‘जेन झी’ आणि पूर्वीच्या पिढ्यांमधील महत्त्वाचा फरक ‘स्ट्रेस’च्या प्रमाणात नसून, तो ओळखण्याची आणि व्यक्त करण्याची भाषाच बदलली आहे, यात असू शकतो. पूर्वी एखादा तरुण ‘माझं काही ठीक चाललेलं नाही,’ एवढेच म्हणत असे. आजचा तरुण ‘मी पूर्णपणे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकलो आहे, माझ्यावर खूप ताण आहे; मला हे सगळं पेलवत नाही,’ असे अधिक स्पष्टपणे सांगू शकतो. या बदलाकडे लगेच आजची पिढी अधिक संवेदनशील झाली आहे, म्हणून पाहणे योग्य नाही.
मानसिक त्रासाला नाव देणे म्हणजे, तो निर्माण करणे नव्हे. उलट, अनेकदा त्याची जाणीव होणे आणि त्यासाठी मदत शोधण्याची पहिली पायरी असते. त्यामुळे ‘जेन झी’ आपला ताण अधिक व्यक्त करते, म्हणून ती कमी लवचिक आहे, असा निष्कर्ष काढण्यापूर्वी आपण स्वतःला एक अधिक मूलभूत प्रश्न विचारायला हवा, पूर्वीच्या पिढ्यांनी ताण कमी अनुभवला होता की त्यांनी तो कमी व्यक्त केला होता?
माहितीचा अतिरेक :
ज्ञान की मानसिक भार?
माहिती ही शक्ती आहे, पण तिचा अतिरेक झाला, तर ती ज्ञान न राहता, मानसिक भार बनू शकते. पूर्वीच्या पिढ्यांना जगाच्या प्रत्येक कोपर्यात घडणार्या घटनांची तत्काळ माहिती मिळत नसे. आज मात्र एका छोट्याशा स्क्रीनवर काही क्षणांत संपूर्ण जगाची अस्थिरता आपल्या डोळ्यांसमोर येते. एखाद्या तरुणाने सकाळी परीक्षेचा निकाल पाहावा, त्यानंतर बेरोजगारीची बातमी, पुढे युद्धाचे दृश्य, हवामानबदलाची चिंता आणि त्याचवेळी मित्राच्या यशाची पोस्ट या घटना प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यात घडलेल्या नसल्या, तरी त्या त्याच्या मानसिक जगात प्रवेश करतात. यालाच ‘माहितीचा अतिभार’ (इन्फॉर्मशन ओव्हरलोड) म्हणता येईल.
प्रश्न केवळ माहिती किती मिळाली, याचा नाही; तर मेंदू त्या माहितीवर भावनिक प्रक्रिया कशी करतो, याचा आहे. मानवी मेंदू संभाव्य धोका दर्शविणार्या माहितीला विशेष प्राधान्य देतो. त्यामुळे सतत निराशाजनक बातम्या आणि संकटांच्या दृश्यांच्या संपर्कात राहिल्याने जग वास्तवापेक्षा अधिक अस्थिर, धोकादायक किंवा हताश वाटू शकते. ‘जेन झी’साठी ही जाणीव विशेष महत्त्वाची आहे. कारण, आज माहितीपासून दूर राहणे कठीण आहे; पण तिच्याशी निरोगी अंतर राखणे शिकणे शय आहे.
प्रत्येकाच्या हातात जगाचा आरसा
पूर्वी तरुणाची तुलना त्याच्या वर्गातील विद्यार्थी, मित्र, शेजारी किंवा नातेवाईकांपुरती मर्यादित असे. आज मात्र तुलना करण्यासाठी संपूर्ण जग स्क्रीनवर उपलब्ध आहे. कोणीतरी परदेशात शिकत आहे, कोणीतरी स्टार्टअप सुरू केले आहे, कोणीतरी घर घेतले आहे, तर कोणीतरी प्रसिद्ध झाले आहे. ही माहिती अधूनमधून येत नाही; ती दिवसभर आपल्या स्क्रीनवर येत राहते. त्यांचे यश दिसते; त्यामागचा संघर्ष दिसत नाही. परिणाम दिसतो; त्यामागची वर्षे दिसत नाहीत. आणि मग एक आत्मसन्मानाला तडा जाणारा विचार मनात येऊ शकतो, "सगळे पुढे जात असताना, फक्त मी का मागे आहे?” म्हणून समाजमाध्यमांबद्दलचा महत्त्वाचा प्रश्न केवळ "मी किती वेळ ऑनलाईन असतो,” हा नाही; तर "समाजमाध्यमे वापरल्यानंतर मला स्वतःबद्दल काय वाटते,” हा आहे.
ऑनलाईन संपर्क आणि एकटेपणा :
एक आधुनिक विरोधाभास
‘जेन झी’ ही कदाचित सर्वाधिक जोडलेल्या पिढ्यांपैकी एक आहे; तरीही ऑनलाईन संपर्क आणि भावनिक जवळीक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सतत संदेश, लाईस आणि नोटिफिकेशन्स मिळत राहणे, म्हणजे मनापासून आपलेपणा किंवा समजून घेतले गेल्याची भावना निर्माण होईलच, असे नाही. एखाद्या व्यक्तीशी दिवसभर ऑनलाईन संपर्कात राहता येईल; पण त्याच व्यक्तीजवळ बसून "मला आज खूप वाईट वाटत आहे,” असे व्यक्त होता येणे, ही अधिक महत्त्वाची मानसिक गरज आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अभ्यासात किशोरवयीन मुलांमध्ये कुटुंब आणि मित्रांचा आधार मानसिक स्वास्थ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हेही अधोरेखित झाले आहे.
त्यामुळे प्रश्न ‘तंत्रज्ञान चांगले की वाईट,’ हा नाही. तंत्रज्ञान जसे संपर्काचे साधन होऊ शकते, तसे ते सामाजिक तुलना वाढवणारे, माहिती देणारे किंवा कधी वास्तवापासून तात्पुरता विरंगुळा देणारे माध्यमही ठरू शकते. म्हणून खरा प्रश्न तंत्रज्ञानाचा वापर आपण कशासाठी करतो आणि त्यानंतर आपल्याला स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जगाबद्दल कसे वाटते, हा अधिक महत्त्वाचा मानसशास्त्रीय प्रश्न आहे.
जगाच्या भविष्याचीही चिंता
‘जेन झी’च्या मानसिक जगात चिंता केवळ स्वतःच्या भविष्यापुरती मर्यादित नाही. ‘नीट’सारख्या परीक्षेतील अनिश्चितता, बेरोजगारी किंवा करिअरची स्पर्धा यांसोबतच आर्थिक विषमता, सामाजिक अन्याय आणि जगातील अस्थिरता यांची सतत जाणीव या पिढीला आहे. ही जागरूकता निश्चितच या पिढीची ताकद आहे. अनिश्चिततेचा धोका मोठा असतो, पण त्यावर आपले नियंत्रण अत्यल्प असल्याचे वाटते, तेव्हा असाहाय्यतेची भावना वाढते आणि त्यातून मानसिक ताण अधिक तीव्र होऊ शकतो.
‘जेन झी’ फक्त स्वतःच्या भविष्याची चिंता करत नाही; ती ज्या जगात आपले भविष्य घडणार आहे, त्या जगाच्या भविष्याचीही चिंता करते. माझ्या आयुष्याचे काय होईल, हा प्रश्न मग हळूहळू या जगाचे काय होणार, या मोठ्या चिंतेशी जोडला जातो. म्हणून ‘जेन झी’च्या समस्यांकडे पाहताना केवळ तिच्या वैयक्तिक अडचणींकडे पाहणे पुरेसे नाही.
मला जग बदलायचे आहे;
पण माझ्या हातात काही नाही
‘जेन झी’ स्वतःकडून मोठ्या अपेक्षा ठेवते; पण त्याचवेळी ती जगाकडूनही मोठ्या अपेक्षा ठेवते. अधिक माहिती, विविध अनुभव आणि जगाशी सतत जोडलेले राहण्याची संधी मिळाल्यामुळे या पिढीला, नैतिकता, आर्थिक विषमता आणि आपल्या कामाचा समाजावर होणारा परिणाम यांविषयी तीव्र जाणीव आहे. त्यामुळे तिच्या अपेक्षा केवळ वैयक्तिक यशापुरत्या मर्यादित राहात नाहीत; तिला अधिक न्याय्य, पारदर्शक आणि संवेदनशील व्यवस्था अपेक्षित असते. ही अपेक्षा तिची ताकद आहे.
‘नीट’सारख्या परीक्षेभोवती निर्माण झालेला असंतोष याचसंदर्भात पाहता येतो. एखाद्या तरुणासाठी मी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे तयारी केली; मग व्यवस्था माझ्या प्रयत्नांना न्याय देईल का, हा प्रश्न त्यामागे उभा राहतो. अशा वेळी ‘जंतरमंतर’सारख्या सार्वजनिक जागी व्यक्त होणारा आक्रोश हा केवळ एका परीक्षेच्या निकालाविषयीचा संताप नसतो; तो आमचे भविष्य ज्या व्यवस्थेच्या हातात आहे, ती व्यवस्था आमच्याशी न्याय्य वागत आहे का, या अधिक मूलभूत प्रश्नाचा सार्वजनिक अविष्कार असतो.
तरुणाला बदल हवा असतो; परंतु बदल घडविण्याची त्याची प्रत्यक्ष क्षमता मर्यादित असते. आणि म्हणूनच, ‘जेन झी’चा ‘स्ट्रेस’ आपल्या वैयक्तिक भविष्याबरोबरच त्या भविष्याची निर्मिती करणार्या व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न बनतो.
-डॉ. शुभांगी पारकर