मुंबई - (Bhau Kadam)आपल्या विनोदी अभिनयाने नेहमीच खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम आता रंगभूमीवरही हास्याची मेजवानी घेऊन येत आहेत. नात्यांमधली गंमत, प्रेम आणि लग्नाभोवती फिरणाऱ्या भन्नाट प्रसंगांचा मनोरंजक अनुभव देण्यासाठी ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक सज्ज झाले आहे. या नव्या नाटकात अभिनेते भाऊ कदम एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. भाऊ कदम यांच्या विनोदी अभिनयाची खास शैली आणि नात्यांमधील गमतीदार प्रसंगांची सांगड या नाटकातून रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. नवनीत प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
स्वप्नील बारसकर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती डॉ. उमेश आजगांवकर आणि सचिन सुभाष अवस्थी यांनी केली आहे. मैथिली वारंग, सुजाता किरण, पुनम सरोदे परब, साकार देसाई आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात पाहायला मिळणार आहेत. तसेच या नाटकाला साई पियुष यांनी संगीत दिले आहे. हे नाटक नातेसंबंध, प्रेम आणि लग्न यांची विनोदी अंगाने मांडणी करत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा मनोरंजनाचा अनुभव देणार आहे. (Bhau Kadam)
नाटकाबद्दल अभिनेते भाऊ कदम म्हणाले , “‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नाटकाची कथा, संकल्पना खूपच गमतीदार आहेत. तसेच त्यातील प्रसंग प्रेक्षकांना हसवणारे आहेत. माझ्यासोबतची संपूर्ण कलाकारांची टीम उत्तम आहे. रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर काम करण्याचा अनुभव नेहमीच खास असतो आणि या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगासाठी मी खूप उत्सुक आहे.”
दिग्दर्शक संतोष पवार म्हणले , “‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक करताना विनोदासोबतच नात्यांमधील भावनाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाची कथा, कलाकारांची केमिस्ट्री आणि प्रसंगांची मांडणी यामुळे रंगमंचावर एकामागोमाग एक धमाल प्रसंग पाहायला मिळतील. प्रेक्षकांनी नाटकाचा आनंद मनापासून घ्यावा, हीच आमची इच्छा आहे. पुण्यातील शुभारंभाच्या प्रयोगासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत.” (Bhau Kadam)