मराठी नवकाव्याच्या कालखंडात आपल्या अंतर्मुख, चिंतनशील आणि संथलयीतील शैलीने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर उर्फ ‘आबा’ यांची दि. १४ ऑगस्ट रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मानवी जगण्यातील व्याकुळता अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केली. शब्दांचा कुठलाही बडेजाव न करता, मोजक्याच आणि नेमक्या ओळींमधून मानवी अस्तित्वाचा शोध घेणार्या त्यांच्या कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेणार्या अशाच. आज आबा आपल्यासोबत नसले, तरी त्यांचा सहवास लाभलेल्या तीन सुहृदांनी त्यांच्या समृद्ध साहित्यिकप्रवासाला आणि जीवनदर्शनाला अर्पण केलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली...
शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी आबा म्हणजे द. भा. धामणस्कर गेल्याची बातमी मोबाईलवर झळकली आणि चित्त सैरभैर झाले. कार्यालयात भोवताली कुणीच नव्हते की, ज्यांच्या बरोबर हे दुःख वाटून घ्यावे, या विषयावर बोलावे. ‘चेकॉव्ह’ची गोष्ट आठवली. एका टांगेवाल्याचा मुलगा पहाटेच वारला; पण दिवसभर काम करणे गरजेचे आहे, नाहीतर संध्याकाळी घरची चूल कशी पेटणार? त्यामुळे तो त्याच्या टांग्यात बसणार्या प्रवाशांना आपले दुःख सांगायचा प्रयत्न करतो; पण प्रवाशांना त्यात काडीचाही रस नसतो. उलट, हा मागे बघून बोलताना पुढे एखादा अपघात करेल की काय, ही चिंताच त्यांना भेडसावते. दिवस त्याचा असाच धावपळीत संपतो. रात्री घोड्याला खरारा करताना, त्याच्या मानेवरचे केस कुरवाळत घोड्याला मिठी मारत तो म्हणतो, "ऐकलंस का, आपला जॉन आज गेला बरं का...” आणि अक्षरशः धाय मोकलून रडतो. माझेही असेच झाले होते. आबांचे कवितेतले हळवेपण जगण्यातूनच डोकवायचे. अतिशय तरल आणि मुलायम असा त्यांचा स्वभाव. हिंदीमधील मयंक टंडन म्हणतो, ’धूप का एक टुकड़ा आँगन में लेटा था| वह खिसकते-खिसकते दीवार के पास गया| दीवार के सहारे बैठ गया| फिर खड़ा हो गया| जब वह दीवार पर चढ़ने लगा, तो मुझसे रहा नहीं गया| मैंने उसे रोक लिया| कहा कि अँधेरा होने वाला है, अब कहाँ जाओगे| कल जाना|’ अगदी असेच लाघवी होते आमचे आबा!
आमची सखी नेहमीच म्हणते, जिवंत माणसाचे कौतुक करावे, मेलेल्या कलेवराचे उगाचच अवडंबर माजवू नये. माझ्याकडे आबांबरोबरच्या खूप रम्य आठवणी आहेत. आबा परवा गेले जरी असले, तरी त्यांचे कविता लिहिणे मागेच कधीतरी थांबले असावे. म्हणजे वर्षाकाठी एखाद-दोन ठिकाणी त्यांची कविता वाचायलाही मिळायची; पण हे आम्हाला माहीत असलेले आबा नव्हेत, हे प्रकर्षाने जाणवे. माणूस काही अमरपट्टा घेऊन येत नाही, वयही कुणाच्या मर्जीने वाढत नाही. ते आपल्याच कालगतीने वाढत राहते. आबांचे पिकत जाणे, रसाळ होणे, त्यांच्याबरोबर बोलताना नेहमीच जाणवायचे. वर्षभरापूर्वी एका प्रसन्न संध्याकाळी आबांच्या भेटीचा योग आला होता.
