मुंबई : (Jagannath Rath Yatra) हॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे माजी राज्यपाल अर्नॉल्ड श्वार्झनेगर यांनी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ५०व्या वार्षिक जगन्नाथ रथयात्रेत अनपेक्षितपणे हजेरी लावून भाविक आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला. इस्कॉन आयोजित जगन्नाथ रथयात्रेदरम्यान अर्नॉल्ड यांचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. टर्मिनेटर चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले हे हॉलीवूड स्टार भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या सुशोभित लाकडी रथासमोर सेल्फी घेताना दिसले.
अर्नॉल्डच्या सहभागाची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यांनी प्रत्यक्ष रथयात्रेत सहभाग घेतला की ते योगायोगाने व्हेनिस बीच परिसरात उपस्थित होते आणि तेथून भाविकांशी संवाद साधण्यासाठी थांबले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या उपस्थितीने यंदाच्या लॉस एंजेलिस रथयात्रेतील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला. (Jagannath Rath Yatra)
इस्कॉन द्वारा आयोजित या सुवर्णमहोत्सवी रथयात्रेत हजारो भाविक आणि पर्यटक सहभागी झाले होते. भगवान जगन्नाथ, भगवान बलदेव आणि देवी सुभद्रा यांना समर्पित या उत्सवातून भारताची संस्कृती, परंपरा, अध्यात्म, सनातन सभ्यतेचा वारसा आणि भारताची सॉफ्ट पॉवर प्रभावीपणे जगासमोर सादर करण्यात आली. रथयात्रेची पारंपरिक मिरवणूक सांतामोनिकापासून व्हेनिस बीचपर्यंत काढण्यात आली. हजारो भाविकांनी रंगीबेरंगी सजविलेल्या तीन उंच लाकडी रथांना दोरखंडांनी ओढत सहभाग नोंदवला. (Jagannath Rath Yatra)
कीर्तन, हरिनामाचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद, हार्मोनियम आणि करतालांच्या तालावर भाविकांनी नृत्य करत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून टाकला. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात भारतीय अध्यात्माची ही अनोखी अनुभूती विशेष आकर्षण ठरली. या उत्सवात 'फेस्टिव्हल ऑफ इंडिया' चेही आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नृत्यप्रयोग, भक्तिमय नाट्यप्रयोग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक अनुभवता आली. हजारो उपस्थितांना महाप्रसादाचेही वितरण करण्यात आले. (Jagannath Rath Yatra)
लॉस एंजेलिसमधील जगन्नाथ रथयात्रेची परंपरा १९७७ पासून सुरू आहे. यंदाचा उत्सव सुवर्णमहोत्सवी असल्याने पाच दशकांपूर्वी समुद्रकिनारी पहिली रथयात्रा आयोजित करणाऱ्या इस्कॉनच्या अग्रणी कार्यकर्त्यांना विशेष अभिवादन करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षांत हा उत्सव अमेरिकेतील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा म्हणून विकसित झाला आहे. (Jagannath Rath Yatra)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक