कल्याण (Nandivli Lake Deep Cleaning) : गेल्या महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. केडीएमसी, वारकरी समाज, स्वच्छ भारत टीम आणि सुमित एल्कोप्लास्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेली विशेष 'डीप क्लीनिंग' मोहीम सोमवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, तलावाचा परिसर आता चकाचक झाला आहे.(Nandivli Lake Deep Cleaning)
या मोहिमेत तलावाच्या पाण्यात तसेच तलाव परिसरात साचलेला मोठ्या प्रमाणातील कचरा बाहेर काढण्यात आला. यामध्ये नारळ, पूजेचे साहित्य, निर्माल्य तसेच नागरिकांकडून येता-जाता टाकण्यात आलेला विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. हा संपूर्ण कचरा तलावातून बाहेर काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली.(Nandivli Lake Deep Cleaning)
या स्वच्छता मोहिमेत कल्याण शहर वारकरी समाजाचे मृत्युंजय शुक्ला यांचा विशेष पुढाकार आणि सातत्यपूर्ण सहभाग राहिला. महिनाभर चाललेल्या या मोहिमेत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेच्या कामाला मोठी चालना दिली. तलाव स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे.(Nandivli Lake Deep Cleaning)
सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान...
तलावातून बाहेर काढण्यात आलेला कचरा परिसरात साठून राहू नये, यासाठी सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांनी कचरा आपल्या वाहनांमध्ये भरून तो योग्य ठिकाणी नेण्याची जबाबदारी पार पाडली. तलावाच्या आतील भागातून तसेच तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातून जमा करण्यात आलेला कचरा वाहून नेण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने सहभाग घेतला. त्यामुळे तलावातील कचरा बाहेर काढण्याबरोबरच त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेलाही हातभार लागला.(Nandivli Lake Deep Cleaning)
महिनाभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नांदिवली तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत दिसू लागला आहे. मात्र, तलावाची स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनीही तलावात निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य अथवा कोणत्याही प्रकारचा कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Nandivli Lake Deep Cleaning)
धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नांदिवली तलावाच्या स्वच्छतेची ही मोहीम ‘स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे’ हा संदेश अधोरेखित करणारी ठरली आहे.(Nandivli Lake Deep Cleaning)