मुंबई : (Puri Jagannath Temple) पुरी येथील श्रीजगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारातील दागदागिने आणि मौल्यवान वस्तूंची यादी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. श्रीजगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद पाढी यांनी सांगितले की, या दोन दिवसांच्या प्रक्रियेची तयारी सुरू झाली असून, ओडिशा सरकारने मंजूर केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे पार पडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील विविध धार्मिक उत्सव, विधी आणि देवतांच्या नित्यपूजेवर कोणताही परिणाम होऊ नये, याचा विचार करूनच या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. डॉ. पाढी यांनी सेवायत आणि भाविकांना या प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रत्नभांडारातील मौल्यवान दागिने आणि वस्तूंच्या नोंदणी व पडताळणीच्या सुरू असलेल्या मोहिमेचा हा पुढील टप्पा आहे. चलंती भांडाराची यादी प्रक्रिया पूर्ण झाली असून, बाहरा भांडाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या भितर रत्नभांडारातील दागिन्यांची मोजणी आणि ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. (Puri Jagannath Temple)
ही प्रक्रिया उच्चस्तरीय देखरेख समितीच्या नियंत्रणाखाली पार पडत आहे. यामध्ये रत्नतज्ज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तज्ज्ञ, अनुभवी सुवर्णकार आणि छायाचित्रकार सहभागी आहेत, जेणेकरून दागिने आणि मौल्यवान वस्तूंची वैज्ञानिक पद्धतीने ओळख आणि नोंदणी करता येईल. विशेष म्हणजे, १९७८ मधील मागील इन्व्हेंटरीवेळी रत्नतज्ज्ञांचा सहभाग नव्हता. यंदा प्रथमच त्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे दागिन्यांचे अधिक शास्त्रीय आणि पद्धतशीर दस्तऐवजीकरण होत आहे. (Puri Jagannath Temple)
या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक मौल्यवान वस्तूची सविस्तर व्हिडिओग्राफी, छायाचित्रण आणि थ्रिडी मॅपींग केली जात आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दागिने अनेक संरक्षणात्मक आवरणांत गुंडाळून सुरक्षित पेट्यांमध्ये ठेवले जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेली प्रक्रिया केवळ मोजणी आणि ओळख पटविण्यापुरती मर्यादित असून, दागिन्यांचे आर्थिक मूल्यांकन या टप्प्यात केले जात नाही. (Puri Jagannath Temple)
१९७८ च्या नोंदींशी पडताळणी
मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सध्या तयार होणाऱ्या नोंदींची १९७८ च्या इन्व्हेंटरी यादीशी पडताळणी केली जाईल. पुढील टप्प्यातही हीच प्रक्रिया अवलंबली जाणार असून, त्यामुळे पारदर्शकता राखली जाईल आणि कोणताही गोंधळ किंवा विसंगती टाळता येईल. (Puri Jagannath Temple)