मुंबई : (Pratap Sarnaik) "महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर केला पाहिजे. हे महायुतीचे सरकार आहे.आम्ही राज्यात रोजगार तयार करणारी लोक आहोत रोजगार हीरावून घेणारे नाही.अजूनही आम्ही लोकांना आवाहन करतो की राज्यात या व्यवसाय करा, पण राज्याची अस्मिता मराठी भाषा आहे तिचा देखील आदर करा. कुणावरही बेकायदेशीर कारवाई केली जाणार नाही. माझे ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना आवाहन आहे की कोणताही अधिकारी बेकायदेशीर कारवाई करणार नाही. एक महिन्याची मुदत चालकांना दिली गेली पाहिजे. त्यानंतर तीन महिन्यात भलेही त्यांचे लायसन्स निलंबित केले असले, तरी त्यांना पुन्हा शिकण्याची संधी दिली पाहिजे. आणि तरीही ते शिकले नाही तर त्यांचा बॅच आम्हाला निलंबित करावा लागेल."असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
कांदिवली येथे अमराठी रिक्षाचालकाने मराठी रिक्षा चालकास केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आणि अमराठी रिक्षा ,टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याच्या मुदतीसंदर्भात सोमवार दि. २४ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मंत्रालय येथील पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात होती.यावेळी शिवसेना नेते संजय निरूपम उपस्थित होते.(Pratap Sarnaik)
"संजय निरुपम आणि शशांक राव यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या मोहिमेत सहकार्य दर्शविले. पण जाणीवपूर्वक कोण याबाबत संभ्रम निर्माण करत असेल तर या नेत्यांनी तो संभ्रम दूर केला पाहिजे. आता फक्त मराठी विषयाचा मुद्दा आहे. जो १२ ऑगस्ट २०२६ चा जी.आर.आहे त्यानुसार प्रत्येक आरटीओ अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत. मुळात हा नियम १९८९ चा आहे .३६ वर्षात तुम्हाला वेळच वेळ दिला होता. तसेच आम्ही सुरू केलेले क्लासेस सुरूच राहतील आणि १८०० शिक्षक राज्यभर मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करतच राहतील. पण ती जबाबदारी आता मराठी भाषा विभागाची आहे,परिवहन विभागाची नाही.'असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.(Pratap Sarnaik)
"इतरही अनेक विषय आहेत जसे की रिक्षा चालक जवळची भाडे घेत नाहीत.जाणीवपूर्वक लांबून प्रवास करतात. अरेरावीची भाषा करतात, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करतात. पण यावर आता चर्चा नाही, चर्चा फक्त मराठी भाषा शिकण्यावर होईल."असेही सरनाईक म्हणाले.(Pratap Sarnaik)
"संजय राऊत यांचे पत्र मला अद्याप पर्यंत आलेले नाही. पण त्यांनी पत्रात काय लिहिले आहे ते मी नक्की बघेन. सामन्याचे कार्यालय परळलाच आहे. परळवरून मंत्रालय जवळ असताना नाशिकमार्गे परळ असं व्हाया ते का करत आहेत. जवळून आल्यास भाड कमी लागेल आणि त्यांना ते परवडेल सुद्धा." असा टोला सरनाईक यांनी संजय राऊत यांच्या रिक्षा चालकांसोबत मंत्रालयावर होणाऱ्या संभाव्य मोर्चाबाबत लगावला.(Pratap Sarnaik)