भारताची अस्मिता - संपूर्ण ‘वन्दे मातरम्’!

    23-Aug-2026
 
Vande Mataram
 
केंद्र सरकारने ‘वन्दे मातरम्’बाबत घेतलेल्या निर्णयाला काँग्रेसने विरोध करत, त्याचा अपमान करण्याचा एककलमी कार्यक्रम चालवला आहे. अर्थात, इतिहासात डोकावल्यास निश्चितच काँग्रेसचा इतिहास हा ‘वन्दे मातरम्’विरोधी असल्याचे दिसून येईल. राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीचा विश्वास निर्माण करणार्‍या ‘वन्दे मातरम्’च्या प्रवासाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
मातृभूमीची भावपूर्ण वंदना असलेल्या ‘वन्दे मातरम्’ या गीताच्या निर्मितीस दीडशे वर्षे झाली, तरी आजही सच्च्या भारतीयाच्या हृदयात या जाज्वल्य गीताचे स्थान अढळ आहे.
 
‘वन्दे मातरम्’ गीताची निर्मिती
 
बंगालमधील संन्याशांनी निर्दयी व अत्याचारी इंग्रज अधिकार्‍यांविरुद्ध बंड पुकारून सशस्त्र क्रांती आंदोलन उभारले, असे कथानक घेऊनच बंगालमधील लेखक व संवेदनशील कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्यय यांनी ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहण्यास सुरुवात केली. ती कादंबरी ‘बंगदर्शन’ या मासिकाच्या अंकातून, १८८० ते १८८२ याकाळात क्रमशः प्रसिद्ध होत राहिली. पुढे पुस्तक रूपाने ‘आनंदमठ’ कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ही कादंबरी प्रकाशित झाल्या-झाल्याच प्रचंड लोकप्रिय होऊन, त्याच्या काही वर्षांतच दुसरी, मग तिसरी अशा नवीन आवृत्त्याही प्रसिद्ध होत राहिल्या. याच ‘आनंदमठ’ कादंबरीतून ‘वन्दे मातरम्’ हे गीत प्रथम प्रसिद्ध झाले व सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचले. परंतु, बंकिमचंद्र यांनी हे गीत या कादंबरीसाठी लिहिलेले नव्हते. मनाच्या समाधिस्थ अवस्थेत साधकास आदिमातेचे दिव्य दर्शन घडावे, त्याप्रमाणेच त्यांना दि. ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी हे पाच कडव्यांचे गीत अचानक स्फुरले. त्यांच्या मुखातून,
 
वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
सस्यश्यामलां मातरम्
 
असे गीताचे एक-एक शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागल्यावर, त्वरित त्यांनी ते शब्द कागदावर उतरवले. ‘मातृदेवो भव’ अशीच आपल्या भारतवर्षाची प्राचीन संस्कृती. त्यामुळे या गीतातून भारतभूमीस त्यांनी, ‘माता’ असे संबोधत तिचे स्तवन केले आहे. मग, हेच गीत पुढे ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ही कादंबरी लोकप्रिय झाल्यानंतर, भारतवर्ष हे ‘भारतमाता’ नावाने संबोधले जाऊ लागले. नंतर १८८५च्या सुमारास या कादंबरीचे नाट्यरूपांतर करण्यात आल्यावर, या नाटकातून ‘सत्यानंद’, ‘भवानंद’ या पात्रांच्या तोंडून ‘वन्दे मातरम्’चे गायन झाले. या तेजस्वी गीताच्या लेखनाचे अलौकिक कार्य हातून घडल्यावर, १८९४ साली बंकिमचंद्र यांचे अकाली निर्वाण झाले.
 
‘वन्दे मातरम्’ गीताचे स्वातंत्र्यसंग्रामातील श्रेष्ठ स्थान
 
स्वातंत्र्यसंग्रामात ‘वन्दे मातरम्’ हे केवळ एक गीतच नाही, तर तो शक्तिशाली स्फूर्तिमंत्र ठरला. स्वातंत्र्यपूर्व काळात वेदमंत्राहूनही वंद्य अशा ‘वन्दे मातरम्’मंत्राचा जयघोष करतच खुदिराम बोस, मदनलाल धिंग्रा अशा कित्येक देशवीरांनी स्वाभिमानाने हौतात्म्य पत्करले.
 
