श्रावणपूर्णिमारक्षाबन्धनविधिवर्णनम्

    27-Aug-2026
 
 Raksha Bandhan Ritual
 
भारतीय संस्कृती ही सणांची संस्कृती. इथे सण जसे देवांच्या संबंधित आहेत, तसेच ते मानवी नात्यांमधील भावनांना उत्कट करणारेही आहेत. रक्षाबंधन त्यापैकीच एक. मात्र, सांप्रतकालीन रक्षाबंधन आणि परंपरेने चालत आलेल्या रक्षाबंधनाचे स्वरुप यात भिन्नता आढळते. उद्या दि. २८ ऑगस्ट रोजी असलेल्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीमधील भिन्नता आणि ऐक्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
संपूर्ण धरित्रीला हिरवा साज सजवणारा श्रावण, दुथडी भरून वाहाणार्‍या नद्या, आकाशात दाटलेले मेघ आणि निसर्गाच्या या सगळ्या लीलेला चरम बिंदूवर पोहोचवणारी प्रकाशमान पौर्णिमा. श्रावण पौर्णिमा अनेक सणांनी नटली आहे. ब्राह्मण श्रावणी करून पंचगव्य प्राशन करत यज्ञोपवित बदलतात. कोळी बांधव माशांचा विणीचा काळ संपल्याने आणि खवळलेला समुद्र शांत झाल्याने, निर्धास्तपणे समुद्राला श्रीफळ अर्पण करून आपली होडी सागरात लोटून देतात. आधुनिक काळात देशभरात याच दिवशी रक्षाबंधन साजरे होते. या सणाचे मूळ स्वरूप अनेकांना ज्ञात नसल्याने, आज आपण त्यावर प्रकाश टाकणार आहोत. रक्षाबंधनसाठी प्राचीन भारतात एक अधिक चपखल शब्द प्रचलित होता. तो म्हणजे ‘रक्षासूत्र.’ हे रक्षासूत्र मंत्राने संस्कारित, एका जिवाचे कल्याण होण्याच्या हेतूने बांधले जाई. याचा संदर्भ ‘भविष्य पुराणा’च्या उत्तरपर्वातील १३७व्या अध्यायात येतो. अध्यायाच्या समाप्तीवरच त्याचा उल्लेख‘श्रावणपूर्णिमारक्षाबन्धनविधिवर्णनम्’ असा स्पष्ट केला आहे. प्रसंग श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या संवादाचा असून, युधिष्ठिराला या रक्षाविधानाचे स्वरूप श्रीकृष्ण सांगतात,
 
अथातः संप्रवक्ष्यामि बलिरक्षाविधिं नृप|
तं शृण्वेकाग्रमनसा समासाद्गदितं मया॥
 
हे राजन्, आता मी तुला बलिरक्षेचा विधी सांगतो; तो एकाग्र चित्ताने ऐक. ‘एकाग्रमनसा’ हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. भारतीय संस्कृतीत भाव या संकल्पाला अधिक महत्त्व आहे. धागा कोणीही बांधू शकतो; परंतु रक्षासूत्र बांधणे म्हणजे त्या कृतीत मन, मंत्र आणि मंगलसंकल्प एकत्र येणे. या विधानाच्या पाठीमागे देवासुर संग्रामाची कथा येते. देव आणि दानव यांच्या संघर्षात, इंद्राच्या रक्षणाशी शची अर्थात इंद्राणीने सिद्ध केलेली रक्षा जोडली जाते. पुढे तिच्या प्रभावाचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात,
 
एष प्रभावो रक्षायाः कथितस्ते युधिष्ठिर|
जयदः सुखदश्चैव पुत्रारोग्यधनप्रदः॥
 
अर्थात, हे युधिष्ठिरा, रक्षेचा हा प्रभाव तुला सांगितला. ती विजय देणारी, सुख देणारी, संतती, आरोग्य आणि धन प्रदान करणारी आहे. जय, सुख, आरोग्य, संपन्नता ही भारतीय जीवनाच्या पूर्णत्वाची प्रतीके आहेत. एखाद्याच्या हातावर रक्षासूत्र बांधताना आपण केवळ शरीराचे संरक्षण मागत नाही; त्याच्या जीवनाचे मंगल व्हावे, अशी प्रार्थना करतो.
 
आज रक्षाबंधन म्हटले की, बहिणीचे रक्षण करणार्‍या भावाची प्रतिमा नजरेसमोर येते. पण या कथेत शची स्वतः स्त्री असून, ती इंद्राच्या रक्षणासाठी मंगलविधानाशी जोडलेली आहे. स्त्री येथे आपल्या प्रिय व्यक्तीसाठी, रक्षासंकल्प करणारी शक्ती म्हणून उभी राहते. रक्षेची मूळ कल्पना बलवानाने दुर्बलाचे रक्षण करावे, एवढी संकुचित नव्हती. आपल्या माणसाचे मांगल्यासाठी प्रार्थना करण्याचा अधिकार आणि सामर्थ्य प्रत्येक नात्याला होते. रक्षेचा महिमा ऐकल्यावर धर्मराजाचा पुढचा प्रश्न स्वाभाविक आहे,

क्रियते केन विधिना रक्षाबन्धः सुरोत्तम|
कस्यां तिथौ कदा देव एतन्मे वक्तुमर्हसि॥
 
हे देवश्रेष्ठ, हे रक्षाबंधन कोणत्या विधीने करावे? कोणत्या तिथीला, कोणत्या वेळी करावे, ते मला सांगा. यानंतर श्रीकृष्ण श्रावण पौर्णिमेचा विधी सांगतात. सकाळी स्नान, देव-पितृ-ऋषींचे तर्पण आणि उपाकर्म झाल्यानंतर, अपरान्हकाळी रक्षेची तयारी करावी. रक्षासूत्र आजच्यासारखी सजावटीची राखी नव्हती. अक्षत, सिद्धार्थ अर्थात श्वेत मोहरी, सुवर्ण इत्यादी मंगलद्रव्ये स्वच्छ वस्त्रात ठेवून, ‘रक्षापोटलिका’ सिद्ध करण्याचे वर्णन आढळते. या द्रव्यांच्या प्रतीकात्मकतेकडे पाहिले, तरी भारतीय मनोभूमिका लक्षात येते. अक्षत म्हणजे जे ‘क्षत’ नाही, अखंड आहे; सुवर्ण म्हणजे तेज आणि समृद्धी, मंगलभावनांना धारण करणारे माध्यम. राजा त्यानंतर मंत्री, पुरोहित आणि सुहृदांसह मंगल वातावरणात बसतो. येथे रक्षाविधान खासगी कौटुंबिक कृती नसून, राजाच्या आणि पर्यायाने राज्याच्या कल्याणाशी जोडलेले सार्वजनिक मंगलकर्म असल्याचे दिसते. आणि मग स्पष्ट निर्देश येतो,
 
तदनु पुरोधा नृपतिं रक्षां बध्नीत मन्त्रेण॥
 
त्यानंतर पुरोहिताने मंत्रोच्चारपूर्वक राजाला रक्षासूत्र बांधावे. हा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा. कारण, येथे बहीण भावाला राखी बांधत नाही. पुरोहित राजाला रक्षासूत्र बांधतात. त्यामुळे रक्षाबंधनाची प्राचीन धार्मिक संकल्पना, आजच्या भाऊ-बहीण नात्यापेक्षा व्यापक होती, हे लक्षात येते. रक्षासूत्र बांधताना उच्चारला जाणारा मंत्र आजही आपल्या ओठांवर आहे,
 
येन बद्धो बली राजा
दानवेन्द्रो महाबलः|
तेन त्वामभिबध्नामि रक्षे
मा चल मा चल॥
 
ज्या रक्षासूत्राने महाबली दानवेंद्र राजा बली बद्ध झाला, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधतो. हे रक्षासूत्रा, तू ढळू नकोस, ढळू नकोस!
आज ‘बंधन’ म्हटले की आपल्याला पारतंत्र्य आठवते. पण भारतीय तत्त्वज्ञानात प्रत्येक बंधन वाईट नाही. शिष्य गुरूच्या अनुशासनाशी बांधला जातो; साधक आपल्या व्रताशी; राजा राजधर्माशी ; पती-पत्नी परस्परांच्या सुख-दुःखाशी; मनुष्य दिलेल्या शब्दाशी बांधला जातो. म्हणूनच, ‘रक्षे मा चल मा चल’ हे केवळ मनगटावरच्या धाग्यासाठीचे वाक्यत नाही. तो धागा ज्या मनगटावर आहे, त्या माणसालाही जणू सांगितले जाते, ‘तूही ढळू नकोस!’ संकट आले, तरी कर्तव्यापासून ढळू नकोस, मोह झाला तरी धर्मापासून ढळू नकोस, सामर्थ्य आल्यावरही न्यायापासून ढळू नकोस, ज्याच्या कल्याणाचा संकल्प स्वीकारला आहेस, त्या नात्यापासूनही ढळू नकोस. रक्षासूत्र कर्तव्याशीही बांधते. ‘भविष्य पुराण’ या विधीला राजदरबारापुरते मर्यादित ठेवत नाही. पुढे अत्यंत महत्त्वाचा श्लोक येतो,

ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैः शूद्रैश्चान्यैश्च मानवैः|
कर्तव्यो रक्षिकाबन्धो द्विजान्सम्पूज्य भक्तितः॥
 
अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तसेच इतरांनीही हे भक्तिपूर्वक रक्षिकाबंधन करावे. ‘अन्यैश्च मानवैः’ - ‘आणि इतर मानवांनीही’ हे शब्द विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहेत. रक्षासूत्राचा मंगलभाव समाजाच्या एखाद्या एका घटकापुरता मर्यादित राहात नाही. राजा असो वा सामान्य मनुष्य, प्रत्येकाला कल्याणाची आवश्यकता असून, प्रत्येकात दुसर्‍याचे कल्याण चिंतण्याची क्षमता आहे. यानंतर फलश्रुती सांगते,
 
अनेन विधिना यस्तु रक्षिकाबन्धमाचरेत्|
स सर्वदोषरहितः सुखी संवत्सरं भवेत्॥
 
जो या विधीने रक्षिकाबंधन करतो, तो दोषांपासून मुक्त होऊन वर्षभर सुखी राहतो. यातील ‘संवत्सर’ही अर्थपूर्ण आहे. रक्षा एका दिवसाची भावना नाही. श्रावणी पौर्णिमेला बांधलेले सूत्र, पुढील वर्षभरासाठी केलेल्या मंगल संकल्पाची आठवण आहे. धागा काही दिवसांनी तुटेल; रंग फिका पडेल; पण संकल्प तुटू नये, हीच रक्षासूत्राची खरी अपेक्षा. याच प्राचीन रक्षाविधानाने, पुढे अनेक सामाजिक रूपे धारण केली. त्यातील सर्वांत सुंदर लोकप्रिय रूप म्हणजे, बहिणीने भावाला राखी बांधणे. कुटुंबव्यवस्थेत बहिणीच्या मंगलकामनेला आणि भावाच्या तिच्याप्रति असलेल्या जबाबदारीला, या प्राचीन रक्षासूत्राने एक भावनिक रूप दिले.
 
या नात्याच्या अर्थाकडेही अधिक प्रगल्भतेने पाहण्याची वेळ आली आहे. बहीण म्हणजे दुर्बल आणि भाऊ म्हणजे तिचा एकमेव रक्षक, असा रक्षाबंधनाचा अर्थ नाही. संकटात बहीणही भावाच्या पाठीशी पर्वतासारखी उभी राहू शकते. कदाचित, म्हणूनच हजारो वर्षांचा प्रवास करूनही रक्षासूत्र कालबाह्य झाले नाही. म्हणून श्रावणी पौर्णिमेला मनगटावर रक्षासूत्र बांधताना मंत्र उच्चारावा,
 
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः|
तेन त्वामभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥
 
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज




संबंधित मजकूर