तीन पिढ्या घडविणारा संघशरण स्वयंसेवक

    26-Aug-2026
Shashikant Patwardhan
 
कै. शशिकांत विनायक पटवर्धन हे चिपळूणच्या निःस्वार्थ, शिस्तप्रिय आणि संघशरण जीवन जगलेल्या स्वयंसेवकांपैकी एक होते. त्यांनी शाखा, स्वयंसेवक आणि समाजाशी आत्मीयतेचे नाते जोडले. स्वतःच्या संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असतानाच संघकार्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी चिपळूणमध्ये तीन पिढ्यांवर संस्कार करण्याचे मौन कार्य केले. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर संघनिष्ठा ही केवळ विचारांची नव्हे, तर आचरणाची गोष्ट होती, याची प्रकर्षाने जाणीव होते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. शशिकांत विनायक पटवर्धन यांनी आयुष्यभर संघाने सांगितले तेच कर्तव्य मानले आणि तीन पिढ्या घडविण्याचे भाग्य लाभलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले. रत्नागिरी जिल्ह्यातील माखजन शाखेचे मूळ स्वयंसेवक असलेले शशिकांत हे संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित. लौकिक दृष्ट्या एस.एस.सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. माखजनचे ज्येष्ठ स्वयंसेवक कै. रघुनाथ कृष्णा तथा नाना भागवत यांच्या निकट सहवासात त्यांच्यात शिस्त, वक्तशीरपणा, तोलूनमापून बोलण्याची सवय आणि सचोटीचा व्यवहार हे गुण सहज रुजले. हे संस्कार पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनाचे अधिष्ठान ठरले.
 
चिपळूण मधील छत्रपती सायं शाखेचे मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. त्या काळात ही शाखा जिल्ह्यातील आदर्श शाखांपैकी एक मानली जात असे. सुमारे पन्नास स्वयंसेवकांची नियमित उपस्थिती, विविध खेळ, व्यायाम, पद्य आणि नित्य कार्यक्रमांनी शाखा सजीव राहत असे. रोज सायंकाळी शशिकांत पटवर्धन शाखा घेत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे लहान मुले त्यांच्याभोवती रमत. शाखा म्हणजे केवळ कार्यक्रम नसून ती संस्कारांची कार्यशाळा असते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले.
 
संघकार्याची हाक आली तेव्हा त्यांनी दोन वर्षे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात प्रचारक म्हणून पूर्णवेळ कार्य केले. प्रचारक जीवनातील त्याग, साधेपणा आणि संघनिष्ठा यांचा प्रभाव त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर कायम राहिला. १९६३ पासून चिपळूणातील बाबुराव साठे यांच्या रत्नाकर वस्तुभांडारात त्यांनी नोकरी सुरू केली. जवळपास वीस वर्षे प्रामाणिकपणे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र स्टेशनरी व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय उभा करताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. घरात मोठी चोरी झाली, धंद्यात मंदी आली, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला; पण त्यांनी कधीही हार मानली नाही. संघपरिवारातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि चिकाटीने व्यवसाय स्थिर केला. नंतर प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी व्यवसायातून काहीसे लक्ष काढून घेतले. त्यांचा मुलगा दिनेश पटवर्धन यांनी त्याच समर्पणाने हा व्यवसाय पुढे यशस्वीपणे चालविला.
 
त्यांच्या पत्नी अपर्णा पटवर्धन यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवावी, यासाठी घरातील अडचणी असूनही त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. त्या निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून त्यांना घरापेक्षा सार्वजनिक कामांना अधिक वेळ द्यावा लागत असे. तरीही शशिकांत पटवर्धन यांनी कधीही तक्रार केली नाही. ही त्यांची समंजस वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होता. पटवर्धन यांचे घर हे अनेकांसाठी दुसरे घरच होते. संघ प्रचारक, बाहेरील कार्यकर्ते, परिसरातील मंडळी यांची सतत ये-जा सुरू असे. प्रत्येकाचे स्वागत हास्यवदनाने करणे, पाहुण्यांना भोजनाचा आग्रह धरणे आणि आत्मीयतेने निरोप देणे ही त्यांच्या घराची परंपरा बनली होती. आजही त्या घरात हे आदरातिथ्य कायम असल्याचे अनेक कार्यकर्ते आवर्जून सांगतात.
 
१९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी दीड वर्ष नाशिक कारागृहात शिक्षा भोगली. त्या काळात अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळचा परिचय झाला. त्यामध्ये पुढे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविणारे प्रमोद महाजन यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री निर्माण झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतरही ती मैत्री तितकीच दृढ राहिली. ज्येष्ठ प्रचारक मुकुंदराव पणशीकर, राजाभाऊ भोसले, दुर्गानंद नाडकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांशी त्यांचे बंधुत्वाचे संबंध होते.
 
शशिकांत पटवर्धन यांचे लहान मुलांवर विशेष प्रेम होते. त्यामुळे ते बाल शाखांमध्ये अधिक रमत असत. त्यांनी कधी मोठमोठी तात्त्विक भाषणे दिली नाहीत; पण साध्या घरगुती संवादातून, आपल्या वर्तनातून आणि सातत्यपूर्ण उपस्थितीतून त्यांनी असंख्य स्वयंसेवक घडविले. चिपळूणातील तीन पिढ्यांना संघाचे संस्कार देण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध वयोगटांतील स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ती उपस्थिती त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा त्यांच्या आत्मीयतेची साक्ष देणारी होती.
 
अत्यंत संयमी, मृदुभाषी आणि अजातशत्रू असलेले शशिकांत पटवर्धन यांनी आयुष्यभर संघशरण जीवन जगले. नोकरी सांभाळत शाखा चालविली, व्यवसाय सांभाळत संघकार्य केले, आर्थिक संकटातही कार्याची साथ सोडली नाही आणि संघासाठी पैसा, वेळ व परिश्रम मनःपूर्वक अर्पण केले. २३ ऑगस्ट २००६ रोजी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय ६९ वर्षे होते.
 
कै. शशिकांत विनायक यांनी उभारलेल्या शाखा, घडविलेले स्वयंसेवक, जपलेली माणसे आणि घरातून दिलेले संस्कार हीच त्यांच्या जीवनाची खरी कमाई होती. अशा स्वयंसेवकांमुळेच संघकार्याची परंपरा पिढ्यान्पिढ्या अखंडपणे प्रवाही राहते, आणि म्हणूनच शशिकांत पटवर्धन यांचे जीवन आजही अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरते.




संबंधित मजकूर