समाजासाठी ‘सत्-कर्म’!

    25-Aug-2026   
Dattatray Sawant Social Work
 
सामान्य पातळीवर असामान्य कार्य करणारे मूळचे पुण्याचे; पण मुंबईत स्थायिक झालेले दत्तात्रय सावंत. त्यांच्या कार्य-विचारांचा मागोवा घेणारा हा लेख...
 
दत्तात्रय सावंत विनाअनुदानित शाळेत पेशाने शिक्षक. ते रिक्षाही चालवत. ‘कोरोना’ काळात सगळे जग हादरले. अशा वेळी कसलीही, अगदी जीवाचीही पर्वा न करता ते सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावले. रिक्षाला छोट्या रुग्णवाहिकेचे स्वरूप देत, हजारो लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. अक्षरशः शेकडो लोकांना जीवदान मिळाले. हे सगळे कार्य ते विनाशुल्क करत होते. कोणत्या पारितोषिकासाठी किंवा मोबदल्यासाठी त्यांनी हे केले नव्हतेच. मात्र, समाज सगळे पाहत असतो. समाजाने दत्तात्रय यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. त्यांच्या या निःस्वार्थी कार्याची दखल घेऊन दि. २५ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निर्भीड आणि निष्पक्ष कार्यासाठी अनेक सन्मान प्राप्त झाले. अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही ‘कोरोना वॉरियर’ म्हणून त्यांची मुलाखत घेतली, तर अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावरून त्यांच्या कार्याचे समर्थन केलेच.
.
‘कोरोना’ काळात दिवसरात्र समाजासाठी काम करताना त्यांना समाजातील इतर समस्यांचीही जाणीव झाली. समाजात अनेक प्रश्न आहेत. मात्र, समाजात अनेक गुणवंत-होतकरू लोकही आहेत. त्यांना वेळीच सहकार्य केले, तर समाजाचे स्वरूप पालटू शकते, असे दत्तात्रय यांना वाटले. त्यामुळेच दत्तात्रय यांनी अनुज नरेंद्र नरुला यांच्या साथीने दि. २५ ऑक्टोबर २०२१ ‘सत्-कर्म फाऊंडेशन’ची स्थापना केली. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत ‘सत्-कर्म’च्या माध्यमातून दत्तात्रय कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईतील घाटकोपर झोपडपट्टी भागातील अशा २० गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले आहे. एकल पालक म्हणजे ज्यांचे पितृछत्र हरपले आहे, शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांची शाळेची आणि शिकवणीची संपूर्ण फी संस्थेच्या माध्यमातून भरली जाते. या मुलांसाठी दर रविवारी विशेष वर्गाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये योग, संगणक वर्ग आणि ‘इंग्लिश विंग्लिशी’ संस्थेच्या मदतीने इंग्रजी संभाषणवर्ग आयोजित करण्यात आले आहे. त्याचसोबत गरीब महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी मोफत शिलाई मशीन आणि पिठाच्या गिरण्यांचे वाटपही ते करतात.
 
आदिवासी पाड्यामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दत्तात्रय काम करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शहापूर भागातील अत्यंत दुर्गम अशा कौतेवाडी, भाल्याचीवाडी यांसारख्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष असते. या गावामध्ये दत्तात्रय टँकरद्वारे मोफत पाण्याचा पुरवठा करतात. रायगड जिल्ह्यातील वागणीचीवाडी आदिवासी पाड्यांवरील शाळा बांधकामासाठी त्यांनी आर्थिक योगदान दिले. ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील किन्हवली, भाबळे आणि कातकरी वस्ती यांसारख्या दुर्गम आदिवासी भागांत ते संस्थेच्या माध्यमातून सातत्याने कल्याणकारी कार्य करत आहेत. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन्स’ या संस्थेच्या माध्यमातून अंध आणि दिव्यांग व्यक्तींना अगरबत्ती बनवण्याचे कच्चे साहित्य पुरवून त्यांना ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे कार्यही करतात. समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी दत्तात्रय अहोरात्र झटतात.
 
अशा सेवाभावी, निःस्वार्थी भावाने समाजकार्य करणार्‍या दत्तात्रय यांचा जीवनपट पाहू. मराठा समाजाचे सावंत कुटुंब मूळचे भीमाशंकर, पुण्याचे. सावंत कुटुंब हे संयुक्त कुटुंब होते. या कुटुंबातील दामू आणि सीताबाई यांना पाच मुले. त्यांपैकी एक दत्तात्रय. दामू हे अत्यंत समाजशील. ते दिवसातील काही तास गावकर्‍यांच्या कामासाठी देत असत. वीजभरणा केंद्र, प्रशासकीय कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी होती. अनेक गावकर्‍यांना तिथे जाऊन पत्रव्यवहार करणे जमत नसे. दामू तालुक्याच्या गावी जात, तेव्हा या सगळ्यांची कामे निःशुल्क आणि निःस्वार्थीपणे करायचे. त्यांच्याकडे लोक अनेक समस्या घेऊन यायचे. हे सगळे दत्तात्रय पाहत असत. वडिलांचे समाजकार्य हे त्यांच्या रक्तातच उतरले.
 
लहानपणापासून दत्तात्रय यांना शिक्षक बनायचे होते. त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर त्यांनी ‘बीएड’चा कोर्स केला. कामानिमित्त मुंबईत आले आणि मुंबईच स्थायिक झाले. इथे अनेक वर्षे ते विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून रुजू होते. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. सकाळी शाळेत शिक्षक म्हणून काम करत आणि दुपारपासून रिक्षा चालवत असत. याच काळात त्यांचा विवाह जयश्री यांच्याशी झाला. अत्यंत समाजशील असलेल्या जयश्री यांनी त्यांना प्रत्येक स्तरावर साथ दिली. दत्तात्रय यांना समाजकार्याची आवड होतीच. त्यासाठी ते छोटे-मोठे उपक्रम करायचे. पुढे ‘कोरोना’ काळात तर त्यांनी रिक्षाला अ‍ॅम्ब्युलन्स बनवून हजारो रुग्णांची सेवा केली. ते म्हणतात, ‘सत्कर्म’ करत राहणार. गोरगरीब गरजूंसाठी कार्य करताना आत्मिक समाधान लाभते. दत्तात्रय यांनी कुणाचीही प्रतीक्षा न करता स्वतःच्या पातळीवर उत्तुंग समाजकार्याचा पाया रचला आहे. त्यांचे कार्य-विचार समाजाला प्रेरणादायी आहेत.




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर