धारणीय वेग भाग-२१

सद्वृत्त पालनाचा रामबाण उपाय!

Sustainable velocity, adherence to good conduct
 
 
गेल्या २० भागांमध्ये आपण विविध धारणीय वेगांची माहिती करुन घेतली. आज ‘धारणीय वेगा’च्या लेखामालेचा समारोप करताना, त्यावरील एकंदरीत उपाययोजनांसाठी नियमित दिनचर्या आणि ऋतुचर्येतील सद्वृत्त पालनाचा उपाय रामबाण ठरु शकतो. त्याविषयी..
 
रणीय वेग एवढे का महत्त्वाचे आहेत? त्यांना थोपविले नाही तर काय होते? इत्यादींबद्दल सविस्तर माहिती मागील २० लेखांमधून आपण घेतली. स्वास्थ्याची परिभाषा बघताना केवळ शारीरिक स्वास्थ्य त्यात अभिप्रेत नाही. त्याबरोबरच मानसिक-बौद्धिक आणि सामाजिक स्वास्थ्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे सगळे एकाच ध्येयाचे विविध पैलू आहेत, एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांवर त्यांचा चांगला प्रभाव किंवा दुष्परिणाम होतो. उदा. शारीरिक दुखापत झाल्यास (Fracture झाल्यास) रोजच्या दैनंदिन जीवनातल्या हालचालींवर प्रतिबंध बसतो आणि अशा वेळेस त्या व्यक्तीची चिडचिड वाढते. चेहर्‍यावर मुरमं आली की तरुण-तरुणी निराश होतात. तसेच, परीक्षेच्या काळात रात्री जागरण, अति उपाशी राहण्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो. जितका अधिक मानसिक ताण परीक्षेचा घेतला जातो, तेवढा अधिक पचन संस्थेवर परिणाम होताना दिसतो. जुलाब होणे, शौचास साफ न होणे, आव पडणे इ. तक्रारी सुरू होतात.
 
मानसिक ताणाची वेगवेगळ्या वयोगटांमध्ये कारणे भिन्न-भिन्न असतात. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या तोंडून ‘मला खूप टेन्शन आहे/आलंय’ अशा आशयाचे बोल आपण ऐकतच असतो. डेडलाईन्सवर काम करताना भूक-तहान-झोप हरपून जाते. झोपेचा आणि आकलनशक्तीचा खूप जवळचा संबंध आहे. झोप अपूर्ण किंवा संपूर्ण अभाव असतेवेळी परिसरातील घडामोडींचे आकलन चटकन होत नाही. गोंधळलेल्या अवस्थेत आपण राहतो. अशा परिस्थितीत घेतलेले निर्णय चुकीचे असू शकतात.
 
आपल्या परिसरात दंगा/दंगल/अपघात इ. काही घडले, ज्याच्याशी आपला काहीही प्रत्यक्ष संबंध नाही; पण ते ऐकले-बघितले की अनामिक भीती, राग, चीड इत्यादींपैकी विविध भावनांचा उद्रेक मनात होतो. याचाच अर्थ ‘माणूस हा सामाजिक प्राणी आहे’ या वाक्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि जशी आपली त्या त्या परिस्थितीला प्रतिक्रिया असते, त्यावरून आपली मानसिक बैठक आणि स्थिरता लक्षात येते. एका पैलूला इतरांपासून विलग करता येत नाहीत. जसे शरीर म्हटले की, त्यात हात-पाय-पोट इ. सगळ्या अंग अवयवांचा समावेश होतो, तसेच आरोग्य म्हटले की, या सगळ्या पातळींवर स्वास्थ्य प्रस्थापित करणे, टिकवणे, रक्षण करणे आलेच.
 
आयुर्वेदाप्रमाणे धारणीय वेगांचे धारण केल्याने, नियमांचे पालन केल्याने मन-वचन (वाक्/वाचा) व कर्म पापरहित होतात, शुद्ध होतात, ज्याचा फायदा आरोग्यप्राप्तीसाठी दीर्घायु आणि दर्जेदार जीवन जगण्यासाठी होतो. मानसिक ताण, धारणीय वेगांचे धारण जर केले नाही, तर विविध जीवनशैलीचे आजार लवकर जडतात. पूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, टक्कल पडणे, केस पिकणे, ऐकू कमी येणे, दृष्टिमांद्य, मोतीबिंदू इ. आजार ८०व्या वर्षानंतर व्हायचे. हल्ली या आजारांची लगण चाळीशीतच बहुतांशी वेळा होताना दिसते. आपल्या चुकीच्या सवयी, दिनचर्येमुळे आपल्या स्वास्थ्याला धोका निर्माण होतोय. वयोमर्यादा तर वाढली आहे; पण औषधोपचारांवरचे अवलंबित्वही वाढले आहे, याचा आर्थिक भारही बरेचदा डोईजड होतो. हे काही अंशी टाळणे, विलंबावर ढकलणे शक्य आहे.
 
नियमित दिनचर्या आणि ऋतुचर्या यातील नियमांचे पालन सद्वृत्त पालन हेच या सगळ्यांवर उपाय आहेत. सद्वृत्तांमध्ये वैयक्तिक शुद्धी (शौचशुद्धी) बरोबरच नैतिक, सामाजिक, व्यावहारिक आणि मानसिक वर्तन येते. वैयक्तिक (शारीरिक शुद्धता) यामध्ये चांगल्या सवयी, आंघोळ, नखं-केसांची निगा, आहाराची नियमितता, झोपेची नियमितता, व्यायाम इ.चा समावेश होतो. व्यावहारिक सद्वृत्त (नैतिक-सामाजिक) यात प्रामाणिकपणा, परिसर स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, अवाजवी हिंसा न करणे (शारीरिक-मानसिक-शाब्दिक) आणि इतरांचा आदर-सन्मान इ. गोष्टींचा समावेश होतो. नेहमी लक्षात ठेवावे की, अधिकारांबरोबर कर्तव्येही येतात. समाजभान, बांधिलकी राखणे, जपणे हे अत्यंत महत्त्वाचे. स्वतःच्या स्वास्थ्यासाठी समाजाचे सकारात्मक स्वास्थ्य राखणे गरजेचे आहे.
 
धारणीय वेगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी, विजय प्राप्त करण्यासाठी, मनावर, त्याच्या विचारांवर सकारात्मक प्रभाव असणे, आणणे गरजेचे आहे. जसे सुंदरता ही प्रत्येकाला भिन्न भिन्न गोष्टींमध्ये वाटू शकते. कुणाला डोंगर-दर्‍या आवडत असतील, तर कुणाला अथांग समुद्र. कुणाला घरातच राहून छानसे गाणे, लेख, पुस्तक वाचण्यात आनंद वाटत असेल, कुणाला स्वयंपाक तर कुणाला बागकाम. योगाभ्यासातही हठयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, अष्टांग योग इ. विविध मार्ग आहेत. त्याचप्रमाणे मनाला आवडणारी, रुचणारी गोष्टी हीदेखील वेगवेगळी असू शकते. काहींना पूजा-अर्चा करण्यात आनंद मिळत असेल, कुणाला स्वच्छतेत, कुणाला एकांत प्रिय असतो, तर कुणाला प्रवास आणि सहवास आवडत असेल. थोडक्यात काय, तर ज्यामध्ये मनाला शांती मिळेल, ज्याने सकारात्मक भाव उत्पन्न होतील, ज्याने पुढचे क्षण-दिवस आयुष्य जगण्यामध्ये रस उत्पन्न होईल, त्या कृती/क्रिया कराव्यात. पण, त्याचा इतरांना अपाय, त्रास होणार नाही ना, याचे भान राखूनच करावे.
 
बरेचदा इतरांकडून अपेक्षा केली जाते. मुलांकडून आई-वडिलांच्या काही अपेक्षा असतात, शिक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा असतात. प्रत्येक नात्यात अपेक्षा असते. यामध्ये इतरांकडून आपल्याला हवे तसे बदल घडणे, याची वाट बघितली जाते. हवे तसे परिणाम मिळाले नाहीत, तर त्या नात्यात कटुता, निराशा, मन दुखावणे इ. घडते. प्रत्येक व्यक्तीने हे कायम लक्षात ठेवावे की ‘मी सांगेन ती पूर्व दिशा’ हे प्रत्येक वेळेस प्रत्येक नात्यात लागू होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा इतरांकडून काहीही अपेक्षा केली, तर ती पूर्ण होईल, याची ५० टक्के फक्त शक्यता असते, ५० टक्के ते पूर्ण होणार नाही. इतरांनी कसे राहावे, पेहराव करावा, बोलावं, खावे, घरच्या मोठ्यांनी जरी खूप मायेने, प्रेमाने सांगितले, तरी तसे दर वेळेसच होईल, असे नाही. आणि तसे झाले नाही की मनोद्वेग होतो. चिडचिड किंवा मन हताश होते. यावर उत्तम उपाय म्हणजे, ‘नेकी कर और दर्या में डाल|’ आपण आपले सद्वर्तन, चांगले-वाईट सांगण्याचे दाखविण्याचे काम करत राहावे. ज्याला जितके जमेल, पटेल, तेवढे ती व्यक्ती आत्मसात करेल. ‘माझे ऐकले नाही’ यातील ‘मी’ सोडून द्यावा. तो सोडल्यास दुःख आणि अन्य भावनांचा उद्रेक होणार नाही.
 
भारतीय परंपरेनुसार विविध जीवनातील अवस्था (बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था) या आयुर्वेदीयदृष्ट्यादेखील लागू होतात. प्रत्येक अवस्थेत शरीर-मन-बुद्धीची अवस्था, प्रगती, आकलनाची मर्यादा, खोली भिन्न भिन्न आहे. जसे शरीर-बुद्धी बदलते, तसे मनानेही प्रगल्भता येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विरक्तीदेखील हळूहळू यावी. संपूर्ण आयुष्य एकाच पद्धतीने न घालवता, आपल्या कृती-विचार आणि जाणिवा यामध्ये शुद्धता, तीव्रता आणि नम्रता येणे गरजेचे आहे. स्वीकृती येणे गरजेचे आहे. सौम्यता सोडून देणे शिकणे महत्त्वाचे आहे.
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)




वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
संबंधित मजकूर