मुंबई - (Raja Shivaji )मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकार अजय अडसूळ यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि बहुचर्चित ठरलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातील मुरार जगदेवां या भूमिकेमुळे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. मुरार जगदेवां आदिलशाही काळातील एक प्रभावशाली सरदार होते. त्यांचा संबंध विजापूरच्या आदिलशाही दरबाराशी होता. इ.स. 1630 च्या दशकात पुणे परिसरातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. इतिहासातील उल्लेखानुसार, पुण्यावर आदिलशाहीचा प्रभाव प्रस्थापित करण्याच्या काळात पुणे उद्ध्वस्त करून तेथे गाढवांचा नांगर फिरवण्याचा प्रसंग मुरार जगदेवांशी जोडला जातो.
अजय 'तरुण भारत'शी बोलताना म्हणाले कि, रोहन मापुसकर यांनी मला पहिल्यांदा पाहिलं आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाकडे बघूनच मला या कॅरेक्टरसाठी सिलेक्ट केलं. त्यांनी मला सांगितलं की, “तू या कॅरेक्टरमध्ये एकदम फिट बसतोस. तुझ्यावर हा रोल खूप नैसर्गिक वाटेल... त्यांचा माझ्यावरचा हा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे मीही लगेच होकार दिला. कारण तुमच्यात एखादं पात्र दिसणं, आणि त्या भूमिकेसाठी तुमची निवड करणं, ही कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट असते. ‘राजा शिवाजी’ साठी रोहन मापुसकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्या अभिनय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचं अजय म्हणाले.
(Raja Shivaji )
शिवाय रितेश देशमुख यांनीही मला या भूमिकेबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांना हा रोल कसा हवा आहे, याबद्दल स्पष्टपणे सांगितलं. दिग्दर्शक म्हणून त्यांची दृष्टी आणि समज मला खूप उपयोगी पडली. त्यामुळे त्या विश्वासाला न्याय देणं आणि हे पात्र प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं, ही माझी जबाबदारी होती असं हि यावेळी ते म्हणाले.
(Raja Shivaji )
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी अजय यांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकिर्दीची पायाभरणी केली. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘उदे गं अंबे’, ज्याची निर्मिती कोठारी व्हिजनने केली होती, या मालिकेतील त्यांच्या प्रभावी नकारात्मक भूमिकेने त्यांच्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या भूमिकेमुळे प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.(Raja Shivaji )
धारावीसारख्या सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या अजय यांनी मेहनत, सातत्य आणि अभिनयाची आवड यांच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. चित्रपटातील त्यांचा दमदार लूक सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत होता. लूकसाठी आणि भूमिकेसाठी घेतलेल्या त्याकनच्या मेहनतीचे सगळ्यांनी कौतुक केले.(Raja Shivaji )