कृति सेननच्या पोशाखावरून उठला वाद; 'गिवा'ने सर्व प्लॅटफॉर्मवरून जाहिरात हटवली - वाचा सविस्तर

    26-Aug-2026   
GIVA Raksha Bandhan Ad
 
मुंबई : (GIVA Raksha Bandhan Ad) रक्षाबंधनाच्या निमित्ताने दागिन्यांचा ब्रँड गिवा (GIVA) ने प्रसिद्ध केलेली अभिनेत्री कृति सेनन हिची जाहिरात अखेर सर्व माध्यमांवरून हटवली आहे. कृति सेननच्या पोशाखावर सोशल मीडियावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. वाढत्या वादविवादांनंतर आणि चौफेर टीकेनंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला.
 
या जाहिरातीत कृति सेनन रक्षाबंधन साजरे करताना एका विशिष्ट अशा इंडो-वेस्टर्न पोशाखात दिसत होती. जाहिरात समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील एका वर्गाने रक्षाबंधनासारख्या पारंपरिक आणि पवित्र सणासाठी असा पोशाख अयोग्य असल्याचे म्हणत टीका केली. अनेकांनी या सांस्कृतिक उत्सवासाठी अधिक पारंपरिक आणि संयत वेशभूषा अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. (GIVA Raksha Bandhan Ad)
 
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी जेव्हा या वादात उडी घेतली तेव्हा प्रकरण आणखी चिघळले. कृति सेननच्या पोशाखाची तुलना रक्षाबंधनसारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने 'बिकिनी'शी करत टीका केली. यावर कृति सेननने आपल्या पोशाखाच्या निवडीचे समर्थन करत टीकाकारांना उत्तर दिले. दरम्यान, राहुल गांधी यांनीही कृति सेननच्या समर्थनार्थ भूमिका घेत महिलांनी काय परिधान करायचे हा त्यांचा स्वतःचा अधिकार असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावरील वाद आणखी तीव्र झाला. (GIVA Raksha Bandhan Ad)
 
वाढता वाद पाहता अखेर गिवाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर निवेदन जारी करत भूमिका स्पष्ट केली. कंपनीने सांगितले की, हा प्रचार रक्षाबंधनातील प्रेम आणि नात्यांचा उत्सव कुटुंबातील पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. कोणाच्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, असेही कंपनीने स्पष्ट केले.(GIVA Raksha Bandhan Ad)
 
आपल्या निवेदनात त्यांनी पुढे भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दलची आपली निष्ठा व्यक्त केली. कंपनीने म्हटले की, कुटुंबासोबत आनंद साजरा करण्यावर त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे. जर या जाहिरातीमुळे नकळत समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याचा आदर राखत ही जाहिरात सर्व प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे हटवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत सकारात्मकतेचा संदेशही दिला. (GIVA Raksha Bandhan Ad)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर