ज्येष्ठ स्वयंसेवक, कामगार नेते डॉक्टर पां. रा. किनरे यांचे निधन

    27-Aug-2026   
 
 Dr. Pandurang Rajaram Kinare
 
ठाणे (Dr. Pandurang Rajaram Kinare) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि कामगार चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते डॉ. पांडुरंग राजाराम किनारे यांचे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळ आणि अल्प आजार यामुळे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. डॉ. किनरे यांचे वय ८८ होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना आणि सहा नातवंडे असा परिवार आहे. जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
मूळचे राजापूर येथील पांडुरंग किनारे हे शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत आले. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. परळ, लालबाग, वरळी हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र मानून वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या डॉक्टर यांनी याच भागात संघाचे काम सुरू केले. त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीत रा. स्व. संघाच्या कार्याचा प्रसार करताना विविध सामाजिक स्तरातले नागरिक डॉ. किनरे यांनी जोडले. (Dr. Pandurang Rajaram Kinare)
 
सन १९६६ साली संघटनेच्या सांगण्यावरून डॉ. किनरे यांनी जनसंघाचे उमेदवार म्हणून राजापूर येथून निवडणूक लढवली होती. कामगार क्षेत्र हे डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचे होते. सुरुवातीला भारतीय मजदूर संघ आणि भारतीय मजदूर संघाशी संलग्न अशा राष्ट्रीय कामगार युनियन मधून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. अल्पावधीतच मुंबईतील अभ्यासू, लढाऊ, आणि कामगारांच्या भावविश्वाशी जोडलेले म्हणून डॉक्टर किनारे यांची ओळख निर्माण झाली होती.
 
विविध विचारांच्या कामगार चळवळीतील नेत्यांशी डॉ. किनरे यांची मैत्री होती. इंडियन एक्सप्रेस मध्ये त्यावेळी झालेल्या संपात डॉ. किनरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यांनी डॉ. किनरे यांना वाहिलेल्या श्रदांजलीत याचा आवर्जून उल्लेख केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत संघटनेच्या सांगण्यावरून डॉ. किनरे यांनी वरळी विधानसभेची निवडणूक निवडणूक लढवली होती. भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या उभारण्यात उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.(Dr. Pandurang Rajaram Kinare)
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान समर्पित स्वयंसेवक अशीच डॉ. किनरे यांची ओळख होती. रा. स्व. संघाचे विचार, कार्य आणि संघाचे प्रचारक, स्वयंसेवक यांच्या कामाची माहिती देण्यासाठी त्यांनी साहित्य निर्मितीत विशेष पुढाकार घेतला होता. डॉ. किनरे यांनी लिहिलेले "तृप्तीची तिर्थोदके" हे पुस्तक विशेष उल्लेखनीय ठरले आहे. (Dr. Pandurang Rajaram Kinare)
 
रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी हे डॉ.किनरे यांचे प्रेरणास्थान होते. श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात डॉ. किनारे यांनी पुढाकार घेऊन एक विशेष लघुपट तयार केला होता. या लघुपटाची दखल रा. स्व. संघाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेऊन डॉ. पांडुरंग किनरे यांना संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सन्मानित केले होते.
 
दि. २९ जुलै या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवातही डॉ. किनरे सहभागी झाले होते. गुरुपूजन न चुकवणारे स्वयंसेवक अशी त्यांची ओळख होती. गेली काही वर्ष डॉ. किनरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रसारित होणाऱ्या साहित्याची चर्चा घडवून आणण्याकरता पुढाकार घेत होते. डॉ. पांडुरंग रा. किनरे यांच्या जाण्याने संघ समर्पित स्वयंसेवक हरपला आहे. घर, कुटुंब, व्यवसाय, युनियन सांभाळून संघ विचार जगणाऱ्या डॉ. पां. रा. किनरे यांनी विविध सामाजिक संस्थांना कर्तव्याच्या भावनेने देणगी दिलेली आहे. (Dr. Pandurang Rajaram Kinare)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर