Western Ghats ESZ - सिंधुदुर्गात सावंतवाडी शहर संवेदनशील, तर दोडामार्गचे जंगल वाऱ्यावर

    26-Aug-2026
Western Ghats ESZ



मुंबई (अक्षय मांडवकर) -
पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या नव्या मसुदा अधिसूचनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशीलतेच्या सीमांकनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे (Western Ghats ESZ). पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या दोडामार्ग तालुक्यातील क्षेत्र संवेदनशील क्षेत्राच्या यादीबाहेर ठेवताना सावंतवाडी नगरपरिषदेचा शहरी भाग मात्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे (Western Ghats ESZ). त्यामुळे ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग’ निश्चित करण्यामागील निकषांबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरपरिषद क्षेत्राऐवजी दोडामार्गातील वन्यजीव भ्रमणमार्ग आणि व्याघ्र अधिवासाच्या क्षेत्रांना संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Western Ghats ESZ)
 
 
केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने २७ जुलै, २०२६ रोजी पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत नवीन मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली. या मसुद्यात महाराष्ट्रासाठी १७ हजार ३४० चौ. किमी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. मसुद्याच्या गावनिहाय यादीचा विचार करता सिंधुदुर्गातील देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील मिळून १९७ गावे प्रस्तावित आहेत. यामध्ये देवगड तालुक्यात २०, कणकवलीत ३९, कुडाळमध्ये ५०, सावंतवाडीत ५१ आणि वैभववाडीत ३७ गावांचा समावेश होतो. म्हणजेच सिंधुदुर्गातील प्रस्तावित सर्वाधिक गावांचा समावेश सावंतवाडी तालुक्यातील आहे. मात्र, याच यादीत दोडामार्ग तालुक्याचा समावेश दिसत नाही.या यादीतील सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे सावंतवाडी नगरपरिषदेचा समावेश. गावांच्या यादीत ‘Sawantwadi (MCl)’ अशी स्वतंत्र नोंद आहे. सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्राचा संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याच्या प्रस्तावामुळे पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या निकषांवर मूलभूत प्रश्न निर्माण होतो. नगरपरिषद क्षेत्र हे प्रामुख्याने विकसित आणि नागरी स्वरूपाचे असताना, पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला दोडामार्ग तालुका यादीतच नसणे ही विसंगती असल्याचा मुद्दा पुढे येत आहे.
 
 
दोडामार्गचे नक्की काय ?
२२ मार्च २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोडामार्गच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेबाबत भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडले. त्यावर केंद्र सरकारने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना जारी केली. त्यानुसार २५ गावांमध्ये पसरलेल्या २१२.५९ चौ. किमी क्षेत्राचा संवेदनशील क्षेत्र म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये दोडामार्ग १३ गावांचा समावेश करण्यात आला. मात्र, आता दोडामार्ग तालुक्यातील केर भेकुर्लीसारखी गावे आणि तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नागरी वसाहत मुक्त भागाचा देखील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. कारण या परिसरात सद्यस्थितीत वाघांच्या अधिवास असून काही गावांमध्ये एम-सँड (कृत्रिम वाळू) सारखे प्रकल्प प्रस्तावित होत आहेत.
दोडामार्गातील तिलारी पाणलोट क्षेत्रातील मानवी वावर नसलेल्या मोकळ्या प्रदेशाचा भाग वगळून सावंतवाडी नगरपरिषदसारख्या नागरी वसाहतीच्या भागाचा संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. यातून विसंगती आपल्या लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा मुद्दा ताटकळत ठेवल्यानेच दोडामार्गातील संवेदनशील क्षेत्रात आज खासगी निवासी संकुल, एम-सँड (कृत्रिम वाळू) सारखे प्रकल्प प्रस्तावित होत आहेत. – संजय सावंत, मानद वन्यजीव रक्षक-सिंधुदुर्ग




संबंधित मजकूर