माझ्या नुकत्याच प्रकाशित ‘रूळानुबंध’ पुस्तकाची प्रत घेऊन पोहोचलो. आबा अगदी उत्साहाने बाहेर आले. कोपर्यात ठेवलेली खुर्ची स्वतः हाताने ओढत, माझ्या समोर येऊन बसले. मी म्हणालो की, "मी ओढून घेतो खुर्ची,” तर म्हणाले, "नको, ही आमची नेहमीची योजना आहे. तू काळजी करू नकोस.” आबांचा तोच तो नेहमीचा निर्मळ आवाज ऐकून, मी आश्वस्त झालो होतो. आम्ही त्यांना मोठे आणि प्रेमळच बघितले आहे. त्यांचा कविता वाचतानाचा संथ हलका स्वर अजूनही कानात घुमतोय. नोकरीतले धकाधकीचे जीवन त्यांनी इमानेइतबारे निभावले. पण, या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातही, मनातला हिरवागार निसर्ग मात्र निगुतीने जपला. हिंदीतले मातब्बर कवी मंगलेश डबराल एके ठिकाणी लिहितात, ’मैंने शहर को देखा और मैं मुस्कराया| वहाँ कोई कैसे रह सकता हैं, यह जानने मैं गया और वापस न आया|...’ तसे सगळ्यांचेच होत जाते. पण, आबांनी त्यांच्यातील संवेदनशीलता कुठेही हरवू दिली नाही. ते होते तेव्हा काही रोज भेटत नव्हतो आम्ही! पण, ते आहेत हाच दिलासा पुष्कळ असे.
आबांचा २०१६ मध्ये दुचाकीमुळे अपघात झाला. मग इस्पितळातून घरी आल्यावर, त्यांचे बाहेर फिरणे जवळपास बंदच. या अपघातानंतर त्यांचे पुन्हा सावरणे म्हणजे, एक चमत्कारच होता. याचे सारे श्रेय त्यांचा मुलगा आणि सून यांच्या अपार प्रेमाने घेतलेल्या काळजीलाच जाते. अगोदरही ते कधी रस्त्यावर दिसले की, तितयाच आत्मीयतेने गप्पा मारायचे. आबांना गप्पा मारायला नेहमीच आवडत. आम्ही त्यांच्या मैत्रीबद्दलही खूप ऐकले आहे. आबा, व. शं खानवेलकर, चित्तरंजन घोटीकर, गजानन पिंगळे हे रोज संध्याकाळी ब्राह्मण सभेपासून, पार ठाकुर्ली ग्रामपंचायतपर्यंत चालत जात. अतिशय मृदू आवाजात त्यांच्या गप्पा चालायच्या. अगदीच कधी मूड झालल, तर कोपर्यावरच्या उडपी हॉटेलमध्ये डोसा खायचा. हीच त्यांची सर्वांत मोठी चैन असे. आबांच्या मित्रांमधल्या व. शं खानवेलकरांच्या तर, आम्ही प्रेमातच होतो. तेपण अतिशय साधेपणाने वावरायचे. आबा रोज दिसत-बोलत असले, तरी त्यांच्या कवितांचा, यांचे लेखन ‘मौज’ अंकात छापून येते, याचा एक नकळत दबाव आम्हाला तरी, जाणवायचा. आबा आणि आमच्यात दुवा म्हणून, व. शं.चा आम्हाला आधार वाटे. त्यांच्या एकत्र फिरण्यातल्या गमतीजमती आम्हाला व.शं.च ऐकवायचे. या व.शं.नी मृत्यूनंतर देहदान केले. त्यामुळे, आबांबरोबरच व.शं.ची उंचीही आमच्या नजरेत वाढली होती. आबांच्या वृत्तीतला गोडवा आमचा गझलकार मित्र सानेकर म्हणतो तसाच होता,
तुझ्यात जो गोडवा उतरला,
तो केवळ गगनाचा नाही;
तुझ्या मुळांना जिने रुजवले,
ती मातीही मधुर आहे...
आबांनी कधीही कुठला कवी छोटा- मोठा मानला नाही. सगळ्यांचे कौतुक करण्याचा त्यांचा मूळचा स्वभाव. मुख्य म्हणजे, समोरच्याचे ऐकून घेण्याचा प्रचंड संयम त्यांच्याजवळ होता. त्यांच्या कविता तत्त्वज्ञान, निसर्ग, शृंगार, नातेसंबंध आणि अगदी साध्या-सहज विषयांनाही कवेत घेई. त्यांच्या ‘मोराची गाडी’ या कवितेतले मोर ढगांबरोबर निघून जात आणि पाऊस संपल्यावर परतही येत. ‘मोर’ याच संकल्पनेवरच्या त्यांच्या कविता वाचल्यावर, मोराकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी तयार होते. आमच्या स्वप्नीलने शाळेत पावसावरच्या निबंधाची सुरुवात, आबांच्या कवितेने केली होती. तेव्हा बाईंनी शेरा लिहिला होता की, कविता नकारात्मक वाटते, हे मी कधीतरी आबांना सांगितले होते. गेल्या वेळच्या भेटीतही ते आठवणीने विचारत होते की, "त्या बाईंना माझी कुठली कविता नकारात्मक वाटत होती रे?” ’नुसत्या हाका मारून, बरे वाटायला लावणारा देव, काहीजणांना किती जवळ सापडतो’ ही कविता तर, मला नेहमीच अचंबित करून टाकते.
आबांना अनेक कविता पाठ होत्या. आबांबरोबर गप्पा मारताना आपण अंतर्बाह्य उजळतो, हे मी नेहमीच अनुभवले. उतारवयातही आबांची बुद्धी तल्लख होती. ते श्रीपूंच्या जून्या आठवणीत रमत. ते सांगायचे की, श्रीपू कवी-लेखकाचा सन्मान करायचे, त्यांचे स्वातंत्र्य मान्य करायचे. राम पटवर्धनांचा उल्लेख करताना तर ते अधिकच हळवे होत. ते म्हणत की, "त्यांचा माझ्यावर अपार स्नेह होता, खूप आस्थेने त्यांनी माझ्या कविता छापल्या. कृष्णमूर्तींवर लिहिलेली कविता त्यांनी अगदी आस्थेने छापली होती.” आबांवर काही वर्षांपूर्वी मी लेख लिहिताना, या संदर्भानेच त्यांच्यावर जे. कृष्णमूर्तींचा प्रभाव आहे असे लिहिले होते. ते चुकीचे असल्याचे त्यांनी गेल्या भेटीत मला अगदी ठासून सांगितले. म्हणाले, "मला त्यांचे लेखन आवडायचे; पण त्यांचा माझ्यावर प्रभाव वगैरे काहीही नव्हता.” आबा म्हणायचे, "मला योग्य माणसे योग्य वेळी भेटल्याने, आयुष्य जगणे सोपे झाले. ‘परभणी साहित्य संमेलना’चे आबांना आमंत्रण होते. त्यावेळी ते आणि शंकर वैद्य एकत्र गाडीने गेल्याच्या आठवणी, त्यांच्या मनात शेवटपर्यंत ताज्या होत्या. विंदाही आबांना म्हणायचे की, "मी तुमच्या कवितेला खूप मानतो.” आबांच्या मते, महाविद्यालयाच्या कष्टाच्या दिवसांत, कुसुमाग्रज माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सोबत करायचे. शेवटच्या क्षणापर्यंत काळाचे भान जागे ठेवणारे आबा, आपल्या भिंतीवरच्या बंद घड्याळाने कासावीस होतात आणि कवितेत शेवटी लिहितात की, "माझ्या मृत्यूचा व भिंतीवरच्या बंद घड्याळाचा अगदी दुरान्वयानेही संबंध नाही.” आबांच्या सूनबाई सांगत होत्या की, "आबा गेले आणि नेमके त्याच वेळी घरातले भिंतीवरचे घड्याळही बंद पडले.” हा निव्वळ योगायोग!
गणेश कुलकर्णी
९८१९९५७८५२