हिंदूद्वेष्ट्यांना बाप्पा सद्बुद्धी देवो!

    27-Aug-2026   

Kolhapur Zilla Parishad Ganeshotsav 
 
कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेमध्ये २२ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव रद्द करण्यात आला. काहींच्या मते, धर्मनिरपेक्षतेच्या नावावर चाललेला हा हिंदूद्वेषच आहे. पण, मग हिंदूंच्याच देवादिकांना, श्रद्धांना विरोध करणे, हे प्रकार मुद्दाम घडवून आणले जातात का? म्हणूनच सांगावेसे वाटते की, हिंदूद्वेषावर पोटपाणी भरणार्‍यांना बाप्पा सद्बुद्धी देवो!
 
जर जिल्हा परिषदेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम, उत्सव साजरा करायचा असेल, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची (किंवा संबंधित सक्षम प्राधिकरणाची) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते. यानुसार कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये २२ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव रद्द करण्यास भाग पाडले गेले. स्वत:ला ‘संविधानप्रेमी’ वगैरे म्हणवणार्‍या(???) संघटनेने ‘धर्मनिरपेक्षता’ या मुद्द्यावर बोट ठेवून या गणेशोत्सवाबद्दल प्रश्न उपस्थित केला. काही आरोपही केले गेले. या प्रकरणात परिषदेमध्ये गणेशोत्सव साजरा करणार्‍या ‘कलामंच’ संस्थेने याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेतली. मात्र, कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी स्पष्ट निर्णय दिला की, "शासननिर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये गणेश स्थापना करण्यास परवानगी देता येणार नाही.” यावर कोल्हापूरच्या हिंदू समाज संघटनांनी इशारा दिला की, दोन दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास सरकारी कार्यालयांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येऊन ‘मोरया आंदोलन’ छेडणार!
 
मात्र, २२ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव बंद करण्यात आला म्हणून, हिंदूद्वेष्ट्या आणि ज्यांचे पोटच हिंदू श्रद्धांना विरोध करून भरते, अशा काही तद्दन फालतू लोकांनी आनंद व्यक्त केला. काहीजण म्हणाले की, "२२ वर्षे जुन्या गणेशोत्सवाला परवानगी दिली नाही, हे बरोबरच आहे. महाराष्ट्र पुरोगामी-धर्मनिरपेक्ष आहे. हा छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.” हे असले वक्तव्य करणार्‍या मूर्खांना हे समजत नाही की, त्यांच्या अशा वर्तनाने या तीनही महापुरुषांच्या मूळ विचारांना छेद दिला जात आहे. खरेच का या तीनही महापुरुषांचे विचार फक्त हिंदू देव-देवतांवर टीका-टिप्पणी आणि विरोध करणारे होते? तर नाही! या तिघांनीही हिंदू समाजाच्या आणि श्रद्धेच्या सत्य, तर्क-स्वरूपासाठी कार्य केले आहे. तिथे कोणताही वैयक्तिक द्वेष आणि मत्सर नव्हता.
 
असो. २२ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव रद्द करण्याबाबत असा तर्क दिला गेला की, "महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य उत्सव’ म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी ‘कलामंच’ने केली होती. परंतु, राज्य उत्सवाच्या शासन आदेशात प्रशासकीय इमारतीत गणेश प्रतिष्ठापना करण्याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे गणेशोत्सवाला परवानगी देता येणार नाही.” ‘नरो वा कुंजरो वा’सारखी ही भूमिका. यानुसार, शासननिर्णयात प्रशासकीय इमारतीत गणेश प्रतिष्ठापना करण्याचा उल्लेख नाही. पण, मग ‘प्रशासकीय इमारतीमध्ये गणेश प्रतिष्ठापना करू नका,’ असा उल्लेख किंवा आदेश या परिपत्रकात आहे का? नसेल, तर मग याचा अर्थ असा होतो की, शासनाचा याबाबत विरोध नाही. मग या बाबीचा विचार या गणेशोत्सवासाठी का केला गेला नाही? काही तेच तेच लोक आणि त्याच त्याच संघटना आहेत, ज्या शासकीय, प्रशासकीय कार्यालयात (जिथे बहुसंख्य हिंदू आहेत) शाळेत देव-देवतांच्या तसबिरी लावणे, पूजा करणे किंवा धार्मिक उत्सव साजरा करणे, हे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आहे, अशी टिमकी वाजवतात आणि थेट त्यासोबत डॉ. बाबासाहेबांचे नावही जोडतात. पण, डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या मूळ संविधानामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्दच नव्हता. इंदिरा गांधींनी ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानामध्ये अक्षरशः घुसवले, असेच म्हणायला हवे. संविधानामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ तत्त्व हे डॉ. बाबासाहेबांनी नमूद केले नव्हते, तरीसुद्धा हे काही लोक डॉ. बाबासाहेबांचे नाव ‘धर्मनिरपेक्षता’ या तत्त्वाशी जोडून हिंदूंच्या कार्यालयातील पूजाअर्चेला का विरोध करतात? विरोध करणे हे त्यांचे वैयक्तिक मत असते. मात्र, तसे न दाखवता ते डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करतात. दुसरे असे की, मूळ संविधानामध्ये प्रभू श्रीरामाचे चित्र रेखाटलेले आहे. त्याला संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेबांनी विरोध केला नाही. मग हे लोक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदूविरोधी होते’ असा धादांत खोटेपणा समाजामध्ये का पसरवतात? खरेतर या नालायकांचा हिंदूंच्या देवधर्माला आक्षेप आहे. मात्र, धुळे येथे महापौर दालनात ‘टिप्या’ची (टिपू सुलतान) तसबीर लावलेली यांना चालते बरे!
 
तर, गणेशोत्सव हा धर्मासोबतच संस्कृती आणि लोकभावनेचा उत्सव. यावर काही लोक म्हणतात की, प्रशासकीय कार्यालयात/आस्थापनांमध्ये हिंदूंच्या सण-उत्सवांना बंदी घातली नाही, तर मग दुसरे धर्मीयही त्यांचे उत्सव साजरे करतील. हे चालणार आहे का तुम्हाला? तर वर्षानुवर्षे जे उत्सव सुरू आहेत, ते तसेच ठेवावेत. कारण, त्यामागे त्या-त्या समाजाच्या भावना, श्रद्धा असतात. पण, इतकीच कुणाची धर्मनिरपेक्षता उतू जात असेल, तर प्रशासकीय आस्थापनात कोणत्याही धार्मिक उत्सवाला नव्याने परवानगी देताना काही नियम-अटी ठेवाव्यात, असे वाटते.
 
याअनुषंगाने कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी आई महालक्ष्मीचे वास्तव आहे. तसेच, ‘हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा,’ अशी शपथ घेणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांशी नाते सांगणारे हे कोल्हापूर. या करवीरनगरीमध्ये द्वेषाने हिंदू देव-देवतांना आणि श्रद्धांना उगीचच विरोध करणार्‍यांना कायद्याचीच समज देण्याची वेळ आली आहे. यांच्या पाठी कुठे वेळ वाया घालवता, असेही काही लोक म्हणतात. पण लबाड लांडगा असू दे की, विषारी विंचू असो की झुरळ; वेळीच कायदेशीर बंदोबस्त करायला हवा. डोक्यात फक्त आणि फक्त हिंदूद्वेष आणि मत्सरच असणार्‍यांना बाप्पा सद्बुद्धी देवो!

राज्य सरकारची कोणतीही अधिकृत सरसकट सक्तीची बंदी नाही
 
शासकीय कार्यालयांमध्ये देव-देवतांचे फोटो लावणे, पूजा करणे किंवा धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदी घालणारे परिपत्रक शासनाच्या नावाने दि. ४ जानेवारी २०१७ रोजी जारी झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच दि. २७ जानेवारी २०१७ रोजी हे परिपत्रक अधिकृतपणे रद्द केले. "हे परिपत्रक वरिष्ठांची किंवा कॅबिनेटची कोणतीही मंजुरी न घेता, एका कनिष्ठ डेस्क ऑफिसरने जारी केले होते,” असा खुलासा शासनाने केला आणि संबंधित अधिकार्‍याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टिकोनातून शासकीय इमारतींमध्ये धार्मिक तटस्थता असणे अपेक्षित असले, तरी २०१७चे ते विशिष्ट परिपत्रक शासनाने मागे घेतल्यामुळे सध्या शासकीय कार्यालयांमध्ये पारंपरिक पूजा (उदा. सत्यनारायण पूजा) किंवा महापुरुषांच्या फोटोंसोबत देवांचे फोटो लावण्यावर राज्य सरकारची कोणतीही अधिकृत सरसकट सक्तीची बंदी लागू नाही.
 
सामाजिक सलोख्याचा गणेशोत्सव सुरू राहावा!
 
भारतीय संविधानाचे ‘अनुच्छेद २५’ सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे आचरण करण्याचा आणि तो पाळण्याचा मूलभूत अधिकार देते. संविधानातील अधिकारांवर ‘सार्वजनिक सुव्यवस्थे’च्या नावाखाली मर्यादा येतात. पण, हा उत्सव गेली २२ वर्षे विनाअडथळा आणि शांततेत पार पडत असल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेचा किंवा कामकाजाचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. विशेष म्हणजे, गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, तीच मुळात लोकांची सरमिसळ व्हावी, जनप्रबोधन व्हावे, जातिभेद मिटावे, सलोखा आणि देशप्रेम निर्माण व्हावे यासाठी! गणेशोत्सवासह इतरही हिंदूंचे सण अथवा धार्मिक कार्यक्रमामध्ये अन्य धर्मियांना सहभागी होण्यास कधीही निर्बंध नसतात. गणेशोत्सवातसुद्धा सामील होणार्‍या इतर धर्मीय लोकांचे स्वागतच केले जाते. त्यामुळे व्यापक जनहिताचा, सामाजिक सलोख्याचा धर्मनिरपेक्ष विचार करता हा उत्सव तिथे चालू राहायला हवा, असे वाटते. - अ‍ॅड. विभावरी बिडवे
 
माता सरस्वतीलाही असाच विरोध!
 
शाळा-महाविद्यालयात किंवा एखाद्या साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीपूजनावरही काही लोक आक्षेप घेत असतात. त्यासाठी ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंच्या नावाचा गैरवापर करतात. पण, या त्यांना माहिती असते का की, सावित्रीमाईंनी सरस्वतीच्या त्यांच्या कवितेत म्हटले आहे की -
 
सरस्वतीच्या दरबारात
शिक्षण घेणेस जाऊ चला,
विद्यादेवीस प्रसन्न करूनि
वर मागू तिजला चला|
 
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर