सिद्धेशची स्वरसिद्धी...

    26-Aug-2026
 
 Siddhesh Tendolkar
 
जन्मजात दृष्टिहीनतेचे आव्हान स्वीकारत, ऐकलेल्या सुरांना स्पर्शाची साथ देत स्वतःचे एक स्वरविश्व घडवणार्‍या सिद्धेश विजय तेंडोलकर याच्याविषयी...
 
सूर मनातच असतो, त्याला फक्त बाहेर येण्याची वाट पाहावी लागते. कधी घराच्या अंगणात ऐकू आलेली एखादी धून मनात घर करते, कधी कुणाच्या वादनातून उमटलेला स्वर बराच वेळ मनाभोवती घुटमळत राहतो. त्यातूनच कलेची ओढ लागते. सुरुवातीला हात चाचपडतो, कान शोध घेतो; पण रोजच्या रियाजाने हळूहळू स्वर आपलेसे होतात. बोटे मग वेगळ्या भाषेत बोलतात. त्या भाषेत आठवणी असतात, अनुभव असतात, आनंद-दुःखाचे रंग असतात. या कलेच्या मुळाशी तिची श्रीमंती जाणवते. एखादा स्वर सहज उमटतो आणि ऐकणार्‍याच्या मनात घर करतो; तीच कलाकाराची खरी कमाई! आपल्या वाट्याला आलेल्या जगण्यातून स्वरविश्व साकारणारा कलाकार म्हणजे सिद्धेश विजय तेंडोलकर!
 
मुंबईच्या भायखळ्यात सिद्धेशचा जन्म. घर मध्यमवर्गीय मराठी; संसाराची घडी साधीच. वडील पोस्टात नोकरीला, आई गृहिणी आणि एक बहीण. या घरात संस्कारांची श्रीमंती होती. जन्मतःच दृष्टिहीनता नशिबी आल्याने सिद्धेशच्या बालपणीचे अवकाश वेगळेच होते. अंगणात इतर मुलांचे खेळ रंगताना, त्याच्या वाट्याला अनेकदा एकांतच आला. खेळगडी लाभले नाहीत; तरी कान मात्र जागे होते. पुढे वरळीच्या ‘हॅप्पी होम अ‍ॅण्ड स्कूल फॉर ब्लाईंड’मध्ये त्याचे शिक्षण सुरू झाले. तेथे समवयस्कांची सोबत मिळाली, मैत्रीची ऊब मिळाली आणि एकटेपणाला हळूहळू संगत लाभली. शाळेच्या सहवासाने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत गेला.
 
सिद्धेशच्या घरात अध्यात्म होते. वडील विजय तेंडोलकर कीर्तनकार. दादरच्या ‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’तून त्यांनी ‘कीर्तनालंकार’ ही पदवी संपादन केली होती. त्यामुळे घरात अभंग, नामस्मरणाचा अखंड प्रवाह असे. त्यातूनच सिद्धेशमध्ये संगीताची ओढ रुजली. शाळेत तो समूहगायनात सहभागी होऊ लागला आणि शाळेनेही त्याच्यातील कलेला प्रोत्साहन दिले. मात्र, त्याचे कान हार्मोनिअमकडेच अधिक असत. पेटीतून स्वर कसे निघतात, बोटांचा स्पर्श होताच कोणती जादू घडते, याचे त्याला कुतूहल. मात्र, शिकण्याच्या ओढीला अजून मार्ग मिळायचा होता.
 
भजनातूनच हा मार्ग सापडला. वडिलांबरोबर भजनाला गेल्यावर तिकडची हार्मोनिअम सिद्धेशला हाताळता येऊ लागली. त्याची बोटे तिच्यावरून फिरत, स्वर कानात साठत. तिची आकृती तो स्पर्शाने जाणून घेई आणि तिचा आवाज ऐकून, तिचे जग मनात उभे करत असे. दृष्टीसमोरचे चित्र त्याच्यासाठी शयच नव्हते; म्हणून स्पर्श आणि श्रवण हेच त्याचे डोळे झाले. इतरांचे वादन तो लक्ष देऊन ऐके. एकेक स्वर मनात ठेवून घेई आणि पुन्हा संधी मिळताच, त्या स्वरांचा शोध घेई. एक स्वर चुकला की, पुन्हा सुरुवात; एखादी चाल नीट लक्षात राहिली नाही की, पुन्हा ऐकणे. कानाने ऐकायचे, मनात साठवायचे आणि स्पर्शाने त्याचा माग काढायचा, हीच त्याची शिकवणी. दिवसेंदिवस हा सराव वाढत गेला आणि हळूहळू स्वर ओळखीचे वाटू लागले, हाताला आत्मविश्वास आला आणि हार्मोनिअमही आपलीशी वाटू लागली. आवडीला चिकाटीची साथ मिळाली की, अवघड वाटाही चालत जाता येतात; हेच खरे.
 
पुढे विल्सन महाविद्यालयातून सिद्धेशने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि रामनारायण रुईया महाविद्यालयातून मराठी साहित्यशास्त्राची पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाची धावपळ वाढली, तरी हार्मोनिअमशी जुळलेले त्याचे नाते कायम राहिले. रुईयाच्या विभागीय कार्यक्रमांत त्याने अनेकदा साथसंगत केली.
 
भजन-कीर्तनाची साथही पुढे विस्तारत गेली. आजवर जवळपास २०० ते २५० कीर्तनांना त्याने हार्मोनिअमची साथ केली आहे, तर भजनांची संख्याही २००च्या घरात आहे. या प्रवासात ‘पियानिका’ वादनाची कलाही त्याने आत्मसात केली. अलीकडे तुतारीचे सूरही त्याने शिकून घेतले. सध्या जांभेकर महाराज मठातील संगीत विद्यालयात तो संगीतशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ज्या स्वरांनी त्याला पुढे नेले, तेच स्वर आता तो विद्यार्थ्यांच्या हाती सोपवत आहे.
 
"माझी कला स्वसाधनेतून आली असून, ती आत्मानंदासाठीच आहे,” असे सिद्धेश सांगतो. या साधनेने त्याला कलेचा आनंद दिलाच; त्याचबरोबर स्पर्धेच्या जगात उदरभरणासाठीचे स्वावलंबनही दिले. याविषयी त्याच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. दैवाने समोर ठेवलेले आव्हान स्वीकारत, आपल्या सुरांची शिदोरी घेऊन तो पुढे चालत राहिला. आज त्या सुरांत त्याचा आनंद आहे आणि त्याच सुरांतून दुसर्‍यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याची ऊर्मीही आहे. स्वतःसाठी जपलेली कला इतरांपर्यंत पोहोचवण्यातच तिचे खरे सार्थक दडलेले आहे, याची जाणीव त्याच्या साधनेतून होते. सिद्धेश तेंडोलकर याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर
(अधिक माहितीसाठी संपर्क - ८१६९३५१३०८)




संबंधित मजकूर