अमरावती : (Amravati Hospital) महाराष्ट्रातील अमरावती शहरातील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे आग लागल्याने तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहे.
तसेच,मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Amravati Hospital)
एनआयसीयूच्या (NICU) बाह्यरुग्ण विभागात पहाटे ३.१५ च्या सुमारास व्हेंटिलेटरमुळे आग लागली, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली. एनआयसीयूच्या तीन विभागांमध्ये दाखल असलेल्या ३९ बालकांपैकी ३६ बालकांना वाचवण्यात आले. (Amravati Hospital)
मृत्यू पावलेली तीन बालके बाह्यरुग्ण विभागात होती, तर त्याच विभागातील इतर सहा बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, असे ओला यांनी सांगितले. पुढील उपचारांसाठी सहा बालकांना नंतर एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Amravati Hospital)
महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचारी तात्काळ एनआयसीयूमध्ये पोहोचले आणि इतर नवजात बालकांना बाहेर काढले.
काही नवजात बालकांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे चार मुलांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. (Amravati Hospital)
एनआयसीयूमध्ये तीन विभाग आहेत — रुग्णालयात जन्मलेल्या बाळांसाठी, रुग्णालयाबाहेर जन्मलेल्या बाळांसाठी आणि घरी सोडण्यास तयार असलेल्या नवजात बालकांसाठी स्टेप-डाउन केअर. आग लागली तेव्हा या तिन्ही विभागांमध्ये मिळून ३९ नवजात बालके होती. (Amravati Hospital)
बावनकुळे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, सरकार पीडित कुटुंबांना सर्व आवश्यक मदत पुरवेल असे सांगितले.
“अमरावतीमधील आजच्या घटनेमुळे मला खूप दुःख झाले आहे. माझे मन जड झाले आहे,” असे त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. (Amravati Hospital)
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले. (Amravati Hospital)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.