शूरा मी वंदिले...

    24-Aug-2026   
 
Ashish Raje Excellent Service Medal
 
‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या स्वातंत्र्यवीरांच्या काव्यपंक्तीच्या आशयानुसार ज्यांनी पोलीस दलातून समाजसेवा केली, अशा ‘उत्कृष्ट सेवा पदक’विजेत्या आशिष श्रीधर राजे यांच्याविषयी...
 
पोलिसांकडे पाहताना आपल्याला बहुतेकदा दिसतो तो गणवेश, हातातील काठी किंवा बंदूक आणि अधिकाराचा चेहरा. पण त्या वर्दीच्या आतही एक माणूस असतो. त्याच्याही घरात सकाळ होते, संध्याकाळ होते; त्यालाही थकवा येतो, घरची काळजी असते, मुलांकडे पाहावेसे वाटते. तरीही शहर झोपलेले असताना त्यांचे कर्तव्य सुरू होते. एखाद्या अपघाताच्या ठिकाणी, एखाद्या गुन्ह्याच्या तपासात, गर्दीच्या मध्यभागी किंवा एखाद्या अनोळखी माणसाच्या मदतीसाठी ते खंबीर उभे असतात.
 
पोलीस सेवेचे मोठेपण अशाच रोजच्या प्रसंगांत दिसते. प्रत्येक प्रसंग वर्तमानपत्रात येत नाही, प्रत्येक धाडसाची नोंद होत नाही आणि प्रत्येक चांगल्या कामाला दादही मिळत नाही. तरीही, त्यांचे अखंडतैलधारा सेवाव्रत सुरुच असते. अशांच्या सेवेची कृतज्ञता म्हणजे केंद्र सरकारकडून दिले जाणारे पुरस्कार. महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवेचा ठसा उमटवणारे पोलीस उपनिरीक्षक, आशिष श्रीधर राजे यांच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, केंद्र सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ देऊन सन्मानित केले. त्यांच्या या कामगिरीने संपूर्ण राज्याचाच गौरव झाला.
 
आशिष यांचा जन्म दि. १० मे १९६९ रोजी वरळी इथला. त्यांना समाजसेवेचे बाळकडू घरातूनच लाभले. त्यांच्या वडिलांचा वाहतूकीचा व्यवसाय होता. आई सुमन राजे या ‘हकोबा इंडस्ट्रीज’मध्ये व्यवस्थापकपदावर कार्यरत. आईने लहानपणी सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा, आशिष यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला.
 
आशिष यांचे शालेय शिक्षण ‘क्रिकेटची पंढरी’ असलेल्या प्रसिद्ध शारदाश्रम विद्या मंदिरात झाले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू प्रविण अमरे, हे त्यांचे वर्गमित्र. महाविद्यालयीन शिक्षण काळातच आशिष त्यांनी, वरळी गावात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करत, घरगुती शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. आशिष यांचे अर्थाजन आणि शिक्षण एकाचवेळी सुरु होते.
 
पुढे डोंबिवलीच्या एस. एच. जोंधळे पॉलिटेनिकमधून त्यांनी, ‘इलेट्रॉनिस अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’ विषयात पदविका पूर्ण केली. त्यांना ज्ञानार्जनाची ओढ असल्याने, नोकरी करतानाही त्यांनी उच्च शिक्षण सुरूच ठेवले. २००३ मध्ये त्यांनी ‘बी.ए.’ पदवी संपादन केली. २००७ मध्ये ’एल.एल.बी’ आणि २००८ मध्ये ‘डिप्लोमा इन सायबर लॉ’ही पूर्ण केले. त्यानंतर काही काळ खासगी कंपनीत नोकरी करतानाच, त्यांनी रक्तदान शिबिरे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन शिबीरांसारखे सामाजिक उपक्रमही राबविले.
 
पुढे १९९३ मध्ये पोलीस दलात रूजू झाल्यावर, बिनतारी संदेश विभागात मोलाची जबाबदारी सांभाळली. दि. २६ जुलै २००५ मध्ये, मुंबईतील अतिवृष्टीमुळे दळणवळण यंत्रणा ठप्प झाल्यावर गोरेगाव गेस्ट हाऊस रिपिटर स्टेशन येथील बिनतारी संपर्क यंत्रणा त्यांनी सुरळीत ठेवली. याबद्दल तत्कालीन सहपोलीस आयुक्त सुभाष आवटे यांनी त्यांना, प्रशस्तिपत्रक व रोख बक्षीस देऊन गौरविलेही होते. दि. २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेल चौकी येथे त्यांनी, सहकार्‍यांसह कर्तव्य चोख बजावले. २०११चा क्रिकेट विश्वचषक, आयपीएल, गणेशोत्सव, व्ही.आय.पी. सुरक्षा आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
 
२०१६ मध्ये विधानसभा सचिव अनंत कळसे यांच्या हस्तेही त्यांना, प्रशस्तिपत्रक मिळाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेत मुंबई पोलीस दलाकडून, आत्तापर्यंत ३८ ते ४० वेळा रोख पारितोषिकांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
 
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असण्याबरोबरच, आशिष यांना क्रिकेटची अतिशय आवड आहे. क्रिकेटची आवड त्यांच्यात शारदाश्रममध्येच रुजली. पुढे ती त्यांनी कायम जपली, अगदी आजपर्यंत. आजही ते आपल्या मुलांसोबत मैदानात जाऊन क्रिकेट खेळतात. त्यांच्या पत्नी स्मिता या विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असून, त्यांचा मोठा मुलगा स्वानंदने इंग्लंडमध्ये ‘सायबर सियुरिटी’ विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. सध्या स्वानंद ‘नॅशनल हेल्थ सर्विसेस’शी संलग्न, ‘कोरा हेल्थ’ कंपनीत नोकरी करत आहे. त्यांचा धाकटा मुलगा धवल ‘सी.ए.’च्या अंतिम वर्षाला असून, ही दोन्ही मुले ’संगीत विशारद’ आहेत.
 
आशिष यांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि अतुलनीय सेवेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत, केंद्र सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदका’ने सन्मानित केले. निवडक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना केंद्र शासनाकडून दिले जाणारे हे पदक, अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. राज्य पोलीस दलात सेवा बजावताना, थेट राष्ट्रीय बहुमान मिळणे ही महाराष्ट्र पोलीस दल, तसेच संपूर्ण राज्यासाठीच अत्यंत अभिमानाची बाब ठरली. या सन्मानाबद्दल सर्वच स्तरांतून आणि समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याला, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 




संबंधित मजकूर