द. भा. धामणस्कर - एक संस्मरण!

    23-Aug-2026
 
D. B. Dhamnaskar
 
सत्तरीच्या दशकातल्या डोंबिवलीची शानच वेगळीच होती. ती गजांतवैभव लक्ष्मीपुत्रांची डोंबिवली नसेल; पण साहित्य, संस्कृती, कला यांचे माहेरघर म्हणून तिची ख्याती होती. ‘काव्यरसिक मंडळ’ आणि ‘साहित्य सभा’ यांसारख्या संस्था, तो वारसा जपत होत्या. त्यातूनच शाळकरी वयात द. भां.च्या घरी जाणे झाले. ब्राह्मण सभेच्या समोरच्या गल्लीत, जरा आत त्यांचे टुमदार घर. मृदू, संथ आवाजातली त्यांची चौकशी. दिवाणखान्यातच ओशोंचा एक मोठा फोटो लावलेला, भला मोठा. शाळकरी आगाऊपणा करून, त्यावरून द.भां.ना प्रश्न विचारला, "तुम्हाला यांची सारी मते पटतात?” द.भां.चे मृदू हास्य. "वर्तमानपत्रात छापून आलेले सगळेच खरे नसते,” हे त्यांचे त्यावरचे उत्तर. ते त्यावेळी फारसे पटले नसले, तरी त्यांच्या एकंदर ऋजू व्यक्तित्वाचे भारावलेपण घेऊनच घरी परतलेलो.
 
त्यानंतर दभांची आठवण म्हणजे, जेव्हा त्यांची ‘दशक कवी’ म्हणून निवड झाली, तेव्हा अगदी घरच्याच व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याचा आनंद अनेकांना झाला होता. पोटापाण्यासाठी देश सोडला, तेव्हा ‘व्हीआयपी’च्या बॅगेत घरचे देव, मिसळणाचा डबा, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘स्वामी’, मंगेश पाडगावकर यांच्याबरोबरच दभाही घेऊन आलो. नव्या गावात मुळे धरताना, चार कवितावेड्या मित्रांना घेऊन पाडगावकर, बोरकर, दभा जागवता आले, ही ईश्वरी कृपाच.
 
मुले लहान असतानाची गोष्ट. विकांताच्या गेटटुगेदरमध्ये गप्पा चाललेल्या. चार-पाच वर्षांच्या एका मुलाने, बापाला बाहेर जाऊन खेळण्याची परवानगी मागितली. बाप खसकन लहानग्याला ओरडला, अकारणच. गुबर्‍या गालाचं बारकं खट्टू होऊन निघून गेलेलं. साधा प्रसंग; पण दभां आठवत गेले-
 
आपण पानाफुलांनी
बहरून केव्हा यावे हे
ऋतूंनी ठरवलेले;
आपण फक्त
 
कोवळी आरस्पानी पाने
आपल्या हाती निबर होत
काळपटत कशी जातात
एवढेच पाहत रहायचे
 
‘पॅरेंटिंग’वरची याहून सुंदर कविता माझ्या वाचण्यात नाही. इथल्या स्थलांतरितांची पहिली पिढी आता, ‘पिकलं पान’ झाली आहे. हे काका गेले, त्या मावशींची तब्येत वर-खाली होते आहे, अशा बातम्यांची वारंवारताब वाढली आहे. ही पिढीच आमचे पूर्वज. त्यांचे जाणेही त्यामुळे दुःखदायक. तर विषय होता, त्या मावशींच्या मागे काकांचे कसे होणार? आणि दभांचे मनगटावरचे घड्याळ उद्धृत करणे भाग होते,
 
असे आमचे (मनगटी घड्याळाचे व दभांचे) सहजीवन
एकंदरित सुखाचेच झाले; पण
हल्लीहल्ली त्यालाही वयामुळे
माझ्यासारखेच बरे नसते.
उपचार करून बरे
व्हावे याची त्याला
 माझ्याप्रमाणेच निकड नाही.
आता विलक्षण योगायोगाने
मी व माझे मनगटी घड्याळ
एकदम बंद पडलो
तर प्रश्नच नाही; पण
थोडे पुढे-मागे झाले तर,
एक करार आम्ही
आधीच करून ठेवलाय :
मागे राहील त्याने अखेरपर्यंत
एकटेच विनातक्रार
टिकटिकत राहायचे...
 
दभा आणि डोळ्यांच्या ओल्या कडांनी, बाबांच्या पिवळ्या पडत चाललेल्या तबकडीचे आणि छोट्याछोट्या आयताच्या पट्ट्याचे मनगटी घड्याळ डोळ्यापुढे येत गेले.
 
मुहूर्ताची वेळ, लाडाकोडात वाढलेली तुमचीच जीव लावणारी कन्या लग्नाला बसलेली, समोर धडाडते अग्निकुंड, गुरुजींचे मंत्रपठण, तुमच्या डोळ्यासमोरून गेल्या २८ वर्षांचा बापलेकीचा नातेपट तरळत चाललेला आणि दभांचा आठव
 
खरं सांगा :
उन्हात चमचमणारी
नवी पालवी पाहूनच तुम्ही
तुमच्या मुलीला
सोन्याचे डूल केलेत ना?
 
आणि कधीकधी फोनवरूनच तिच्याशी खडाजंगी झाल्यावर, पुन्हा दभांचाच आठव ‘दुराव्यानंतर’ कवितेतून
 
सारे काही संपून
गेल्यानंतरही मी टेलिफोनवर माझ्या रक्ताशी
एके काळच्या
प्रश्नातून संवाद करण्याचा
प्रयत्न करतो.

वर्ज्य विषय सोडून
बोलताना अनेक
परस्पर बाद झालेले.
त्यानंतरचे उरलेले
घरंगळणे म्हणजे
काय म्हणतेस

खरं म्हणजे तिनं हिला
एकदा तरी भेटावं म्हणून
‘ही सारखी आठवण काढते’
एवढेच मला मुद्दाम सांगायचे
असते; पण गाणे संपलेले
नसताही कधीकधी
फोनोची पिन नुसतीच
पुढे-मागे होत राहावी
तशी जीभ आतल्या आत
नुसतीच वळवळत रहाते

मी अपार व्यथित
जणू आणखी एक
विषय वर्ज्य होताना
आणि संभाषण आणखीनच
निरर्थक होत चाललेले
 
प्रेमाचे माणूस तुमच्यापासून दूर गेल्यानंतरचा हा संवाद, घालमेल कशी शब्दांत पकडतो? अडकलेली फोनोची पिन आणि न रेटता येणारी तुमची जीभ! दंडवत दभा!
 
"अरे, जरा बाहेर जा आणि चार फुलं देवाला आण” म्हणून सांगितल्यावर, पडत्या फळाची आज्ञा मानून बाहेर जाणे आणि जमेल तितया हळुवारपणे फुले तोडताना ‘दुखर्‍या मुळांपर्यंत’ आठवत राहाणे.
 
सकाळ झालीय.
फुलझाडांच्या झुंजुमुंजु उजेडात एक
हिंस्र जनावर काठीने
फुलांवर हल्ले करीत आहे.

बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध अविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेंव्हा
इथल्या झाडांना
फुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या दुखर्‍या मुळांपर्यंत पसरलेली असेल
 
शतकानुशतक तुम्ही करत असलेल्या गोष्टींच्या फोलपणाबद्दल, सौम्य शब्दांत झगझगीत प्रकाश टाकण्याच्या दभांच्या शैलीला काय म्हणावे? 
असेच की- 
द. भा. धामणस्कर...
 
जन्माला आलेला प्रत्येक जण
कधी ना कधी जाणारच
हे विसरण्याचा दूधखुळेपणा
आम्ही - तुमचे वाचक
कधीच करणार नाही
हे तुम्ही जाणताच दभा!

केळीच्या पानाचा समग्रपणा,
वेळ आली तर न कुरकुरता
एकट्यानी टिकटिकत
रहाण्याचा तुमचा घड्याळाशी
झालेला करार,
परंपरा पुढे सरकवताना
तुमचा झालेला तरुण ययाती
व मुलगा ओझ्यानी वाकलेला
किंवा देवाला फुलं वहाण्यासाठी
झाडावर प्रहार करणारं
हिस्र श्वापद
 
-जीवनातल्या आमच्या
अनुभवांच्या क्षणी आम्हाला
आठवत रहातील दभा!

आणि ते जुळलेले ‘प्राक्तनाचे
संदर्भ’ वरून बघताना तुमचा
स्वर्गस्थ आत्मा मंद स्मित करत
हेच म्हणेल ना दभा!

‘बरेच काही उगवून आले आहे!’
 
- पराग शुक्ल




संबंधित मजकूर