सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’चा टिझर प्रदर्शित!

    25-Aug-2026
 
 
 
 

tuzya aaila मुंबई -(Sujay Dahake) पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत निर्मित ‘तुझ्या आयला’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. 
 
 
अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘तुझ्या आयला’च्या टिझरचे अनावरण करत सुजय डहाके यांच्या अनोख्या खेळाचे कौतुक केले आहे. याविषयी बोलताना अमृताने सांगितले, सुजय डहाके यांच्या कोणत्याही चित्रपटाची पहिली झलक कायमच एक वेगळीच उत्सुकता निर्माण करते. तुम्ही त्यांच्या चित्रपटाचा टिझर प्ले करता आणि अवघ्या १० सेकंदांत त्यांच्या विश्वात पूर्णपणे गुरफटून जाता — असं विश्व, जिथे ते स्वतःला कोणत्याही आडपडद्याशिवाय, कोणतीही तडजोड न करता मांडताना दिसतात. ‘तुझ्या आयला’चा टिझर पाहताना मलाही अगदी असंच जाणवलं. हा टिझर थेट भिडतो. त्यामुळे आता उत्कंठेने खिळवून ठेवणाऱ्या अनुभवासाठी सज्ज व्हा, कारण ‘तुझ्या आयला’ तुम्हाला थेट तुमच्या बालपणीच्या एका आठवणीच्या कोपऱ्यात घेऊन जाणारा वाटतोय — रॉ, नॉस्टॅल्जिक, गोंधळाने भरलेला आणि तरीही मनाच्या अगदी जवळचा. (Sujay Dahake)
 
'शाळा', 'श्यामची आई' यांसारखे आशयघन चित्रपट बनविणाऱ्या सुजय डहाके यांनी 'तुझ्या आयला' या चित्रपटाद्वारे एक अनोखे धाडस केले असून, हा चित्रपट अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आधारित आहे. टिझर खूप उत्कंठावर्धक आहे. शीर्षकाची सुरुवात शाब्दिक हिंसेने होत असली तरी हा खेळ नेमका कोणता आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता 'तुझ्या आयला'चा टिझर पाहिल्यावर जागी होते. 'शिवी नाय खेळाचं नाव हाय ते' ही शीर्षकासोबत असलेली टॅगलाइन चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करणारी आहे.
'तुझ्या आयला'बाबत दिग्दर्शक सुजय डहाके म्हणतात की, 'शाब्दिक हिंसेने मला नेहमीच भुरळ घातली आहे आणि त्रास दिला आहे. आज हे आपल्या संस्कृतीत सामान्य झाले आहे, तरीही त्याचा प्रभाव खोलवर आहे. विशेषत: ते शब्द जेव्हा आपल्यासाठी प्रेम आणि आदराची मूर्ती असलेल्या आईबद्दल वापरले जातात, तेव्हा अशा भाषेच्या मुळांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या चित्रपटाद्वारे, मला शब्दांची शक्ती आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान यावर ऑफलाइन आणि डिजिटल दोन्ही ठिकाणी चर्चा सुरू करायची आहे.'
पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर, मोहित अरोरा आणि मेघना प्रमाणिक सहनिर्माते आहेत.(Sujay Dahake)
 
या चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्या प्रमुख भूमिका असून, अनेक गुणी बालकलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Sujay Dahake)
 
 
 




संबंधित मजकूर