‘प्रभात टॉकीजसमोर’

    23-Aug-2026
In front of Prabhat Talkies
 
'ग्रंथाली’ प्रकाशन प्रकाशित, संजीव वसंत फडके लिखित ‘प्रभात टॉकीजसमोर’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. हे पुस्तक म्हणजे, प्रभात टॉकीज परिसराचा व ठाण्याचा भूगोल, इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक, तसेच राजकीय घटनांचा लेखाजोखाच म्हणता येईल. लेखक केवळ मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्ती नसून कवी, लेखक, कलारसिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ताही आहे. साहजिकच, त्याचे वास्तव्य असलेल्या परिसराचा विकास, परिवर्तन, याबरोबरच गाव, राज्य, देश पातळीवरील बदलत्या परिस्थितीचा डोळस समीक्षक आणि साक्षीदारही आहे. हेच या लेखनाचे वैशिष्ट्य. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून, त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘हा लोकइतिहासाचा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे.’ घरातील संस्कार, कुटुंबातील व्यक्तींचे सलोख्याचे संबंध, आईकडून मिळालेला वाचनाचा वारसा, तसेच वडिलांनी घरात बाजाची पेटी आणून संगीत शिकण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाचा परिणाम विचारधारेवर आणि आचरणावर पडतोच.
 
पूर्वार्धात आजोळ, वडिलांचे-आजोबांचे गाव, वातावरण याचे साद्यंत वर्णन, माहिती दिली आहे. तत्कालीन म्हणजेच साधारण ६०-६५ वर्षांपूर्वीची सामाजिक स्थिती, रीतिरिवाज, शेजारपाजार, नातेवाईक, शिक्षण, व्यवसाय याबद्दलचे मनोज्ञ वर्णन यात आहे. त्याकाळी नातेसंबंध जपण्यावर लोकांचा कटाक्ष असे. थोड्याफार फरकाने सार्‍यांच्याच आयुष्यात असेच घडत असते. पुढे समज आल्यावर स्वतःचे कार्यक्षेत्र, शिक्षण कसे वळण घेत गेले, वाढले याचे सोप्या शब्दांत; पण सहजतेने चित्रण केले आहे. काका, आजोबा, आजी यांनी गावाकडे घरात आलेल्या चोरांना कसे हिकमतीने पळवून लावले, याचे वर्णन वाचून गंमतच वाटली. आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी, स्वतःच्या कलागुणांना, आवडत्या गोष्टी करण्यास वाव मिळावा म्हणून, घरातील वडीलधारी मंडळी ठाणे, नाशिक अशा तुलनेने मोठ्या गावात आली. सारेच एकमेकांना सांभाळून मदत करीत असत. पुढे विवाह झाले, विभक्त कुटुंबे झाली. एकत्र असतानाही आणि विभक्त झाल्यावरही एकमेकांबद्दलची आपुलकी; चुलत-मावस भावंडांतील प्रेम, आत्मीयता मात्र कायम राहिली.
 
शाळेत जायला लागल्यावर मित्रपरिवार, खेळ, करमणूक, शाळेतील शिक्षक, शेजारपाजारचे कसे जडणघडणीत कारण होते, याचा नावांसकट आवर्जून उल्लेख पुस्तकात केला आहे. संघाच्या शाखेतली शिकवण, नंतरच्या आयुष्यावर परिणाम करणारी होती. इतकेच काय; पण आपुलकीने चौकशी करणार्‍या व विनोदी बोलून दुखणे हलके करणार्‍या फॅमिली डॉक्टरांचीही आठवण सांगायला लेखक विसरला नाही. तेव्हा घरोघरी नळाचे पाणी नव्हते. सार्वजनिक नळावर पाण्यासाठी झुंबड उडे; पण कोणीही, कधीही हमरीतुमरीवर येत नव्हते. गप्पागोष्टी करतच जलभरण होई.
 
पुढे महाविद्यालय, वेगवेगळे कोर्सेस, नोकर्‍या करत मग ठाणे जनता सहकारी बँकेत लेखक रुजू झाला, बँकेत कायस्वरुपीही झाला. तोपर्यंत वडील सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान, नात्यातील भावा-बहिणींची लग्ने होत गेली. त्यावेळचेच्या फोटादेखील या पुस्तकांत आहेत. तेव्हाची वस्त्रप्रावरणे, अंगतपंगत जेवणे यातून आपुलकी दिसते.
 
वर म्हटल्याप्रमाणे सामाजिक, राजकीय कामातही त्यांचा सहभाग होताच. १९७५ची आणीबाणी, इंदिराबाईंची हुकूमशाही आणि लोकशाही असल्याने आंदोलने, विरोध होणे क्रमप्राप्तच होते. अशाच आंदोलनाच्या वेळी झालेल्या सामूहिक अटक-सुटकेची आठवण दिली आहे. ठाण्यातून ‘जनसंघा’पासून कार्यरत असणारे ग. मो. कोळी निवडणूक मैदानात उतरले होते. स्वतःला मार्गदर्शक समजणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, ‘कोळ्यांनी फक्त जाळी विणावीत, निवडणूक लढवू नये.’ याचा कोळी बांधवांनी कडाडून निषेध केला. परिणामी, ठाकरे यांना जाहीर माफी मागावी लागली. असो, एक उदाहरण म्हणून हा प्रसंग सांगितला. आणखी खास प्रसंगांचा उल्लेख थेट पुस्तकांतच वाचावा. तो कामगार नेत्यांच्या चलतीचा जमाना होता. नोकरी जाणे, संप याचाही फटका जनतेला बसतच होता. लेखकाने स्वत:च्या अनुभवाची आठवणही पुस्तकात सांगितली आहे. ठाणे जनता सहकारी बँकेत कायम झाल्यावर पदोन्नती, तेथील सहकारी, यांचे संबंध व अनुभवही विशद केले आहेत. अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत लेखक याच बँकेशी जोडलेला होता. त्याच्या सामाजिक, राजकीय कार्याला पत्नीचेही पाठबळ होते. आपल्याला बरी न होणारी व्याधी आहे, याची तिला जाणीव झाल्यावर पुढे अडायला नको म्हणून, लेखकालाही तिने पाकशास्त्र शिकवले. स्वतः कलाक्षेत्रात- हस्तकला, चित्रकला यात निपुण होतीच व सुगरणसुद्धा. याच विषयावर तिचे एक पुस्तकही संजीव यांनी प्रकाशित केले. तिच्या वियोगानंतर प्रयासाने सावरून ‘धूसर धूसर संध्याकाळ’ हे कवितांचे पुस्तकही, संजीव यांनी लिहिले. पोकळी मात्र जीवघेणीच होती.
 
‘प्रभात टॉकीजसमोर’ या ३०० पानी आत्मकथनाची ओघवती लेखनशैली वाचकाला गुंगवून टाकते. अतिशय साधी, रंजक व वाचकाला खिळवून ठेवणारी भाषाशैली आहे. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक. विजय बोधनकर यांचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि त्याकाळाची आठवण करून देणारे असून, प्रत्येकालाच ही गोष्ट आपलीच गोष्ट वाटू शकते. पुस्तकाच्या वाचनानंतर न जाणो, वाचकाला आपल्या गावाबद्दलही काही लिहिण्याची प्रेरणा मिळू शकते.
 
निशा बर्वे
 ९९८७२५६७०४
 
पुस्तकाचे नाव : ‘प्रभात टॉकीजसमोर’
लेखक : संजीव वसंत फडके
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या : ३२०
मूल्य : रु. ५००




संबंधित मजकूर