उत्कर्षाचा ’सूर्योदय’

    23-Aug-2026
 
Pardhi Community
 
भारतीय समाजजीवनाच्या प्रवाहात जनजाती आणि घुमंतू समाजाचे योगदान अनन्यसाधारण. जल, जमीन, जंगल आणि निसर्गाशी नाते जपत, देश-देव-धर्मासाठी त्यागाची परंपरा जोपासणार्‍या या समाजाने, स्वातंत्र्यलढ्यातही शौर्याची गाथा लिहिली. मात्र अन्याय, उपेक्षाही त्यांच्या वाट्याला आल्या. आज अंधारातून आत्मभान, स्वाभिमान आणि स्वावलंबनाच्या दिशेने उभारी घेणारा प्रवास म्हणजेच पारधी समाजाचे उत्कर्षपर्व. खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून, पारधी समाजातील तरुणांच्या आयुष्यातील उत्कर्षाचा आढावा घेणारा हा लेख...
 
खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेचा, सरसंघचालकांच्या उपस्थितीत पारधी समाजाच्या ‘उत्कर्षपर्वा’चा भव्य सोहळा पार पडला. आपल्या देशात जनजाती आणि घुमंतू समाज हा प्रचंड देशाभिमानी समाज असून, जल, जमीन, जंगल व प्रकृती तथा निसर्गपूजक आहे. तसेच देश-देव-धर्मासाठी त्याची भूमिका, सदैव त्यागाचीच राहिली आहे. त्यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानसुद्धा महत्त्वाचे आहे. बिरसा मुंडा ते तंटया मामा भील अशी मोठी परंपरा असलेला जनजाती समाज, देशाच्या विविध भागांत विविध परंपरासुद्धा जपत आला आहे.
 
परंतु मधल्या काळात देशविरोधी शक्तींनी, त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील देशासाठीच्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने तर घुमंतू समाजातील पारधी समाजाला गुन्हेगार जमात घोषित करून, त्यांच्यावर कायमच अनन्वित अन्याय केले. तसेच मिशनरींकडून सेवा आणि मदतीच्या गोंडस नावाखाली, त्यांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. होत असलेल्या धर्मांतरणाबाबत सज्जनशक्ती, साधुसंत तथा संस्था, संघटनांनी समाजाचे लक्ष वेधून, सेवेचा ढोंगी बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही मिशनरींच्या धर्मांतराचा डाव ओळखून, ‘ग्रामगीते’मध्ये स्पष्ट शब्दांत मांडणी केली. राष्ट्रसंत म्हणतात-
 
काही दूरदेशची लोकं येती|
सेवा करोनी प्रवेश मिळविती॥
भोळ्या जना नागविती|
धर्मांतर करवोनिया॥ (ग्रामगीता २८/४२)
 
उपरोक्त ओवीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दूरदेशीची लोकं म्हणजे कोण तर, पांढरा झब्बा घातलेली, पाखंडी सेवेच्या गोंडस नावाखाली गावात भोळ्या माणसांना धर्मांतरित करीत आहेत. असा संदेश देऊन त्यांनी, स्वावलंबन आणि आत्मभान टिकवण्याचा इशाराही दिला आहे. पारधी समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि स्वावलंबनासाठी, खामगाव येथे ‘सूर्योदय पारधी समाज आश्रम आदिवासी शाळा’ कार्यरत आहे. पारधी समाज विद्यार्थ्यांच्या ‘उत्कर्षपर्वा’चा भव्य-दिव्य सोहळा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत, खामगाव येथे दि. ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके व कामगारमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर याप्रसंगी उपस्थित होते. डॉ. मोहनजी भागवत यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच कलागुणांना वाव देणारे क्रीडांगण आणि प्रेषकगृहाचे लोकार्पणसुद्धा केले.

'श्री सद्गुरू दत्त ट्रस्ट’चा पुढाकार'
 
महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भात पारधी समाज मोठ्या प्रमाणात आहे. दुर्लक्षित असलेल्या पारधी समाजाकडे शिक्षणाची सोय तर सोडाच, साधे आधारकार्ड किंवा रेशनकार्डसुद्धाही नव्हते. शिक्षणापासून कोसो दूर व उपेक्षित असलेल्या पारधी समाजाच्या उत्थानासाठी, मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये विविध सेवा प्रकल्प तथा समाजोपयोगी उपक्रम राबविणार्‍या ‘श्री सद्गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट, इंदोर’ यांनी, पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराने वर्ष २००८ मध्ये, खामगाव येथे ‘सर्वोदय पारधी समाज आश्रमशाळा’ सुरू झाली. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख असलेल्या सुनील देशपांडे यांचा परिसस्पर्श होऊन, संस्थेला संघकार्याची नवीन दृष्टी मिळाली. एखाद्या संस्थेला संघकामाची दृष्टी मिळाल्यास संस्थेमध्ये काय बदल होतात, याचेच आदर्श उदाहरण पारधी समाज आश्रमशाळा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव सजनपुरी येथे २७ एकराच्या निसर्गरम्य जागेवर आज पारधी समाज निवासी आश्रमशाळा उभी आहे. शाळा पहिली ते दहावी असून, निवासी स्वरुपाची आहे. पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणासोबतच स्वावलंबी प्रशिक्षण देणारा हा प्रकल्प, महाराष्ट्रात नावलौकिकास प्राप्त ठरला. ‘श्री सद्गुरू दत्त धार्मिक ट्रस्ट’च्या अध्यक्षा डॉ. आयुषी देशमुख, तेथील विद्यार्थ्यांना आईच्या मायेने जीव लावतात. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुचित राठोड हे संस्थेचे केवळ सेवकच नव्हे, तर एक कुटुंबप्रमुख म्हणूनही तेथे सेवा देतात. निवासी असलेल्या आश्रमशाळांमध्ये, भोजनापासून वैद्यकीय सेवासुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येतात.
 
‘अमनोरा येस फाऊंडेशन’चे उत्तरदायित्व
 
पुणे-हडपसर येथे ‘अमनोरा येस फाऊंडेशन’ प्रसिद्ध सेवा संस्था असून, त्यांचे वंचित व दुर्लक्षित समाजाच्या उत्थानासाठी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण क्षेत्रांत भरीव कार्य आहे. तसेच त्यांच्यमार्फत पर्यावरण आणि जलसंवर्धन, गरीब व वंचित समाजघटकांसाठीची विविध शिबिरे व अन्य सामाजिक उपक्रमही राबवले जातात. आरोग्य शिबिरांद्वारे मोफत तपासणी, औषधांचेही वितरण केले जाते. ‘अमनोरा येस फाऊंडेशन’, सिटी ग्रुप, पुणे’ संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी, वर्ष २०१४ मध्ये उपरोक्त आश्रमशाळेचे उत्तरदायित्व स्वीकारले. त्यांच्या सोबतीला विवेक कुलकर्णी सेवाभावी वृत्तीने उभे दृढ असतात. सतत दुर्लक्षित असलेल्या पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाद्वारे राष्ट्रीय मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, आपल्या महापुरुषांचे स्मरण करण्याचे कार्यक्रमही घेतले जातात. तसेच, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सुप्तगुणांचा विकास व्हावा, यासाठीही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 
‘श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवंम् पारमार्थिक ट्रस्ट’च्या अध्यक्षा डॉ. आयुषी देशमुख व ‘अमनोरा येस फाऊंडेशन’चे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे, दोघेही ‘गीते’मधील निष्काम कर्मयोगानुसार आश्रम प्रकल्प चालवित आहेत. आता आश्रमशाळेमध्ये जवळपास ७०० विद्यार्थी असून, त्यांना शिक्षणासोबतच स्वावलंबी व स्वयंरोजगाराचेही प्रशिक्षण दिले जाते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, आश्रमशाळेमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय, निमशासकीय आणि पोलीस दलात नोकरी करीत असून, संरक्षण क्षेत्रातही देशसेवा करीत आहेत. व्हॉलीबॉलसह वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून, विभाग तथा राज्य स्तरावरसुद्धा विद्यार्थ्यांनी पारधी समाज आश्रमशाळेला नावलौकिक मिळवून दिला आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संघस्थापनेपासूनच, समाजाच्या विविध आघाड्यांवर काम करत आहेत. अत्यंत दुर्गम भागातील जनजाती समाज, घुमंतू समाजाच्या वस्त्या, पाडे आणि तांडे येथे जाऊन सेवाकार्य करीत आहेत. संघाचे उच्चशिक्षित स्वयंसेवक जेथे विजेचे खांब पोहोचले नाहीत किंवा बैलगाडी जाण्यास रस्ताही नाही, अशा ठिकाणी जाऊन घुमंतू जनजाती समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळेच ख्रिश्चन मिशनरीच्या बाटवाबाटवीला लगाम लागला. खामगाव येथील सर्वोदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा सज्जनशक्तींनी एकत्र येऊन, पारधी समाजाच्या उत्थानासाठी केलेला प्रयोग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांची संघदृष्टी तथा मार्गदर्शन आणि डॉ. आयुषी देशमुख, अनिरुद्ध देशपांडे यांच्या निष्काम कर्मामुळेच, खामगाव सजनपुरी येथील पारधी समाज आदिवासी शाळा उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.
 
अशोक राणे
९४२३६५८३८५




संबंधित मजकूर