आदिवासींच्या स्वप्नांना पंख देणारा ‘गणेश’

    27-Aug-2026   
 
Dr. Ganesh Mengal
 
वडिलांचा शिक्षणमंत्र, ‘एसटी’चा रोजचा संघर्ष आणि समाजसेवेच्या ध्यासातून कर्जत तालुक्याला मिळालेले पहिले आदिवासी ‘एमडीएस’ डॉ. गणेश मेंगाळ यांच्याविषयी...
 
शिक्षणाने मोठे व्हावे आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करावे,’ वडिलांनी दिलेला हा मंत्र आयुष्यभर जपणार्‍या डॉ. गणेश मेंगाळ यांनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर कर्जत तालुयातील आदिवासी समाजासाठी इतिहास घडवला. ‘एमडीएस’ अर्थात, ‘मास्टर्स इन डेंटल सर्जरी’ (प्रोस्थोडॉन्टिस आणि इम्प्लांटोलॉजी) ही पदवी मिळवणारे ते कर्जत तालुयातील पहिले ‘एमडीएस’. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे ते कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील या क्षेत्रातील पहिले डॉक्टर ठरले. हा प्रवास सहज नव्हता. आर्थिक मर्यादा, रोजचा प्रदीर्घ प्रवास, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी केलेली नोकरी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, या सर्वांचा संगम म्हणजे डॉ. गणेश मेंगाळ यांची यशोगाथा!
 
डॉ. गणेश मेंगाळ यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील कळंबजवळील भागूची वाडी. हा आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग. मात्र, मुलांनी शिक्षणात पुढे जावे, यासाठी त्यांचे वडील कै. पांडुरंग मेंगाळ यांनी मोठा निर्णय घेतला. प्राथमिक शाळेचे शिक्षक असलेल्या पांडुरंग मेंगाळ यांनी नोकरी आणि मुलांच्या भवितव्यासाठी दहीवली येथील इंदिरानगरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गरीब आदिवासी शेतकरी कुटुंबातून शिक्षणाच्या जोरावर शिक्षक झालेल्या वडिलांनी आपल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. ‘आपल्या क्षेत्रात मोठे व्हा आणि इतरांसाठी आदर्श बना,’ हा त्यांचा कायमचा संदेश होता.
 
डॉ. गणेश यांचे बालपण इंदिरानगरमध्येच गेले. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात कर्जतच्या शिशुमंदिर शाळेत झाली. पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणातून त्यांना मिळालेले संस्कार आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहेत. यानंतर त्यांनी ‘अभिनव’ संस्थेच्या ‘अभिनव ज्ञानमंदिर’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर त्यांच्या समोर तीन मोठे पर्याय होते; कृषी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण. तिन्ही ठिकाणी प्रवेशाची संधी असूनही त्यांनी डॉक्टर होण्याचा मार्ग निवडला. कारण, त्यांना स्वतःसाठी नव्हे; तर आपल्या समाजासाठी काम करायचे होते.
 
वडिलांनी त्यांना एकदा सहज सांगितले होते की, ‘कर्जत तालुक्यात आपल्या समाजातील एकही डॉक्टर नाही.’ हे वाक्य गणेश यांच्या मनात कायमचे कोरले गेले. त्यांनी हेच आपले ध्येय बनवले आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्धार केला. नवी मुंबईतील तेरणा डेंटल कॉलेजमध्ये ‘बीडीएस’साठी प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये वसतिगृहाची सुविधा होती; पण ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नव्हती. मग त्यांनी निवडला संघर्षाचा मार्ग. दररोज सकाळी ५.३० वाजता कर्जतहून ‘एसटी’ बसने पनवेलला जायचे आणि तिथून नेरूळला कॉलेजला जायचे. दिवसभर कॉलेजमध्ये गेला की, संध्याकाळी पुन्हा तोच परतीचा प्रवास. दररोजचा हा अनेक तासांचा प्रवास त्यांनी अखंडपणे सुरू ठेवला आणि त्याच जिद्दीने ‘बीडीएस’चे शिक्षण पूर्ण केले.
 
‘बीडीएस’नंतर त्यांनी अंबरनाथमधील एका दंतचिकित्सा लिनिकमध्ये प्रॅटिस सुरू केली. दिवस कामाचा आणि रात्र अभ्यासाची; असा त्यांचा दिनक्रम. रात्री उशिरापर्यंत, पहाटे उठून त्यांनी ‘एमडीएस’ प्रवेश परीक्षेची तयारी केली. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ‘एमजीएम’ कॉलेजमध्ये ‘एमडीएस’साठी प्रवेश मिळाला. ‘एमडीएस’ करत असतानाही त्यांनी लिनिकमध्ये नोकरी सुरू ठेवली. शिक्षणाचा खर्च स्वतः उचलत त्यांनी अभ्यास आणि काम यांचा समतोल साधला. २०१५ साली त्यांनी ‘मास्टर्स इन डेंटल सर्जरी’ (प्रोस्थोडॉन्टिस आणि इम्प्लांटोलॉजी) ही पदवी यशस्वीरीत्या संपादन केली. या यशासह ते कर्जत तालुयातील पहिले ‘एमडीएस’ ठरले.
 
डॉ. गणेश मेंगाळ यांच्यासाठी डॉक्टर होणे हे अंतिम ध्येय नव्हते. वडिलांनी सुरू केलेल्या आदिवासी समाजाच्या संघटनात्मक कार्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आजही त्यांच्या नेतृत्वाखाली दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सातत्याने आयोजित केला जातो. समाजातील मुलांनी शिक्षणात पुढे जावे, मोठे व्हावे आणि आपल्या समाजाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
 
डॉ. गणेश मेंगाळ यांचा विश्वास आहे की, शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आदिवासी समाजातील अधिकाधिक मुले डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ बनावीत, यासाठी ते प्रेरणादायी भूमिका निभावत आहेत.
 
आज डॉ. गणेश मेंगाळ केवळ यशस्वी दंतचिकित्सक नाहीत; तर वडिलांच्या स्वप्नांना साकार करणारे, आदिवासी समाजासाठी आशेचा किरण ठरलेले आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत. शेकडो आदिवासी मुलांच्या स्वप्नांना दिशा देणारे मार्गदर्शक ठरले आहेत. वडिलांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत त्यांनी विझू दिली नाही. उलट, ती आणखी तेजस्वी करत पुढच्या पिढीच्या हातात दिली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!
 
(अधिक माहितीसाठी संपर्क- ९०२८५४६३२१)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर