मुंबई : (Mulund East) मुलुंडमध्ये प्रस्तावित पेट्रोल पंपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोटेचा यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत, मुलुंडमध्ये पेट्रोल पंप उभारला जात असल्याने आदित्य ठाकरे यांना त्रास होत असून, त्यातूनच ते आरोप करत असल्याची टीका केली.
कोटेचा यांचा पलटवार
कोटेचा म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा मुलुंडमधील प्रत्यक्ष परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलुंड पूर्व भागातील नागरिकांसाठी अखेर पेट्रोल पंप उपलब्ध होणार आहे. याच कारणामुळे आदित्य ठाकरे आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Mulund East)
क्रीडा संकुल आणि उद्यानाचा संदर्भ
मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंपाची मागणी जवळपास ५० वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा भाजप आमदारांनी केला. ज्या ठिकाणी पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्या ठिकाणापासून अवघ्या ४०० फूट अंतरावर उजव्या बाजूला सुमारे दीड एकर जागेवर क्रीडा संकुल विकसित करण्यात येत आहे. तसेच पेट्रोल पंपाच्या भूखंडापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर डाव्या बाजूला १० एकरांहून अधिक क्षेत्रफळाचे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे, असे कोटेचा यांनी स्पष्ट केले. (Mulund East)
कोटेचा यांनी आदित्य ठाकरेंना आरोप करण्यापूर्वी “थोडा गृहपाठ करा”, असा सल्ला दिला. आरोप करण्यापूर्वी संबंधित माहिती घेऊन मुलुंडमधील प्रत्यक्ष परिस्थिती समजून घ्यावी, असे ते म्हणाले. (Mulund East)
— Mihir Kotecha (Modi Ka Parivar) (@mihirkotecha) August 22, 2026
‘पीआर राजकारण थांबवा’
“मुलुंड पूर्वमधील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या प्रकल्पाचा त्रास होत आहे का ?” असा सवाल कोटेचा यांनी केला. (Mulund East)
दिखाव्याचे पीआर राजकारण करण्याऐवजी मुलुंडमधील प्रत्यक्ष परिस्थिती समजून घ्यावी, अशी टीकाही त्यांनी केली. पेट्रोल पंपामुळे परिसरातील नागरिकांना थेट फायदा होईल, असे कोटेचा यांनी सांगितले. (Mulund East)