सध्या हॉकीचा विश्वचषक सुरु असून, भारतीय संघ स्पर्धेसाठी प्रयाण करण्याच्या आधी त्यांच्या गणवेशाच्या नव्या रंगावरुन वादंग निर्माण झाला होता. मात्र, निळ्याशार मैदानाचा आणि या रंगबदलाचा संबंध असल्याचे कारणही पुढे आले. हॉकीच्या मैदानाचे बदलते स्वरुप आणि खेळाडूंच्या बदलत्या गणवेशांचा आढावा घेणारा हा लेख...
समस्त क्रीडाप्रेमीजनहो, नमस्कार! हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरु असून, भारतीय महिला आणि पुरुष संघाची कामगिरीचा मुद्दा चर्चेचा विषय आहे. त्याचदरम्यान शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती, ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून आपण साजरी करणार आहोत. हे मुद्दे या लेखात विचारात घेतले आहेत. दहा क्रीडाप्रकारांना कात्री लागलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दि. २ ऑगस्टला संपन्न झाल्या. त्यातून वगळण्यात आलेल्या क्रीडाप्रकारांत हॉकीचाही अंतर्भाव होता. आता भारताचा (कागदोपत्री नसला तरी) राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीच्या विश्वचषकाच्या स्पर्धा, आपल्या स्वातंत्र्य दिन अर्थात दि. १५ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट या कालावधीत रंगल्या आहेत. त्यांचे आयोजन बेल्जियम आणि नेदरलॅण्ड्समध्ये, संयुक्तपणे करण्यात आले आहे. एकाच वेळेस एकाच ठिकाणी, पुरुष आणि महिलांच्या विश्वचषक स्पर्धांचा आनंद आपल्याला अनुभवता येणार आहे.
भारतीय खेळाडू आपले हॉकीचे कसब, ध्यानचंद यांच्यापासूनच विश्वचषक स्पर्धेत दाखवत आले आहेत. पण या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं विशेष म्हणजे, दि. २० ते २४ ऑगस्ट या कालावधीत दिव्यांगांचा हॉकी विश्वचषकही होत आहे. पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या या पॅरा हॉकी विश्वचषकाच्या स्पर्धेत, भारतासह १६ राष्ट्रांचे ६-ए-साईड संमिश्र-संघ सहभागी झाले आहेत. बेल्जियम आणि नेदरलॅण्ड्स या दोन देशांतील मैदानांत, भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. याआधीच भारतीय हॉकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला कारण ठरलं, भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा भगवा रंग.
सध्याच्या विश्वचषक स्पर्धेसाठी ’मेन इन ब्ल्यू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय संघांच्या अधिकृत जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय भारतीय हॉकी संघटनेने घेतला. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या हयातीत, संघाच्या जर्सीच्या रंगाबद्दल किंवा डिझाईनविषयी मत किंवा सार्वजनिक विधान केल्याची ऐतिहासिक नोंद नाही. त्यांनी फक्त खेळालाच प्राधान्य दिले. रंग कोणताही असो, सुवर्णपदकाच्या सोनेरी छटेवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. गेल्या काही दशकांपासून आधुनिक हॉकी खेळले जाते ते ‘स्ट्रोटर्फ’वर, अर्थात निळ्या कृत्रिम हिरवळीवर!
भारताने आपल्या हॉकीचा सुवर्णकाळ अनुभवला, तो नैसर्गिक मैदानांवर, हिरवळींवर. आधीच्या मैदानांवर आजच्या निळ्या ‘स्ट्रोटर्फ’च्या तुलनेत, चेंडूचा वेग कमी असे. त्यामुळे हॉकीपटूंच्या तांत्रिक कौशल्यांना आणि पासिंगला, डॉजिंगला जास्त महत्त्व होते. ध्यानचंद काळातील हॉकीपटूंनी त्याच्या जोरावरच भारताला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले! आज मैदानाबरोबरच, एकूण हॉकीचाही चेहरामोहरा बदलला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या दि. १ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या नियमावलीत, हॉकीचे मैदान आणि खेळाडूंचे कपडे याविषयीचा उल्लेख आढळतो. लब आणि स्थानिक मैदानांसाठी पारंपरिक ऑलिव्ह किंवा फील्ड ग्रीन वापरता येते. परंतु, पांढर्या चेंडूची दृश्यमानता वाढवण्यासाठी, ऑलिम्पिक, विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लंडन ब्ल्यू किंवा अल्ट्रामरीन/सिग्नल ब्ल्यू अशा रंगाला प्राधान्य दिले जाते. फील्ड हॉकीमधील मैदान हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असते. दूरचित्रवाणीवर प्रेक्षकांच्या डोळ्यांना अनुकूल असे निळ्या रंगाचे मैदानच आंतरराष्ट्रीय सामन्यात असते.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमांमध्ये खेळाडूंच्या कपड्यांच्या विशिष्ट रंगावर कोणतीही बंदी किंवा बंधनं नाहीत; देश कोणताही रंग निवडू शकतात. मात्र, एकाच संघातील सर्व खेळाडूंनी समान कपडे परिधान करणे आवश्यक असून, गोलरक्षकाचा रंग दोन्ही संघांपेक्षा वेगळा असावा. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळपट्ट्यांच्या रंगाशी जर्सीचा रंग मिसळू नये, यासाठी दोन्ही संघांकडे ‘कॉन्ट्रास्ट’ रंग असणेही आवश्यक असते. विविध देशांच्या संघांच्या जर्सीचे रंग, साधारणपणे त्यांच्या राष्ट्रध्वजावर किंवा ऐतिहासिक परंपरेवर आधारित असतात. काही प्रमुख देशांच्या जर्सीचे रंग पुढीलप्रमाणे,
- भारत: निळा आणि अलीकडे केशरी. वेळप्रसंगी पांढरा.
- ऑस्ट्रेलिया: हिरवा आणि सोनेरी (राष्ट्रध्वज व नैसर्गिक प्रतीकांनुसार)
- ब्राझील: पिवळा (मुख्य फुटबॉल जर्सी ‘कॅनेरिन्हो’) आणि पांढरा पर्यायी
- पाकिस्तान: गडद हिरवा (राष्ट्रध्वजातील रंगानुसार)
- इंग्लंड: पांढरा आणि लाल
- न्यूझीलंड: काळा (सर्व काळे खेळाडू म्हणूनच प्रसिद्ध)
- नेदरलॅण्ड्स: केशरी (शाही घराण्याच्या परंपरेनुसार)
- अर्जेंटिना: पांढरे आणि हलके निळे पट्टे
जर्सींच्या रंगछटा पाहताना अजाणतेपणे आपल्या डोळ्यांसमोर येतो, तो हिरवा रंग. कारण आताच आपले लक्ष होते, ते बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सामन्याकडे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांना, हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या एकाच गटात स्थान देण्यात आले होते. तब्बल १६ वर्षांनंतर हे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने आले. यात पाकिस्तानचा ५-३ असा पराभव तर झालाच, शिवाय विश्वचषकाचे स्वप्नही धुळीस मिळाले. भारत मात्र पुढच्या फेरीत दाखल झाला.
पाकिस्तानला आपण ‘कट्टर’च मानत आलो आहोत. पाकिस्तान हॉकी संघाला जग ‘ग्रीन शर्ट्स’ किंवा ‘ग्रीन मशिनर्स’ म्हणून ओळखते. पाकिस्तानी जर्सीच्या रंगाच्या छटांमध्ये आणि नक्षीमध्ये काळाच्या ओघात बदल झाले. मात्र, त्यांच्या मुख्य पारंपरिक रंगात कोणताही मोठा्र बदल झाला नाही. पाकिस्तान हॉकी जर्सीची वैशिष्ट्ये व बदल बघताना आढळते की, पाकिस्तानी संघाने नेहमीच हिरव्या रंगाची जर्सी आणि पांढर्या किंवा हिरव्या रंगाची हाफ पँट वापरली आहे. मुख्य रंग हिरवा असलेल्या संघाविरुद्ध सामान असताना, पाकिस्ताने खेळाडू पांढर्या रंगाची पर्यायी जर्सी परिधान करतात.
‘मेन इन ब्ल्यू’ आणि ‘ग्रीन शर्ट्स’बद्दल पाहिल्यावर ‘टर्फ ऑन ब्ल्यू’ बद्दलही बोलणे आवश्यक आहे.
भारतीय हॉकीने दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जसे शतक साजरे केले, तसेच एक अर्धशतक जागतिक हॉकीने दि. १८ जुलै २०२६ रोजी साजरे केले. त्याने हॉकीच्या मैदानाचा चेहरा-मोहराच बदलला. दिवस होता दि. १८ जुलै १९७६चा आणि वेळ होती, सकाळच्या १० वाजताची. मॉन्ट्रियल ऑलिम्पिकमधील भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सलामीच्या सामन्याची तेव्हा शिट्टी वाजते. या शिट्टीचा आवाज जणू काही संपूर्ण हॉकी विश्वात घुमतो. तो कृत्रिम मैदानावर खेळल्या गेलेल्या हॉकीचा प्रथम दिन. त्या दिवशी एकूण चार सामने खेळले गेले. भारताने ४-० असा विजय मिळवला; त्यानंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मलेशियाचा २-० असा पराभव केला, त्यानंतर पाकिस्तान आणि बेल्जियम यांच्यातील सामना ५-० असा झाला आणि अखेरीस पश्चिम जर्मनी व न्यूझीलंड यांच्यातील सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. अशा प्रकारे, हॉकी टर्फवरील पहिल्या अधिकृत दिवशी चार सामने खेळले गेले आणि एकूण १३ गोल झाले होते.
अमेरिकेतील ‘स्ट्रोटर्फ’ कंपनीने, नायलॉनच्या धाग्यांपासून हे टर्फ तयार केले होते. मॉन्ट्रियल ऑलिम्पिकदरम्यान पाऊस पडला आणि त्या ओल्या टर्फवर खेळाचा दर्जा अधिकच उठून आला. अशा प्रकारे योगायोगाने हॉकीसाठी ‘ओल्या टर्फ’चा उगम झाला.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण हिरव्या रंगासाठी ओळखल्या जाणार्या ‘स्ट्रोटर्फ’च्या हॉकी मैदानांनी, एक नवीच कात टाकली. त्यांचा वापर ऑलिम्पिक, तसेच विश्वचषक स्पर्धांमध्ये करण्यात सुरुवात झाली. नायलॉन तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत गेली आणि आजही जगभरातील हॉकीमध्ये याचा वापर होतो.
पुढील २५ वर्षांत ‘टर्फ’ सर्वसामान्य झाले होते. तसेच, टर्फवर खेळून तयार झालेली खेळाडूंची एक नवीन पिढीच मैदानात होती. ती टर्फवर घडलेली पहिली पिढी होती की, जिने आपल्यासोबत गतिमानतेचा एक अभूतपूर्व अविष्कारच खेळात आणला. तेव्हापासून हॉकीचा खेळ अत्यंत वेगवान झाला, इंग्रजीतल्या ‘फास्ट-पेस्ड गेम’सारखा. लंडन २०१२ मध्ये हॉकीचा खेळ नैसर्गिक गवतावरून पुढे सरकला. गवताची ती पाती तेव्हा जी नाहीसी झाली, ती भारतीयांच्या कौशल्यपूर्ण अविष्काराला मागे ढकलूनच. हॉकी हा किती नावीन्यपूर्ण खेळ आहे, हे जगाला दाखवून देण्याची ती वेळ होती. ‘पॉलिग्रास लंडन ब्ल्यू’ हे मैदान अशा प्रकारे तयार करण्यात आले होते की, ज्यामुळे या खेळाची लोकप्रियता वाढेल; खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी तो एक रोमांचक अनुभव ठरेल आणि दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकांनाही खेळ अधिक स्पष्टपणे पाहता येईल.
युरोपियन्सचा हा प्रयोग यशस्वी ठरला आणि फायद्याचाही. लंडन २०१२ मध्ये अंदाजे सहा लाख प्रेक्षकांनी हॉकीचे सामने पाहिले. लंडन २०१२ ऑलिम्पिकमधील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेल्या खेळांच्या यादीत, हॉकी खेळ तिसर्या क्रमांकावर होता. तसेच, ऑलिम्पिक पार्कमधील निळ्या रंगाचे हे मैदान वैशिष्ट्य म्हणूनही समोर आले. भविष्याची जडणघडण ही नेहमीच नवप्रवर्तकांकडून केली जाते. हॉकीमधील ही नावीन्याची परंपरा आजही कायम आहे; कारण हा खेळ खेळाडू, चाहते आणि प्रसारक/प्रायोजक यांच्यासाठी नवनवीन अनुभव व संधी शोधत आहे.
माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर दुर्दैवाने मी लंडनच्या त्याच ऑलिम्पिकचे सामने खेळणार्या भारतीय हॉकीपटूंना, ऑस्ट्रेलियन मायकेल नॉब्स या मुख्य प्रशिक्षकाच्या देखरेखीत तसेच भारतीय सहप्रशिक्षक लॅरियंस लोबो सर आणि गोलरक्षक भरत छेत्रीच्या नेतृत्त्वात एकूण-एक सामने हरताना प्रत्यक्षात पाहिले. तेव्हा भारतीय संघाप्रमाणेच माझ्याही डोळ्यांत आले. ते अश्रू मला अजूनही त्या निळ्या ‘स्ट्रोटर्फ’ची दुःखद आठवण करून देतात. तात्पुरते आपण येथेच थांबू आणि उर्वरित लेखन आपण पुढील भागात करूया. तोवर हॉकी विश्वचषकाचे सूपदेखील वाजले असेलच.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४