अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र धनगरवाडी आणि दिघी परिसरात पार पडलेल्या सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाने यंदा भक्तीपलीकडे संतपरंपरा, सामाजिक एकोपा आणि हिंदू संस्कृतीचे सामर्थ्य अधोरेखित केले. १३० एकरांवरील नियोजन, १५ हजार टाळकर्यांचे १६८ तासांचे अखंड भजन आणि १४ हजार स्वयंसेवकांची सेवा यामुळे या सप्ताहाची भव्यता जाणवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतपरंपरेचे महत्त्व सांगतानाच रामगिरी महाराजांना धमकी देणार्यांना दिलेला स्पष्ट इशारा लक्षवेधी ठरला. सरला बेटाचा विकास, शेतकरीविषयक भूमिका आणि संतचरणी व्यक्त केलेला मुख्यमंत्र्यांचा नम्र भाव यामुळे १७९ वर्षांच्या या परंपरेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ ते २५ ऑगस्टदरम्यान हा सप्ताह पार पडला. गंगागिरी महाराजांनी गावोगावी पायी प्रवास करून सुरू केलेल्या या परंपरेला यंदा १७९ वर्षे पूर्ण झाली. भक्तीबरोबरच कष्टकरी समाजाला आधार, अन्नदान, व्यसनमुक्ती आणि संस्कारपूर्ण गृहस्थ जीवनाचा संदेश या परंपरेतून दिला जातो.
राज्याच्या विविध भागांतून वारकरी आणि भाविक धनगरवाडीत दाखल झाले. १५ हजार टाळकर्यांनी १६८ तास अखंड भजन केले. भाविकांच्या व्यवस्थेसाठी १४ हजार स्वयंसेवक कार्यरत होते. भोजन, पाणी, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतुकीची व्यवस्था त्यांनी सांभाळली. चार एकरांच्या भोजनपंडालमध्ये महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबत कृषी प्रदर्शनही भरविण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्ताहाला उपस्थित राहून संतपरंपरा आणि हरिनाम संकीर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले. हरिनामामुळे मीपणा दूर होऊन जात-पात आणि आर्थिक भेद विसरून समाज एकत्र येतो, असे त्यांनी सांगितले. आध्यात्मिक आणि सज्जनशक्तीच्या बळावर महाराष्ट्राला पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी फडणवीस यांनी संत-महंतांप्रति असलेला आदर कृतीतून व्यक्त केला. वारकरी वातावरणात सहभागी झाल्यानंतर त्यांनी संतांच्या व सहभागीजनांचे चरणस्पर्श केला. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने संतपरंपरेबाबत व्यक्त केलेला हा नम्र भाव उपस्थितांसोबत अखंड महाराष्ट्राला विशेष लक्षात राहील.
सरला बेटाच्या विकासासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरला बेटाचा प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५६ लाख शेतकर्यांना कर्जमाफीचे काम सुरू असून दिवसा वीजपुरवठ्याचे प्रमाण वाढविण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातिभेद आणि श्रीमंत-गरीब भेद विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी एकत्र येणे, ही संतपरंपरेची ताकद असल्याचे सांगितले. ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचे सांगतानाच बळीराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गंगागिरी महाराजांच्या परंपरेचा गौरव केला. यावेळी आ. अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे-पाटील, रमेश बोरनारे, विवेक कोल्हे, आशुतोष काळे, माजी आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह संत-महंत आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
‘सद्गुरूंना धमकी देणार्यांना नेस्तनाबूत करू’
काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडेही धमक्या पाठवतात. अशा प्रकारे धमकी देण्याचे काम कोणी केले, तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. रामगिरी महाराजांच्या पाठीशी सरकार ठाम असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
१७९ वर्षांची ही परंपरा हजारो भाविक, टाळकरी आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून आजही सुरू आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक एकोपा वाढविणारा हा मेळावा आहे. - भाऊसाहेब वाकचौरे, खासदार, शिर्डी लोकसभा
हा सप्ताह केवळ धार्मिक उपक्रम न राहता, समाजाला एकत्र आणणारा सोहळा आहे. भाविक, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून सेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पुढे जातो. मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा कीर्तिमान झाला. -विकास अभंग, स्थानिक कार्यकर्ते (दिघी) व उद्योजक
संतपरंपरेचा सामाजिक धागा
वैकुंठवासी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पावन सान्निध्यात सुरू झालेली अखंड परंपरा पुढेही निरंतर चालू राहील. कष्टकरी व वंचितांना आधार, अन्नधान्य आणि समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने ही परंपरा उभी राहिली. हिंदू समाजाने एकोप्याने तिचे स्वरूप अधिक व्यापक करावे. या परंपरेचा विस्तार हा केवळ संख्येचा विषय नसून तिच्यामागील विचार आणि संस्कार अधिक दूरवर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून सेवा, त्याग, शिस्त आणि परस्पर सहकार्याची भावना समाजात रुजत आहे. नव्या पिढीने या परंपरेशी जोडले जाऊन संतांनी दिलेला विचार आचरणात आणावा, हीच अपेक्षा आहे. -महंत रामगिरी महाराज मठाधिपती, श्री गंगागिरी महाराज संस्थान, सरला बेट