गरुडझेपेचा काळ

    24-Aug-2026

Indian Army Drone Battalion Baaz
 
 
युद्धात शस्त्रांपेक्षा महत्त्वाचे असते, ते शत्रूच्या हालचालींचे भान. शत्रू कुठे आहे, त्याची तयारी काय आहे आणि त्याचा पुढचा डाव कोणता असू शकतो, हे आधीच कळले, तर अर्धी लढाई तिथेच जिंकता येते. म्हणूनच, प्रत्येक युद्धात पहारा महत्त्वाचा भाग राहिला आहे. किल्ल्याच्या बुरुजावरचा पहारेकरी असो किंवा सीमेवर दुर्बीण घेऊन उभा असलेला जवान असो. आता या पहार्‍याला ड्रोनची साथ मिळाली आहे. भारतीय लष्कराने जालंधर येथील वज्र कोअरमध्ये पहिली स्वतंत्र ड्रोन बटालियनची स्थापन केली. ‘बाज’ असे तिचे नाव असून, पाकिस्तानच्या सीमेपासून जवळच्या भागातच तिची उपस्थिती असणार आहे. हिंदीमध्ये गरुडाला ‘बाज’ असे म्हणतात. गरुडाच्या नजरेची भेदकता आणि शत्रूवर झडप घालून फडशा पाडण्याची क्षमता वादातीत आहे. भारताला याची गरज भासली, कारण गेल्या काही वर्षांत भारताविरोधात पाकिस्तानने ड्रोनचा वापर वाढवला. शस्त्रे, अमली पदार्थांच्या अवैध व्यापारासाठी सीमेपलीकडून ड्रोनचा वापर सर्रास होऊ लागल. ‘ऑपरेशन सिंदूर’ने तर या नव्या धोयाची तीव्रता अधिकच स्पष्ट केली. त्यातच ‘मक्का करारा’द्वारे तुर्कीच्या ड्रोन तंत्रज्ञानाची साथ पाकिस्तानला मिळणार असून, काही खेपा पाकिस्तानला मिळाल्याची चर्चाही माध्यमांत आहे. त्यामुळेच या नव्या बटालियनचे महत्त्व अधिक व्यापक होते.
 
ड्रोनद्वारे काही हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतच्या साधनाने, हजारो कोटींच्या युद्धसामग्रीला लक्ष्य केले जाऊ शकते. रशिया आणि युक्रेन युद्धात ड्रोनच्या या अचाट शक्तीचा महिमा जगाला दिसला होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यासाठी वैमानिकाला शत्रूच्या हद्दीत पाठवावे लागत नाही. आकाशात उडणारे छोटेसे हे यंत्र शत्रूला आस्मान दाखवणे, ते टेहळणी करण्यापर्यंतची कामे करू शकते. त्याचबरोबर याचसंदर्भात त्याचा धोकाही वाढलेला आहे. त्यामुळे शत्रूच्या ड्रोनला निष्प्रभ करण्याची तयारीही आवश्यक आहे. ‘बाज’ची स्थापना या बदलाचीच जाणीव आहे. काही दशकांपूर्वी संगणकाचा सैन्यात समावेश झाला, त्यावेळी त्याचे महत्त्व अनेकांना जाणवले नव्हतेच. आज त्याशिवाय आधुनिक लष्कराची कल्पनाच करता येत नाही. ड्रोनचेही असेच आहे. भारताचा हा नवीन ‘बाज’ आकाशात उडेल; त्याने निश्चितच भारतीय जवानांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. हा बदल छोटा दिसतो; पण पुढील युद्धे कशी असतील, याची दिशा त्यातून नक्कीच दिसते.
 
नोकरीचे बदलते गणित
 
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकर्‍या जाणार, अशी चर्चा गेल्या काही वर्षांत सातत्याने सुरू आहे. यंत्रांमुळे माणूस बेरोजगार होतो, हा तर्क वरकरणी खरा वाटतोच. पण, अर्थव्यवस्थेचा इतिहास थोडा वेगळा आहे. नवे तंत्रज्ञानामुळे नक्कीच काही नोकर्‍या जातात; त्याचवेळी नव्या प्रकारच्या कामांचा जन्मही होतोे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही असेच घडत आहे. एका संस्थेच्या अहवालानुसार, आशियात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित क्षेत्रांत सुमारे १ लाख ३१ हजार नोकर्‍या निर्माण झाल्या, तर सुमारे ६१ हजार नोकर्‍या कमी झाल्या. यात भारत, चीन आणि फिलीपिन्स देशाचा समावेश सर्वाधिक लाभार्थी देश म्हणून करण्यात आला आहे. म्हणजेच, ‘एआय’मुळे भारतातही नव्या नोकर्‍या निर्माण झाल्या आहेत. खरा बदल नोकर्‍यांच्या स्वरूपात अधिक होत आहे. पूर्वी एखादा कर्मचारी संगणकाच्या साहाय्याने काम करीत असे; आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे त्याच्या कामातील काही भार कमी झाला आहे. त्यामुळे वारंवार करावी लागणारी कामे कमी होण्याची शयता आहे.
 
पण, त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्तातज्ज्ञ, तिची उत्तरे तपासणारे, तिच्या मदतीने निर्णय घेणारे आणि तिच्यावर आधारित नवी उत्पादने तयार करणार्‍या मनुष्यबळाची गरज वाढली आहे. यात भारतासाठी संधी आहे. आपल्या देशाची मोठी शक्ती तरुण मनुष्यबळ. आजवर जगाला कमी खर्चात सेवा देणे, हीच भारताची जमेची बाजू होती. उद्या केवळ स्वस्त मनुष्यबळ पुरेसे राहणार नसून, अधिक कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती आवश्यक आहे. केंद्र सरकारने यासाठी ‘इंडिया एआय मिशन’ हा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला असून, अर्थसंकल्पात १० हजार ३७१.९२ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप निर्मिती, नवउद्योजकांना मदत आणि कौशल्यविकासावर यात भर आहे. अन्य योजनांद्वारे ‘एआय’चा विस्तार लहान शहरांमध्येही करण्याची योजना आहे. मात्र, योजना जाहीर करून रोजगार निर्माण होणार नाहीत, त्यासाठीच शालेय शिक्षणामध्ये ‘एआय’चे धडे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत. एकूणच, भारताने या बदलाकडे सकारात्मक पद्धतीने पाहात, प्रभावी उपाययोजना सर्व स्तरांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच नवीन रोजगारांची निर्मिती होत आहे.

-कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर