मणिपूरमधील वांशिक संघर्षाच्या कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिणामांची धग अजूनही कमी झालेली नाही. मणिपूरच्या या संकटकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याच्या संलग्न संघटना आणि स्वयंसेवकांनी कृतिशील उपाययोजना राबवित, मदत व पुनर्वसनाच्या कार्यात घेतलेला पुढाकार सर्वस्वी मोलाचा ठरला आहे. त्याविषयी...
भारताच्या पूर्वोत्तर भागात म्यानमार सीमेला लागून असलेल्या अष्टलक्ष्मींपैकी एक असलेल्या मणिपूर या राज्यात ‘मैतेई’, ‘नागा’ आणि ‘कुकी’ असे तीन प्रमुख वांशिक समूह. मणिपूरने ऐतिहासिक काळापासून अनेक संघर्ष पाहिले; परंतु मे २०२३ पासून जेव्हा ‘मैतेई’ समुदाय आणि ‘कुकी-झो’ समुदायांमध्ये हिंसक संघर्ष उफाळून आला, तेव्हापासून मणिपूरने अलीकडील भारतीय इतिहासातील सर्वांत गंभीर वांशिक संकटांपैकी एक अनुभवले आहे. या हिंसाचाराचे तत्कालिक कारण म्हणजे लोकसंख्येतील असमतोल वाढ, नोकर्या व जमिनीच्या आरक्षणाशी संबंधित प्रश्न, तसेच ‘अमली पदार्थाच्या व्यापाराविरोधी युद्ध’ या सरकारी उपक्रमाला असलेला विरोध, यामुळे निर्माण झालेल्या जमीनहक्क, राजकीय प्रतिनिधित्व आणि सांस्कृतिक ओळख याबाबत निर्माण झालेली असुरक्षितता. या हिंसक परिस्थितीत शेकडो लोक ठार झाले आहेत किंवा बेपत्ता आहेत; तर सुमारे ६० हजार लोक तथाकथित तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहण्यास मजबूर आहेत, जिथे पुरुष आणि महिला साधारणपणे वेगवेगळे राहतात. त्यामुळे कुटुंबांवर विभक्त होऊन राहण्याची वेळ आली.
२०२६ मध्ये हा हिंसाचार ‘मैतेई-कुकी’ समुदायांपुरता मर्यादित राहिला नाही. आता ‘नागा’ आणि ‘कुकी’ यांच्यामध्येही संघर्ष आणि प्रादेशिक वाद सुरू झाले आहेत. यामुळे डोंगराळ जिल्ह्यांमध्ये अस्थिरता अधिक वाढली असून, परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनलेली दिसते. सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि वारंवार शांततेचे आवाहन करूनही सशस्त्र चकमकी, गावांची जाळपोळ, हत्या, अपहरण, सापळे हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. या संघर्षाला नवे वळण मिळाल्यामुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे विस्थापन मोठ्या प्रमाणात वाढले. दहा हजार लोकांना त्यांच्या घरांमधून काढण्यात आले असून, ते आता मणिपूर आणि शेजारील राज्यांमध्ये मदत छावण्यांमध्ये व तात्पुरत्या निवार्यांमध्ये ‘आंतरिक विस्थापित व्यक्ती (IDPs)’ म्हणून राहत आहेत. या धगधगत्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित झाले आहे. अनेक कुटुंबे त्यांच्या घरांपासून दूर अनेक वर्षे राहत असल्याने एक सामान्य जीवन त्या विस्थापितांना जगता येत नाही. त्यांच्या भविष्यासंबंधी फारशी निश्चितता नाही. अनेक दैनंदिन अडचणींना विनाकारण सामोरे जाण्याची वेळ आपल्या मणिपूरमधील बांधवांवर आलेली आहे.
आंतरिक विस्थापित व्यक्तींना (IDPs) भेडसावणार्या अडचणी
सामाजिक अडचणी : मणिपूरचे सामाजिक जाळे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. जे समुदाय पूर्वी एकोप्याने राहत होते, ते आता भीती आणि वैरामुळे वेगळे झाले आहेत. अनेक कुटुंबे विभागली आहेत, मुलांचे नियमित शिक्षण खंडित झाले आहे आणि संघर्षग्रस्त भागांतील अनेक सामाजिक संस्था कोसळल्या आहेत.
मदत शिबिरांमध्ये वाढणार्या मुलांना स्थिर शिक्षण, मनोरंजनाच्या उपक्रमांपासून आणि भावनिक सुरक्षिततेपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक तरुणांनी अशा वयात हिंसा, विस्थापन आणि विध्वंस पाहिला आहे; जेव्हा त्यांना स्थैर्य आणि विकासाचा अनुभव मिळायला हवा होता. गर्दीच्या शिबिरांमध्ये महिलांना गंभीर असुरक्षिततेचा सामना करावा लागतो; जिथे गोपनीयता, स्वच्छताविषयक सुविधा आणि संरक्षण यांचा अभाव असतो. वृद्ध लोक, विशेषतः जे समुदायाच्या आधार व्यवस्थेवर अवलंबून होते, त्यांना एकटेपणा, असहाय्यता आणि दुर्लक्ष यांचा सामना करावा लागत आहे. भावनिक आणि सांस्कृतिक स्थैर्य देणारे पारंपरिक सामाजिक बंध मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले आहेत.
आर्थिक अडचणी : हजारो कुटुंबांनी आपली घरे, शेतीची जमीन, दुकाने, जनावरे, व्यवसाय आणि उपजीविकेची साधने गमावली आहेत. असुरक्षिततेमुळे शेतकर्यांना शेतांमध्ये जाता येत नाही, तर व्यापारी आणि लघुउद्योजकांचे व्यवसाय कोलमडले आहेत. रोजंदारीवर काम करणारे आणि मजूरवर्ग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. कारण, विस्थापनामुळे त्यांची उपजीविकेची साधने लगेचच नाहीशी झाली. अनेक आंतरिक विस्थापित व्यक्ती आता अन्न आणि दैनंदिन गरजांसाठी मदत साहित्य व मानवतावादी साहाय्यावर अवलंबून आहेत. शिक्षणातील व्यत्ययामुळे दीर्घकालीन आर्थिक परिणामही निर्माण झाले आहेत. परीक्षा किंवा व्यावसायिक करिअरसाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांची मौल्यवान शिक्षणाची वर्षे आणि संधी गमावल्या गेल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील रोजगार आणि आर्थिक स्थैर्याबाबत अनिश्चितता वाढली आहे.
शारिरीक अडचणी : मदत शिबिरांमध्ये बहुतेक वेळा प्रचंड गर्दी, अस्वच्छता, अपुरी आरोग्यसेवा, औषधांची कमतरता आणि मर्यादित पोषण अशा समस्या असतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनविकार आणि संधिवात यांसारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या वृद्धांना योग्य उपचार मिळवण्यात मोठ्या अडचणी येतात. महिला, विशेषतः गर्भवती महिला आणि लहान बालकांच्या माता सर्वाधिक असुरक्षित गटात येतात. मर्यादित आरोग्यसुविधा आणि खराब राहणीमानामुळे माता आणि मुलांसाठी आरोग्याचा धोका वाढतो. शिबिरांमध्ये राहणारी मुले कुपोषण, संसर्ग आणि अस्वच्छतेच्या समस्यांना सामोरी जातात. अनेक आंतरिक विस्थापित व्यक्ती अजूनही आघाताशी संबंधित शारीरिक थकवा, झोपेचे विकार आणि तणावामुळे उद्भवणार्या आजारांनी त्रस्त आहेत.
मानसिक आणि भावनिक अडचणी : कदाचित, या संघर्षामुळे झालेली सर्वांत खोल जखम मानसिक आहे. अनेक विस्थापितांनी हत्या, घरांचे विध्वंस, गावांची जाळपोळ आणि आपल्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू पाहिला आहे. घरी परतण्याची भीती, भविष्यासंबंधी अनिश्चितता आणि सततची असुरक्षितता, यामुळे व्यापक प्रमाणात चिंता, नैराश्य आणि भावनिक तणाव निर्माण झाला आहे. आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न आता अपवाद राहिलेले नाहीत. मुले भीती आणि द्वेषाच्या वातावरणात वाढत आहेत, ज्याचा त्यांच्या भावनिक विकासावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. हिंसा आणि विस्थापनाचा अनुभव घेतलेल्या महिलांना दीर्घकालीन मानसिक आघात सहन करावा लागतो. पिढ्यान्पिढ्या उभारलेले घर आणि सामाजिक जाळे गमावल्यामुळे वृद्धांना स्वतःला टाकून दिल्यासारखे वाटते आणि ते भावनिकदृष्ट्या खचलेले असतात. संघर्ष दीर्घकाळ चालू राहिल्यामुळे अनेक आंतरिक विस्थापित व्यक्तींमध्ये निराशा वाढली आहे आणि त्यांना अधिकाधिक असे वाटू लागले आहे की, त्यांना विसरले गेले आहे व ते सामान्य जीवनापासून दूर झाले आहेत.