लोकमान्य टिळकांनी बंगालची फाळणी आणि लॉर्ड कर्झनवर ‘केसरी’मधील लेखातून हल्ला चढवला होता. तो लेख वाचून पेटून उठलेले विद्यार्थीदशेतील विनायक दामोदर सावरकर यांनीही टिळकांच्या पाठिंब्याने, पुण्यातच विदेशी कपड्यांची होळी केली. याप्रसंगी लोकमान्यांनी केलेल्या जहाल भाषणानंतर, सारा परिसरच ‘वन्दे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमला. मातृभूमीला वंदन करणार्‍या ‘वन्दे मातरम्’ या दोनच शब्दांनी, भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अशी अद्वितीय कामगिरी केली. या दोन शब्दांनी भारतावर राज्य करणार्‍या जुलमी ब्रिटिश साम्राज्याची अक्षरशः झोप उडवली होती. त्यामुळे इंग्रज सरकारने या गीताच्या जाहीर गायनावरच बंदी घातली. ‘वंगभंगा’विरुद्ध चळवळ करणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना ’वन्दे मातरम्’ उच्चारण्यावर बंदी घालणार्‍या बंगाल गव्हर्नर फुलर याची, लोकमान्य टिळकांनी ‘पिसाळलेला कुत्रा’ अशा शब्दांत ‘केसरी’मधील त्यांच्या अग्रलेखात निर्भर्त्सना केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टिकोनातून तर ‘वन्दे मातरम्’ हा, प्रत्येक भारतीयाच्या मनात मातृभूमीप्रति प्रेमादर व त्यागाची भावना निर्माण करणारा देशभक्तीचा मंत्रच होता. भारतीयांचे आत्मबळ वाढून, ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देण्याची ताकद या मंत्रामध्ये असल्याची सावरकरांची धारणा होती. त्यांच्या मते, ‘वन्दे मातरम्’ ही घोषणा धर्माच्या सीमा ओलांडून, सर्व भारतीयांना एकत्र आणणारी होती. याच घोषणेने सर्वधर्मीय भारतीयांच्या मनात क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली.
 
‘वन्दे मातरम्’ गीताच्या प्रसारात गायक-संगीतकारांचे योगदान
 
१८९४ साली बंकिमचंद्रांचे निर्वाण झाल्यानंतर, १८९६ मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेचे म्हणजेच, काँग्रेसचे बारावे अधिवेशन भरले. त्या अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पाच कडव्यांच्या संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गीताचे, स्वतःच्या चालीत गायन केले. हे ‘वन्दे मातरम्’ गीताचे पहिले प्रकट गायन मानले जाते. पुढे १९०१ मध्ये कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात, दक्षिणारंजन सेन यांनी केलेल्या स्वररचनेत ‘वन्दे मातरम्’ गायले गेले. त्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’चे गायनाची प्रथाच रूढ झाली. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या अधिवेशनात, ‘काफी’ रागातील स्वकृत चालीत ‘वन्दे मातरम्’ गाण्यासाठी जात.
 
असेच एकदा १९२३ साली काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात विष्णुबुवा ‘वन्दे मातरम्’ गाण्यासाठी गेले असता, अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अहमद अली यांनी या गीताच्या गायनावर आक्षेप घेतला. तेव्हा विष्णुबुवांनी, "हे कुठल्याही एका धर्माचे व्यासपीठ नाही. मी गाणारच,” असे खडसावून तिथे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गीताचे गायन केले. यानंतर पुढच्या काँग्रेस अधिवेशनात खुद्द विष्णुबुवा हे गीत गायला कधी गेले नाहीत; परंतु त्यांचे शिष्य पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. विनायकबुवा पटवर्धन तिथे गुरुवर्य विष्णुबुवांच्या चालीत ‘वन्दे मातरम्’ गाण्यासाठी जात.
 
संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हेदेखील काँग्रेस अधिवेशनात, ‘झिंझोटी’ रागातील स्वकृत चालीत ‘वन्दे मातरम्’ गायला जात. महत्त्वाच्या ठरलेल्या त्रिपुरी आणि रामगड काँग्रेस अधिवेशनात, मास्टर कृष्णराव यांनीच ‘वन्दे मातरम्’चे गायन केले होते. पं. वि. के. अंभईकर यांनीदेखील काँग्रेस अधिवेशनात, ‘खंबावती’ रागातील स्वकृत चालीत ‘वन्दे मातरम्’ गायले आहे. ‘वन्दे मातरम्’वर ब्रिटिशांनी बंदी घातली, तरी अनेक स्वातंत्र्यसैनिक ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देत असत. मास्टर कृष्णरावांसारखे कट्टर देशभक्त कलावंत, गायन मैफिलींमध्येही निर्भीडपणे या गीताचे स्वकृत चालीमध्ये जाहीर गायन करत. मास्टर कृष्णराव हे स्वा. सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेचे शपथबद्ध सदस्यही होते. मा. कृष्णरावांनी त्यांचे प्रभुत्व असलेले ‘संगीत’ हेच शस्त्र वापरून, ‘वन्दे मातरम्’ भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी १९३४ ते १९५० असा दीर्घकाळ सांगीतिक लढाही दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध आणि स्वातंत्र्योत्तर काळात ‘वन्दे मातरम्’ हे गीत राष्ट्रगीत होण्यासाठी, विरोध करणार्‍या स्वकीयांविरुद्ध मोठ्या धैर्याने, चिकाटीने व बुद्धिकौशल्य वापरून त्यांनी हा सांगीतिक लढा दिला.

‘वन्दे मातरम्’ राष्ट्रगीत होण्यासाठी ठरावीक स्वकीयांचा विरोध
 
दि. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. दीडशे वर्षे भारतावर राज्य केल्यावर, शेवटी अखंड भारताचे दोन तुकडे करूनच इंग्रज आपल्या मायदेशी परतले. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी भारताचे राष्ट्रगीत कोणते असावे, याविषयी निर्णय झाला नव्हता. ‘वन्दे मातरम्’ हेच राष्ट्रगीत असावे अशी बहुसंख्य भारतीयांची दृढ भावना होती. ‘वन्दे मातरम्’ या स्वातंत्र्यलढ्यात अभिमानास्पद अशी ऐतिहासिक कामगिरी केलेल्या गीताने, निर्विवादपणे भारतीयांच्या हृदयात अढळस्थान मिळवले होते. परंतु, राष्ट्रगीताच्या बाबतीत घटना समितीला ठोस निर्णय घेता आला नसल्याने, दि. १४ ऑगस्टच्या रात्री झालेल्या स्वातंत्र्यप्रदानाच्या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ ही दोन्ही गीते गायली गेली.
 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ‘वन्दे मातरम्’ला तीव्र विरोध करण्यात, ‘मुस्लीम लीग’ ही संघटना अग्रेसर होती. काँग्रेस अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’ गायनास बंदी घालावी, अशीच मुस्लीम संघटनेची जोरदार मागणीही होती. तेव्हा १९३७ मध्ये या वादाचे निवारण करण्यासाठी, काँग्रेसने समिती नेमली. त्यात जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे सदस्य होते. या समितीस निर्णय घेणे अवघड जात असल्याने, त्यांनी याबाबत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा सल्ला घेतला. रवींद्रनाथ हे स्वतः ‘वन्दे मातरम्’ गीताचे पुरस्कर्ते होते. त्यांनीच सर्वप्रथम या गीताचे जाहीर गायनही केले होते. समितीस पडलेला प्रश्न लक्षात घेऊन, टागोरांनी मुस्लीम संघटनेला जाचत असलेली ‘वन्दे मातरम्’मधील चार कडवी गाळून फक्त पहिले कडवे घेण्याचा निर्णय दिला. या निर्णयावरदेखील ‘मुस्लीम लीग’ने असमाधान व्यक्त करून, या गीतावरच बंदी घालावी, अशी जहाल मागणी केली.
 
जवाहरलाल नेहरुंनी बॅरिस्टर जिना यांना पत्र लिहून, ही बंदीची मागणी पूर्णपणे नाकारली. असे असले, तरी पुढील काळात पंडित नेहरूंनीही ‘वन्दे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून आत्मीयतेने कधीही विचार केला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जन गण मन’ या गीतास कायमच झुकते माप दिले. ‘वन्दे मातरम्’ने स्वातंत्र्यसंग्रामात जी महत्त्वाची भूमिका बजावली, तशी पार्श्वभूमी ‘जन गण मन’ गीतास नाही. या गीतामधील ‘अधिनायक’ या शब्दाचा अर्थदेखील, बरेच जणांना ठामपणे स्पष्ट करता येत नाही.
 
दि. २५ ऑगस्ट १९४८ या दिनी, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संसदेत घटना समिती सदस्यांसमोर राष्ट्रगीत म्हणून ‘जन गण मन’चे समर्थन केले. तसेच, ‘वन्दे मातरम्’चे संगीत व त्याच्या बॅण्डवादनाबाबतही शंका उपस्थित केली. ही बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचून, तेव्हा खान्देशातील सावदे येथे सावदेकरांच्या भेटीस आलेले मा. कृष्णराव अस्वस्थ झाले. त्यांनी तिथूनच नेहरूंना तार करून, यावर संगीततज्ज्ञ म्हणून याविषयीचे माझे मत ऐकून घ्यावे, अशी विनंती केली. त्वरित नेहरूंनी तारेस उत्तर देत, पुढच्या रविवारी दिल्लीस यावे, असे निमंत्रणही दिले. त्याप्रमाणे मा. कृष्णराव दिल्लीस गेले. ‘वन्दे मातरम्’ या गीताचे सामूहिकरीत्या गायन व बॅण्डवादन होऊ शकत नाही, असा नेहरूंचा आक्षेप मा. कृष्णरावांनी संसदेत घटना समिती सदस्यांसमोर स्वकृत ध्वनिमुद्रणे ऐकवून खोडून काढला. त्या ध्वनिमुद्रिका ऐकून नेहरू निरुत्तर झाले. तरीही, त्यांनी ‘वन्दे मातरम्’ गीताचे राष्ट्रगीत म्हणून समर्थन केले नाहीच. दि. २६ जानेवारी या दिवसापासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली भारतीय राज्यघटना अमलात येणार होती. म्हणूनच, दि. २४ जानेवारी १९५० रोजी, घटना समिती सदस्यांची अंतिम बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रगीताबाबत घटना समिती सदस्यांचे कोणतेही मतदान न घेता, एकतर्फीपणे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रगीताविषयी थेट निवेदन जाहीर केले. त्याचा मथितार्थ पुढीलप्रमाणे -
 
‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत (national anthem) असेल. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक कामगिरी बजावलेले ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत (national song) असेल आणि त्यास ‘जन गण मन’ गीताच्या बरोबरीने मान दिला जाईल.
 
‘वन्दे मातरम्’ गीतास ‘मुस्लीम लीग’चा तीव्र विरोध असला, तरी सर्वच मुस्लीम धर्मियांचा विरोध अजिबात नव्हता. मा. कृष्णरावांनी दिलेल्या ‘वन्दे मातरम्’च्या चालीस तर, ‘जयपूर-अत्रौली’ घराण्याचे संस्थापक संगीतसम्राट अल्लादिया खाँसाहेब आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक फैय्याज खाँसाहेब यांनी भरभक्कम पाठिंबा देऊन, तशी लेखी पत्रेच लिहून दिली होती. ती समर्थन पत्रे कृष्णरावांनी संसदेत सादरदेखील केली. परंतु, देशाचे पंतप्रधान असलेल्या नेहरूंनी फक्त ‘मुस्लीम लीग’ने ‘वन्दे मातरम्’ गीतास केलेला विरोध विचारात घेतला आणि एकाधिकारशाहीने या गीतास ‘राष्ट्रगीत’ म्हणून मान्यता देण्याचे टाळले. त्यांनी या गीताबाबत घेतलेल्या सर्व आक्षेपांना मा. कृष्णरावांसारख्या देशात संगीत क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रतिभाशाली गायक व संगीतकाराने संगीतातून दिलेल्या सडेतोड उत्तरांमुळे, नेहरूंना हे गीत पूर्णपणे वगळणे शय झाले नाही. ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून निदान एका कडव्याचे तरी ‘वन्दे मातरम्’ त्यांना घ्यावेच लागले.
 
जगामध्ये फक्त भारत देशातच तत्कालीन पंतप्रधानांच्या दुराग्रही धोरणामुळे, राष्ट्रगीताबाबत राजकारण खेळले गेले आणि त्यात ‘वन्दे मातरम्’ या गौरवशाली गीताचा बळी गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीतावर बंदी घालणारे सत्ताधारी इंग्रज हे निदान परकीय तरी होते; परंतु स्वातंत्र्योत्तर काळात या गीतास विरोध करणारे स्वकीयच होते, हे वास्तव विसरता येणार नाही.
 
प्रिया फुलंब्रीकर




संबंधित मजकूर