पुणे: (Chhatron Ki Goonj) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय (उजएझ) युनिव्हर्सिटीच्या वसतिगृह परिसरात मध्यरात्री हायव्होल्टेज राडा झाला. या घटनेनंतर भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि ’अभाविप’च्या नेत्यांनी काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया वर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांचे वातावरण दूषित करत असून सामान्य विद्यार्थ्यांना धमकावत असल्याचा आरोप भाजप आणि अभाविपकडून करण्यात आला आहे. या गोंधळानंतर पोलिसांनी ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून कॅम्पसमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (Chhatron Ki Goonj)
COEP वसतिगृहात मध्यरात्री वाद
राहुल गांधी यांच्या शनिवारच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) सुरू असताना काँग्रेस आणि एनएसयूआयच्या बाहेरील कार्यकर्त्यांनी सीओईपीच्या हॉस्टेल परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तेथील सामान्य विद्यार्थिनींवर राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रचंड दबाव आणला. इतकेच नव्हे तर, कॉलेज प्रशासनाविरुद्ध अवाजवी शुल्काबाबत आणि शिष्यवृत्तीबाबत खोटे व्हिडिओ स्टेटमेंट देण्यासाठी विद्यार्थिनींना धमकावले जात होते, असा दावा अभाविपने केला आहे. (Chhatron Ki Goonj)
जेव्हा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या दडपशाहीला आणि बळजबरीला विरोध केला, तेव्हा काँग्रेसच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री कॅम्पसमध्ये येऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आणि सामान्य विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला.‘ तर काँग्रेस नेते विजय वडेटिवार, बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात यांनीही अभाविपच्याविरोधात आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला समर्थन करणार्या विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी धमकावले असे त्यांनी आरोप केले. यावर भाजप आणि अभाविपने मागणी केली आहे की, शैक्षणिक संस्थांमध्ये अशा राजकीय इव्हेंटच्या नावाखाली होणारी दडपशाही आणि बाहेरील कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप कायमचा थांबवण्यात यावा. राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सध्या राजकीय आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. (Chhatron Ki Goonj)
‘तर काँग्रेसला पुण्यात फिरणे कठीण होईल"
‘काँग्रेस पक्षाकडे आता कोणताही ठोस राजकीय मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे ते थेट विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपले अपयशी राजकारण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, येथे राज्याची आणि देशाची संस्कृती जपली जाते. मात्र, राहुल गांधी यांच्या पुळचट इव्हेंटसाठी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते कॉलेज हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थिनींना धमकावत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे." भाजप आणि अभाविप पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीला धक्का लागू देणार नाही. सामान्य विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागला, तर काँग्रेसला पुण्यात फिरणे कठीण होईल." - धिरज घाटे, पुणे शहराध्यक्ष भाजप
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.