माहिती आणि व्यावसायिक विश्लेषण पुरविणारी आघाडीची जागतिक संस्था आहे. बंदरांमधून हाताळल्या जाणाऱ्या कंटेनर मालाच्या प्रमाणाच्या आधारे ती कंटेनर बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते. अल्फालायनरच्या ताज्या क्रमवारीमुळे जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. तसेच भारताच्या सागरी व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासातील जेएनपीएच्या वाढत्या योगदानावरही या कामगिरीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. (JNPA Global Ranking)
“जागतिक क्रमवारीत जेएनपीएने २१व्या स्थानावर झेप घेतल्यामध्ये आमच्या टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कामगिरीचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जेएनपीएची विश्वासार्ह आणि प्रभावी माल हाताळणी सेवा देण्याची क्षमता अधिक बळकट झाली आहे. विशेषतः वर्षभरातील जागतिक व्यापारातील व्यत्ययांच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यात या प्रयत्नांचा मोठा फायदा झाला. जेएनपीएला जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांपैकी एक म्हणून आणखी उंचीवर नेण्यासाठी आम्ही या यशाची गती कायम ठेवू.”(JNPA Global Ranking)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.