‘जेन-छी’ नव्हे, ‘जेन-झी’ - चला जग सुंदर करूया!

    23-Aug-2026   






 
 Gen Z
 
‘जेन-झी’ म्हणजे १९९७ ते २०१२ दरम्यान ज्यांचा जन्म झाला ती पिढी. म्हणजेच साधारण १४ ते २९ वर्षांपर्यंतचे युवक. सध्या चांगल्या-वाईट अनेक घटनांमध्ये सातत्याने ‘जेन-झी, जेन-झी’चा उद्घोष होतो आहे. जणू, यापूर्वी कधीच १४ ते २९ वर्षांपर्यंतचे लोक नव्हतेच. आज काही लोक मुद्दाम ‘जेन-झी, जेन-झी’ म्हणून, ‘जेन-छी’ म्हणावे असे दुर्गुण तरुणाईमध्ये पेरण्याचे काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर या देशाला कोण हवेत, ‘जेन- झी’ आणि जेन-छी’ या दोन वर्गवारींचा मागोवा घेणारा हा लेख...
 

काही दिवसांपूर्वी लडाख येथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, सैन्याने नाकाबंदी केली होती. तर, एक महिला आकांडतांडव करत तिथे तैनात सैनिकांना, अद्वातद्वा बोलली "आमच्या टॅक्सवरच तुमची सॅलरी निघते. तुम्ही काय आमच्या वर आहात का? तुम्ही लोक काश्मिरींसोबत तर करताच, आता आमच्यासोबत पण असेच करायला लागलात.” देशाचे प्राणपणाने रक्षण करणार्‍या सैनिकांचा अपमान करणार्‍या या महिलेला, संपूर्ण देशाने चांगलेच वठणीवर आणले. मानभावीपणे नाटक करत तिने नंतर माफीही मागितली. ती आता कितीही माफी मागत असली, तरी तिने केलेली दोन विधाने ही तिची विघातक मानसिकताच स्पष्ट करतात. तिचे एक विधान- "सैनिक कश्मिरींसोबत तर करतातच, आता आमच्यासोबतही करत आहेत” आणि दुसरे वाक्य, "आम्ही जेन-झी आहोत, हे सहन करणार नाही.” चिरक्या; पण तितक्याच भसाड्या आवाजात तिने ही विधाने केली. त्याचा मागोवा घेताना एक षड्यंत्र स्पष्ट जाणवते. "देशाचे सैनिक आमचे नोकर आहेत. प्रशासनाला आम्ही मानत नाही. आम्हाला जे हवे ते झालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे. आम्ही नकार सहन करणार नाही.” हे असले विघातक विचार, तरुणांच्या डोक्यात, मनात रुजवायचे षड्यंत्र. "काश्मीरमध्ये सैनिक देशाच्या सुरक्षिततेसाठी नाहीत, तर काश्मिरींवर अन्याय, अत्याचार करायला आहेत,” अशा आशयाचे तिचे उद्गार!
 

घरदार सोडून जीवाची बाजी लावत सीमेवर देशरक्षण करणार्‍या, सैनिकांचे जगणे तिने कधी पाहिले होते का? काश्मीर, लडाख वगैरे परिसरांत देशाचे रक्षणकर्ते भारतीय सैन्यच आहे, याची तिला जाणीव होती का? नाही, हे माहिती नव्हते. मात्र, काश्मीरमध्ये भारतीय सैनिक अत्याचार करतात, ही खोटी आणि देशविरोधी माहिती तिला होती. ही माहिती तिला कुठून मिळाली? तिला असे का वाटले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण, स्वतःला ‘जेन-झी’ म्हणवणार्‍या त्या महिलेवर, असे सैन्यविरोधी आणि पर्यायाने देशविरोधी संस्कार का झाले, हे सत्य बाहेर येणेही आवश्यक आहे. तर, मुद्दा आहे ‘जेन-झी’चा! पण, जर का ही बया खरेच २९ वर्षांचीच असेल, तर ही ‘जेन-झी’ नाही, ती ‘जेन-छी’ आहे. तरुणाईच्या तारुण्यातील नितांत सुंदर ऊर्जेला ती काळिमा आहे.
 

‘जेन-झी’ हे शब्द निदान भारतात तरी प्रसिद्ध झाले, ते नकारात्मकरीत्या झुरळ आंदोलनामध्ये. हेसुद्धा एक षड्यंत्रच. खरेच का ती तरुणाई होती? तरुणाई अशी असते? शिवीगाळ, अश्लीलता, बीभत्सपणा, हेकेखोरपणा, उद्धट, उर्मटपणा, देश-संविधान-कायदे आणि समाजातल्या नीतिनियमांचा विरोध करणे म्हणजेच तरुणाई? ‘जेन-झी’? याचे उत्तर नाही असेच. तरुणपण हे नवनिर्मितीचे बीज असते. ते बीज मानवीमूल्यांचा उद्घोष करते, संवर्धन करते. पण, या आंदोलनातील काही विकृत, संस्कृती-नीतिमत्तांचा विनाश करूच इच्छित होते. लिंग आणि लैंगिक व्यवहार यापलीकडे त्यांचे वागणे आणि भाषाही नव्हती. तरुणाई म्हणजे लैंगिकतेत बुडून माणूसपण हरवणे का? नाही. पण, या पार्श्वभूमीवर देशाने पाहिले की, जंतरमंतरवर पेपरफुटीविरोधाच्या नावावर हैदोस घालणार्‍या आणि अतिशय विकृत-बीभत्स वागणार्‍या त्या लोकांच्या समर्थनासाठी, काही नेते पुढे आले. त्यात राहुल गांधी, केजरीवाल, शरद पवार, अखिलेश यादव, तसेच उद्धव आणि राज ठाकरे हे त्यांच्या पोराबाळांसकट, झुरळ आंदोलनाला समर्थन करत होते. या नेत्यांना त्यांच्या मुला-मुलींनी ‘झुरळ पार्टी’तल्या विकृतांसारखा नंगानाच केला, तर तो आवडणार नाही. पण, झुरळ आंदोलनातली ती मुले दुसर्‍यांची आहेत, आपली नाहीत. ते काहीही करोत, आपले काय जाते? सत्तेत असलेल्यांना त्रास होतो. यातून जर त्यांची सत्ता अस्थिर झाली; तर बरेच आहे, असा त्यांनी विचार केला असावा. त्यामुळेच त्या आंदोलनात ताळतंत्र सोडणार्‍यांना, हे नेते ‘जेन-झी, जेन-झी’ म्हणत होते. पण, यावरही म्हणावेसे वाटते की, ‘ते जेन-झी नव्हते; ते जेन-छी होते.’ या ‘जेन-छी’ला सज्जनशक्तीने नाकारले आहे. खर्‍या ‘जेेन-झी’नेही स्पष्ट केले की, "आम्ही संस्कृती, नीतिमत्ता आणि सज्जनता जपतो. हुल्लडबाजी करून हिंसा करणे आम्हाला मान्य नाही. तर देश, समाज आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी आम्ही तत्पर आहोत.”
 

त्यामुळेच तर झारखंड पेपरफुटीच्या घटनेतही युवक-युवतींनी आंदोलन केले. पण, ते आंदोलन खरेच ‘जेन-झी’चे आंदोलन होते. त्यांनी केवळ आणि केवळ शिक्षणासंदर्भातच आंदोलन केले. झुरळ आंदोलनात जसे भारतविरोधी, बहुसंख्य हिंदूंच्या विरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या, तसे इथे काहीही नव्हते. इथे ना देशाचा विरोध केला गेला, ना धर्माचा, ना कोणत्या राजकीय नेत्याचा. तसेच, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ची इच्छा असणार्‍या विघातक शक्तींना, या व्यासपीठावर थाराच दिला नाही. आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या कायदेशीर मार्गाने आम्ही मिळवू, अशीच त्यांची धारणा होती. समाजावर, समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास होता. समाज आपला असून, आपण त्या समाजाचे भाग आहोत. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी समाजाचे नुकसान करायचे नाही, ही भावना जपणारे विद्यार्थी खर्‍या अर्थाने ‘जेन-झी’ आहेत.
 

या पार्श्वभूमीवर समाजाला कोण हवे, ‘जेन-झी’ की ‘जेन-छी?’ तर, गेल्या काही दिवसांतल्या ठळक घटना आठवतात. "आम्ही आता सगळ्या शाळांचे ऑडिट करणार,” असे म्हणत, गावोगावी जाऊन फुकटची ‘चमकोगिरी’ करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुढे आली. या पार्टीचा आशुतोष रांका काही लोकांना घेऊन, राजस्थान एका गावात गेला. जंतरमंतरवर जसे समविचारी विकृत एकत्र आले होते, तसे इथे नव्हते. कारण, ‘कॉकरोच आंदोलन’ यशस्वी झाले, तर मोदींची सत्ता जाईल हे मनाचे मांडे खात, विरोधकांनी जंतरमंतरवर देशभरातून युवक आणि अगदी किन्नरही शोधून आणले. यांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अगदीच नगण्य. पण, त्यांना तिथे आणून जगाला असे दाखवण्यात आले की, बघा भारताचे तरुण मुले-मुली असे आहेत. नशेडी, बीभत्स आणि लिंगपिसाट, देव-देश-धर्म आणि अगदी कुटुंबव्यवस्थाही न मानणारे. ज्या महान संस्कृतीसाठी भारत ओळखला जातो, ती महान संस्कृती या देशातलेच लोक मानत नाहीत, हे भासवण्याचा प्रयत्न या भाड्याच्या लोकांनी केला.
 

तर, झुरळ रांकासोबत काही लोक आणि त्यात एक-दोन महिलाही होत्या. देश अगदी रसातळाला गेला असून, आपल्याशिवाय त्याला कुणीच तारणहार नाही, आपणच ते काय बुद्धिमान-सुधारणावादी अशा आवेशातच हे सगळे झुरळ होते. लोकांच्या हातात मोबाईल आहे म्हणून, लाईक-कमेंट देणारे करोडो लोक समाज माध्यमांवर यांचे समर्थक होते. त्यामुळे त्यांना वाटले की, जयपूरचे गाववालेही यांचे स्वागतच करतील, आरती करतील. पण, गाववाल्यांनी यांना घुसूही दिले नाही. ’आमचे छोटेसे गाव असून, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. आम्हाला राजकारण आणि क्लेश नको,’ असेच गाववाल्यांचे म्हणणे होते. तर, हे लोक जबरदस्तीने गावात घुसून वातावरण अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी गाववाल्यांनी यांना म्हटले की, "जावो पाकिस्तान नक्षली...” थोडक्यात, समाजाने ‘जेन-झी’ म्हणवणार्‍यांना, ‘जेन-छी’ ठरवून हाकलून दिले. दुर्गम ग्रामीण भागातील समाजालाही कळले की, कोण त्यांचे आहे आणि कोण विघातक आहेत. विशेष म्हणजे, या घटनेनंतर समाजमाध्यमांवर जयपूरच्या त्या गावातील लोकांचे कौतुक करणार्‍या संदेशाचा महापूर आला.
 

यासंदर्भातच, या गोष्टीचाही मागोवा घेऊया की, ‘जेेन-छी’ची भलामण करणार्‍या नेत्यांबद्दलही लोक काय विचार करतात. तर, ही घटना कालपरवाचीच कर्नाटकमधली. आजच्या घडीला चांगले प्रतिष्ठित घरदार असलेल्या ४० लाख पॅकेज असलेल्या सुस्वरूप मुलाने, लग्नाची मागणी घातल्यावर कोणती तरुणी नकार देईल? बरे नकार दिला, तर त्याला कारणही तसेच ठोस हवे. पण, कर्नाटकमधल्या आरोही रेड्डी या युवतीने चांगले घरदार असलेल्या, ४० लाख पॅकेज असलेल्या स्ाुस्वरूप मुलाला लग्नासाठी नकार दिला. तिने नकाराचे कारण समाज माध्यमांवर दिले. ती म्हणते, तिने जेव्हा त्या मुलाचे ‘इन्स्टाग्राम’ प्रोफाईल तपासले, तेव्हा त्या मुलाने तिथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपला ‘रोल मॉडेल’ म्हणून लिहिले होते. ते पाहूनच तिने नकार दिला. का? तर, याचे उत्तरही तिने तिच्या ‘पोस्ट’मध्ये लिहिले. त्यात ती लिहिते, "एक अभिमानी राष्ट्रवादी हिंदू म्हणून, मी अशा व्यक्तीला माझा जीवनसाथी कधीही स्वीकारू शकत नाही, जो एका पराभूत व्यक्तीला आपला ‘रोल मॉडेल’ मानतो.” हं, तर या तरुणीच्या मते, जे पराभूत मानसिकतेचे आहेत, तेच देशभर ‘जेन-झीं’शी संवाद साधणार आहेत. कालच आपल्या पुण्यातही आले होते म्हणे. अर्थात, प्रत्येक नेत्याबद्दल समाजाचे एक मन आणि मत झाले आहे. राहुल गांधींना गांभीर्याने घेऊ नये, हे मन आणि मत समाजाचे आहे. मात्र, तरीही राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक कधीकधी असे वागतात की, वाटते त्यांची आणि देशाची, त्यांची आणि समाजाची, त्यांची आणि हिंदूंची शत्रुताच आहे. तर, कर्नाटकातल्या घटनेवरूनच समजू शकते की, लोकांना ‘जेन-झी’च्या नावावर ‘जेन-छी’ला प्रोत्साहन देणार्‍यांबद्दल किती राग आहे.
 

या सगळ्या प्रकरणाबद्दल विचार करताना जाणवते की, २०४७ पर्यंत भारताचा सर्वांगीण विकास होऊन, भारत ‘विश्वगुरू’च्या दिशेने पाऊल टाकणार, यासाठी देशातली सज्जनशक्ती प्रयत्न करत आहे. तसेच जगभराच्या तुलनेत भारताकडे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे भारत तरुणांचा देश आहे. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत जगभरात वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे. तरुणाईचा देश म्हणून, भारताचा गौरव होत आहे. नेमके हेच देशातील काही गद्दारांना, तसेच देशविरोधी शक्तींना रुचत नाही. भारत जर तरुणाईचा देश आहे, तर या तरुणाईलाच बर्बाद करायचे, असा त्यांनी निश्चय केला आहे. त्यासाठी समाज, कुटुंबांना न मानता, मला जे वाटेल, जे आवडेल, तेच करणार; भले मग दुसर्‍याचा जीव का जाईना, अशीच मानसिकता तरुणांमध्ये रुजवायची. ते व्यसनाधीन बनतील, लैंगिकतेचे दास बनतील अशी परिस्थिती निर्माण करण्याचे धंदे त्यांनी सुरू केले. पण, भारतातील समाज आणि कुटुंबधारणेमुळे या फुटीरतावाद्यांची इच्छा पूर्ण होत नाही. ‘उडदामाजी काळे गोरे’ असतातच. त्यामुळे त्यांच्या जाळ्यात सगळेच नाही मात्र, काही तरुण-तरुणी फसतात. त्यांचा भयानक वापर हे लोक करून घेतात, असल्या लोकांना प्रसिद्धी देतात. तरुणाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील, अशानांना हे प्राधान्य देतात. त्यांचा हेतू हाच असतो की, या असल्या लोकांची नकारात्मक प्रसिद्धी पाहून तरी, नकळत्या वयातले तरुण-तरुणीही या लोकांच्या वाटेवर जातील.
 

असो, ‘जेन-झी’चा संदर्भ देताना कालपरवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या करणार्‍या, मुलाला वाचवण्यासाठी गेलेले आई-बाबांसह तो मुलगाही मृत पावला. ही घटना कशी बरे टाळता येईल. छत्रपती संभाजीनगरचा कुणाल चांदगुडे याचे बाबांशी मतभेद झाले, म्हणून जीव द्यायची टोकाची भूमिका त्याने घेतली. त्याला त्याच्या आई-बाबांनी आणि समस्त गावकर्‍यांनी समजावले पण, म्हणे तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे तो ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. त्यामुळे जेव्हा त्याचे बाबा त्याला डोंगराच्या कड्यावरून बाजूला करण्यास गेले, तर तो बाजूला होण्याच्या नादात दरीत कोसळला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे वडीलही दरीत कोसळले. दोघेही मृत पावलेले पाहून, मुलाच्या आईनेही दरीत उडी घेऊन जीव दिला. या घटनेतील मुलाचे वय वय १८ वर्षे होते. आता कुणी म्हणेल की, तो ‘जेन-झी’ होता, नैराश्यात त्याने हे कृत्य केले, त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. कदाचित, चांदगुडे कुटुंबाच्या काही समस्या असतीलही, ज्यामुळे कुणाल अस्वस्थ असेल. पण, आज देशात करोडो मुले अशी आहेत की, घरच्या परिस्थितीमुळे त्यांना ऐशोआरामात जगता येत नाही. शिक्षणासाठी कष्ट करावे लागतात. घरात पीठ आहे, तर मीठ नाही, छानछौकी करता येत नाहीत. पण, तरीही त्या घरातले मुले-मुली आत्मविश्वासाने पुढे जातात. स्वतःसोबत कुटुंबाचे आणि समाजाचे नाव मोठे करतात.
 
