पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमात राहुल गांधींनी ‘मनुस्मृती’चा संदर्भ देत, हिंदू संस्कृतीवर, जे बेताल आरोप केले, ते केवळ निंदनीय असेच. गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचे ‘रेटकार्ड’ वापरणार्या काँग्रेसला आणि महिला आरक्षणाला विरोध करणार्यांना स्त्रीसन्मानावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे राजकारण हे बिनबुडाचे आरोप करणे आणि समाजात हेतूतः दुही माजवणे, इथपर्यंतच मर्यादित आहे. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमात त्यांनी, देशातील ७० कोटी स्त्रीशक्तीच्या स्वप्नांना आई, बहीण आणि पत्नी या ‘मनुस्मृती’च्या बंधनात जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा, अत्यंत हास्यास्पद आणि हिंदू संस्कृतीला थेट लक्ष्य करणारा बेताल आरोप केला. एवढेच नाही, तर स्त्रियांनी ही तथाकथित ‘मनुस्मृती’ची बंधने तोडून टाकावीत, असा अनाहूत सल्लाही त्यांनी तरुणींना दिला. एकीकडे राहुल गांधी महिलामुक्तीचे जागतिक पुरस्कर्ते असल्याचा आव आणत असताना, दुसरीकडे याच कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसने कोट्यवधी रुपयांचे रेटकार्ड काढल्याचा खळबळजनक आरोप भाजपने पुराव्यांसह केला आहे. विद्यार्थ्यांच्या नावाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पैशांच्या आमिषाने भाडोत्री गर्दी जमवावी लागत असेल, तर राहुल गांधींच्या या संपूर्ण दौर्याचीच विश्वासार्हता काय, हा कळीचा प्रश्न उपस्थित होतो. विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला नाकारले, हेच यावरून स्पष्ट होते.
महिला सक्षमीकरण आणि पितृसत्ताक पद्धतीच्या विरोधाची राहुल गांधींची भूमिका किती बेगडी आणि तकलादू आहे, हे काँग्रेसच्या इतिहासाकडे पाहिल्यावर स्पष्ट होतेच. देशात अनेक दशके सत्ता उपभोगणार्या काँग्रेसनेच, संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला. तसेच, ते जाणीवपूर्वक प्रलंबितही ठेवले, हे देशातील महिला आजही विसरलेल्या नाहीत. राहुल गांधी महिलांना पितृसत्तेच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन करत आहेत; परंतु त्यांच्याच पक्षात महिलांची स्थिती काय आहे? अलीकडच्या काळात अनेक काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी, स्वपक्षातील नेत्यांवरच शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप केले. मात्र, त्याकडे राहुल गांधी सोयीस्करपणे डोळेझाक करतात. पितृसत्तेवर घसा फोडून बोलणार्या राहुल गांधींना हे विसरून चालणार नाही की, घराणेशाहीच्या राजकारणात स्वतः राहुल गांधींना पसंती देत, काँग्रेसने प्रियांका गांधी-वाड्रांना अनेक वर्षे मुख्य राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. हा कोणता स्त्रीसन्मान? काँग्रेसमधील पितृसत्तेचाच हा ज्वलंत पुरावा म्हणावा का?
पितृसत्तेच्या आणि शोषणाच्या नावाखाली राहुल गांधी सातत्याने, हिंदू संस्कृतीवर हल्ला करत आहेत. ‘मनुस्मृती’चा सोयीस्कर संदर्भ देऊन, ते हिंदू धर्मालाच स्त्रियांचा सर्वांत मोठा शत्रू ठरवण्याचा अत्यंत कुटिल डाव खेळत आहेत. वास्तविक, हिंदू संस्कृती ही स्त्री-पुरुष समानतेवरच आधारित आहे. इथे देव आणि देवी दोघांनाही समान पूजनीय मानले जाते. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ ही शिकवण देणार्या आणि स्त्रीला ‘आदिशक्ती’ मानणार्या संस्कृतीला, बदनाम करण्याचेच हे सुनियोजित षड्यंत्र. विशेष म्हणजे, पुण्यात राहुल गांधींच्या रंगमंचावर भिवंडीची एक मुस्लीम महिलाही उपस्थित होती. परंतु, तिथे राहुल गांधींनी हिजाब प्रथेवर, ‘तिहेरी तलाक’वर किंवा मुस्लीम महिलांच्या मूलभूत अधिकारांवर आणि त्यांच्यावरच्या अन्यायावर अवाक्षरही उच्चारले नाही. विशिष्ट धर्माच्या जाचक प्रथांबाबत सोयीस्कर मौन बाळगायचे आणि केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य करायचे, हा त्यांचा दुटप्पी धर्मनिरपेक्षतावाद देशातील जनतेच्या ध्यानी आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे आरोप करण्यातच, राहुल गांधींनी आजवर धन्यता मानली. तथापि, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, खर्या अर्थाने महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये प्राधान्य आणि सन्मान देण्याचे काम मोदी सरकारनेच केले आहे. देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर एका सामान्य कुटुंबातील आदिवासी महिलेला बसवण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय, मोदी सरकारचाच होता. सैन्यदलात महिलांसाठी दरवाजे अधिक रुंदावत ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमांमध्ये, लढाऊ महिला वैमानिकांना नेतृत्वाची संधी याच सरकारने दिली. आज भारताच्या कन्या लढाऊ विमाने उडवत आहेत, लष्कराचे नेतृत्व करत आहेत. मोदी सरकारने कृतीतून महिलांचे खर्या अर्थाने सक्षमीकरण करून दाखवले.
राहुल गांधींच्या पुण्यातील या कार्यक्रमाची तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जेन-झी संवाद कार्यक्रमाशी केली, तर दोघांच्याही वैचारिक पातळीतला आणि दृष्टिकोनातला फरक अतिशय स्पष्टपणे दिसतो. फडणवीस यांनी नुकताच तरुणांशी संवाद साधताना राज्याचा विकास, आधुनिक तंत्रज्ञान, रोजगार आणि भविष्यातील संधींबद्दल अतिशय विधायक भूमिका मांडली. त्यांनी तरुणांना प्रगतीचे आणि विकासाचे स्वप्न दाखवले. याउलट, राहुल गांधी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात केवळ द्वेष, जातीपातीचे राजकारण आणि समाजाला तोडणारा विद्ध्वंसक आणि चिथावणीखोर संदेश देतानाच दिसतात. तरुणांच्या मनात असंतोषाचे बीज पेरणे, हाच त्यांचा एकमेव अजेंडा उरला आहे. आणखी एक विरोधाभास म्हणजे, राहुल गांधींची ही ‘छात्रों की गुंज’ भाजपशासित राज्यांमध्येच का ऐकू येते? हिमाचल प्रदेश, तेलंगण किंवा कर्नाटक यांसारख्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये असे कार्यक्रम का होत नाहीत? त्यांना खरोखरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची काळजी असेल, तर झारखंडसारख्या राज्यात विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना, तेथील विद्यार्थी आंदोलनाला राहुल गांधींनी भेट का दिली नाही?
या सर्वच घटनांवरून आणि राहुल गांधींच्या विधानांवरून एकच निष्कर्ष निघतो की, विद्यार्थी आणि महिलांकडे केवळ एकगठ्ठा मतपेढी म्हणून पाहिले जात असून, त्यांना आपलेसे करण्यासाठीच चालवलेला हा उथळ राजकीय स्टंट आहे. समाजातील विविध घटकांमध्ये असंतोष पसरवून, हिंदू संस्कृतीला बदनाम करून सत्तेची पोळी भाजण्याचा काँग्रेसचा हा मनसुबा ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमातून पूर्णपणे उघडा पडला. मात्र, भारतातील आणि विशेषतः शिवछत्रपतींच्या व माता जिजाऊंच्या महाराष्ट्रातील जनता, आता पुरती सुजाण झाली आहे. विकासाला आणि स्त्रीसन्मानाला बगल देऊन चालवलेले हे रेटकार्डचे आणि समाजविच्छेदाचे राजकारण कदापि चालणार नाही, हे काँग्रेसने चांगलेच लक्षात ठेवावे.