रा. स्व. संघाचे योगदान आणि मदतकार्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच त्याच्या संलग्न संघटना आणि स्वयंसेवकांनी मणिपूरमधील संकटाच्या काळात मदत व पुनर्वसनाच्या कार्यात सहभाग घेतला आहे. आपल्या विस्तृत स्वयंसेवक जाळ्याच्या माध्यमातून या संघटनेने प्रभावित लोकांना मानवतावादी मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.
मदत वितरण : संघाचे स्वयंसेवक आणि संलग्न सेवा संघटनांनी मदत शिबिरांमध्ये अन्न, कपडे, औषधे, ब्लँकेट्स आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण केले आहे. ही मदत विस्थापित कुटुंबांना, विशेषतः महिला, मुले आणि वृद्ध यांसारख्या असुरक्षित गटांना दिली गेली आहे.
वैद्यकीय मदत : काही प्रभावित भागांमध्ये वैद्यकीय शिबिरे आणि आरोग्य साहाय्य उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विस्थापित लोकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना मूलभूत उपचार, औषधे आणि आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक साहाय्य : मदत शिबिरांमध्ये राहणार्या मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करून आणि विस्थापनाच्या परिस्थितीतही त्यांच्या शिक्षणात काही प्रमाणात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
समाजसेवा आणि स्वयंसेवकांचे संघटन : रा. स्व. संघाने भारताच्या विविध भागांतून स्वयंसेवकांना एकत्र करून मदतकार्य, शिबिरांचे व्यवस्थापन, आवश्यक वस्तूंचे वितरण आणि मानवतावादी सेवा उपक्रमांमध्ये सहभागी केले आहे. त्याची मोठी संघटनात्मक रचना आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीने स्वयंसेवकांना सक्रिय करण्यास सक्षम ठरते.
शांतता आणि राष्ट्रीय एकतेसाठी आवाहन : रा. स्व. संघाचे अनेक नेते आणि संलग्न संघटनांनी मणिपूरमध्ये शांतता, सामाजिक सलोखा आणि सामान्य स्थिती पुनर्स्थापित करण्यासाठी सार्वजनिकरीत्या आवाहन केले आहे. त्यांनी राष्ट्रीय एकतेवर भर देत, समुदायांमध्ये परस्पर विश्वास पुन्हा निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
भविष्य : रा. स्व. संघ अधिक प्रभावी मदत कशी करू शकतो?
रा. स्व. संघाची भारतभर विस्तृत तळागाळात उपस्थिती असून, जागतिकस्तरावरही सेवा-संस्थांशी त्याचे संबंध आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करणे आणि मानवतावादी पुनर्वसनासाठी अधिक व्यापक योगदान देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे.
दीर्घकालीन पुनर्वसन कार्यक्रम : तत्काळ मदतीपलीकडे जाऊन रा. स्व. संघ विस्थापित समुदायांसाठी घरे, शाळा, आरोग्यसुविधा आणि उपजीविकेची साधने पुन्हा उभारण्यात मदत करू शकतो. आंतरिक विस्थापित व्यक्तींसाठी सन्मान आणि स्थैर्य पुन्हा मिळवून देण्यासाठी शाश्वत पुनर्वसन अत्यंत आवश्यक आहे.
महिला आणि मुलांसाठी विशेष साहाय्य : महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र व विशेष साहाय्य व्यवस्था तातडीने आवश्यक आहे. रा. स्व. संघ आणि त्याच्या संलग्न संघटना
खालील बाबींमध्ये मदत करू शकतात :
- मदत शिबिरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणे
- समुपदेशन आणि मानसिक आघात निवारण सेवा उपलब्ध करून देणे
- मुलांसाठी शिक्षण केंद्रे स्थापन करणे
- माता आणि मुलांसाठी पोषण कार्यक्रम राबवणे
- विस्थापित महिलांसाठी कौशल्यविकास आणि उपजीविका प्रशिक्षण देणे
वृद्ध आणि आरोग्य साहाय्य : ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या आंतरिक विस्थापित व्यक्तींसाठी विशेष वैद्यकीय पोहोच कार्यक्रम अधिक विस्तारता येऊ शकतात. मोबाईल आरोग्य युनिट्स, औषधांचे वितरण, फिजिओथेरपी साहाय्य आणि भावनिक काळजीचे उपक्रम त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा करू शकतात.
मानसिक पुनर्बांधणी आणि समुपदेशन : या संघर्षामुळे खोल मानसिक जखमा निर्माण झाल्या आहेत. रा. स्व. संघ मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, आध्यात्मिक नेते आणि नागरी समाज संघटनांशी सहकार्य करून आघात निवारण कार्यक्रम, समुपदेशन सत्रे आणि समुदाय साहाय्य गट आयोजित करू शकतो. दीर्घकालीन शांततेसाठी मानसिक पुनर्वसन हे शारीरिक पुनर्वसनाइतकेच महत्त्वाचे आहे.
समुदायांमधील संवाद प्रोत्साहन : रा. स्व. संघ करू शकणार्या सर्वांत महत्त्वाच्या योगदानांपैकी एक म्हणजे, विविध समुदायांमधील संवाद सुलभ करणे होय. केवळ सुरक्षा उपायांनी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही; त्यासाठी परस्पर विश्वास पुन्हा निर्माण करणे आवश्यक असते. संघटना खालील उपक्रम आयोजित करण्यात मदत करू शकते -
- शांतता बैठका
- सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम
- युवक संवाद उपक्रम
- आंतर-समुदाय सेवा प्रकल्प
- समेट आणि संवादासाठी व्यासपीठे
- अशा प्रयत्नांमुळे हळूहळू समुदायांमधील द्वेष, ठोकताळे आणि भीती कमी होऊ शकते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहाय्याचे संकलन : आपल्या देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संलग्न सामाजिक व सांस्कृतिक संस्थांद्वारे रा. स्व. संघ अतिरिक्त मानवतावादी मदत, देणग्या, शैक्षणिक साहाय्य आणि स्वयंसेवकांचा सहभाग भारतभर, तसेच परदेशातूनही एकत्र करू शकतो. या व्यापक जाळ्यामुळे केवळ अल्पकालीन आपत्कालीन मदतीपुरते मर्यादित न राहता, विस्थापित कुटुंबांना सातत्यपूर्ण साहाय्य मिळण्यास मदत होऊ शकते.
निष्कर्ष
मणिपूरमधील संघर्ष हा केवळ राजकीय किंवा जातीय प्रश्न नसून, एक गंभीर मानवतावादी शोकांतिका आहे; ज्यामुळे व्यक्ती, समुदाय आणि सामाजिक विश्वास यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंतरिक विस्थापित व्यक्तींचे, विशेषतः महिला, मुले, वृद्ध आणि आजारी लोकांचे दुःख हे सहानुभूती, पुनर्वसन आणि समेट यांची तातडीची गरज अधोरेखित करते. रा. स्व. संघासारख्या संघटनांकडे व्यापक स्वयंसेवक जाळे आणि मजबूत संघटनात्मक क्षमता असल्यामुळे त्या केवळ मदतकार्यापुरते मर्यादित न राहता, दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करणे आणि सामाजिक पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, असे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी ते सर्वसमावेशक, मानवतावादी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निष्पक्ष असणे आवश्यक आहे.
शेवटी, मणिपूरमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार, नागरी समाज, आदिवासी संघटना, धार्मिक संस्था, मानवतावादी गट आणि सामाजिक संघटना यांनी एकत्रितपणे काम करून राज्यातील सर्व समुदायांमध्ये सन्मान, विश्वास आणि सहअस्तित्व पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे.
ले. जनरल (नि) एल. निशिकांत सिंग
(लेखक मणिपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठात अतिथी प्राध्यापक आहेत.)