आई-बाबांनी आपल्याला जगवण्यासाठी घेतलेले कष्ट ते विसरत नाहीत, त्यांचे पांग फेडावेत, हा त्यांना धर्म वाटतो. त्यामुळेच जीव देणारी, जीव घेणारी ही ‘जेन-झी’ असूच शकत नाही तर, ती ‘जेन-छी’च आहे. मृत्यूनंतर कुणावर टीका करू नये हे सत्यच, तरीसुद्धा अपयश आणि नैराश्यातून आत्महत्या करणारे युवक-युवती, हे समाजातल्या कोणत्याही तरुणाईचे प्रतिनिधित्व करत नाहीत, करू शकत नाहीत. थोडे मनासारखे नाही झाले, तर आई-बाबांना धमकावून, त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन त्यांना वेठीस धरणारे काही तरुण-तरुणी आहेत. खरेतर लहानपणापासूनच बालकांना सत्यपरिस्थितीची आणि समस्यांची जाणीव करून द्यायला हवी. आयुष्य म्हणजे सगळेच सुखाचे धागे नसतात, तर दुःखाचा धागाही असतो. तो उसवून सुखाचा धागा विणायची ताकद आपली आपणच निर्माण करायची असते, हे पाल्यांना सांगणारे पालक आज हवेत. हे असे पालकच देशाची शक्ती आहेत. तसेही अनादी काळापासून सुष्टांचा दुष्टांशी संघर्ष सुरूच आहे. दुष्ट शक्ती अराजक-हिंसेचा वापर करत अमंगल करण्याचा प्रयत्न करते; तर सुष्ट शक्ती अवघ्या विश्वाचे मांगल्य चिंतीते. याअनुषंगाने आज काय आहे? तर, सज्जनशक्ती देव-देश-धर्म, समाज आणि माणुसकीची नीतिमत्ता मानणार्‍या ‘जेन-झी’चे समर्थन करते, तर समाजविघातक शक्ती देशात समाजात अस्थिरता आणि फूट पाडू इच्छिणार्‍या ‘जेन-छी’ला प्रोत्साहन देत आहे. माणसाचे बालपण, किशोरवय, तरुणपण आणि अगदी वार्धक्यही, देश आणि समाजाच्या हितासाठी आणि जग सुंदर करण्यासाठी उपयोगी असते. त्यामुळे ‘जेन-झी’ काय करेल, याकडे डोळे लावून बसण्यापेक्षा, आपण ज्या आहोत त्या वयात जग सुंदर करण्याचा प्रयत्न करू.

खरी ‘जेन-झी’!


काही लोक ‘जेन-झी’चे दाखले देताना बांगलादेश, नेपाळ, अरबी देशांचे दाखले देतात, की तिथे तरुणांनी राजव्यवस्था उलथवली. पण, आपल्या देशाचे आदर्श बाहेरचे लोक नाहीत. खरेतर ‘जेन-झी’चे उत्तम उदाहरण, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २२व्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली, छत्रपती शिवरायांनी वयाच्या १६व्या वर्षी रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती पूर्णही केली. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून, १६ ते २९ वर्षांच्या हजारो तरुणांनी बलिदान दिले. आताही देशाचे रक्षण करताना, सैनिकांनी ‘देश सर्वतोपरी’ या ध्येयानेच, वयाच्या २१व्या-२२व्या वर्षी हौतात्म्य पत्करले आहे. देश, समाज, धर्म, संस्कृतीसाठी, मानवतेच्या प्रगतीसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी जगणारी आणि जगवणारी तरुणाई हीच खरी ‘जेन-झी’!
 

९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर