'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित!

    24-Aug-2026
 
deepali
 
 
 
 
मुंबई - (Dipali Sayyed )महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा आगामी चित्रपट घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चेत आहे. प्रदर्शित केलेल्या पहिल्या पोस्टरने रसिकांमध्ये उत्सुकता वाढविल्यानंतर या चित्रपटातील दीपाली सय्यद यांचा लुक रिव्हील करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने नेटकऱ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. अशातच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
 
आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी सिनेमाची निर्मिती फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाद्वारे समाजातील भोंदूगिरीवर थेट प्रहार केला आहे. प्रदर्शित झालेल्या टिझरच्या सुरुवातीला पांढऱ्या रंगाची टोयोटा क्रिस्टा कार एका आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबते. एकीकडे अंगात वारे आलेली एक स्त्री घुमताना दिसते, तर दुसरीकडे अभिनेत्री दीपाली सय्यदची एन्ट्री होते. ती ज्या बाबाकडे आलेली असते त्याचा सहायक अभिनेता अक्षय टंकसाळे अमरावतीहून कोणीतरी पैशांची बॅग आणल्याचे सांगतो. दीपाली आपल्या उजव्या हाताची अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूचे बोट कापते आणि रक्ताभिषेक करते. त्यानंतर थेट नाशिकमधील सहकारवाडा पोलिस स्टेशन पाहायला मिळते. एक तरुण दैवी शक्ती असल्याचे भासविणाऱ्या बाबाच्या भोंदूगिरीची स्टोरी पोलिसांना सांगताना दिसतो. हे सर्व पाहिल्यावर 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटात काय पाहायला मिळेल याचा सहज अंदाज येतो. (Dipali Sayyed)
 




संबंधित मजकूर