दत्तात्रय भास्कर धामणस्कर या भारदस्त नावाचे कवी हे ‘दभा’ किंवा ‘आबा’ या सोप्या, साध्या व सरळ नावाने, वाङ्मयविश्वात परिचित होते. त्यांचा स्वभावही तसाच साधा, सरळ आणि मितभाषी. दीर्घायुष्य लाभलेल्या या कवीने केवळ २७५ पानांत मावतील, असे तीनच कवितासंग्रह प्रसिद्ध केले. त्यांच्या बहुतांश कविता एकपानी व मिताक्षरी. फारच मोजक्या कविता दुसर्या पानावर विस्तारलेल्या. अशा जेमतेम २५० कविताच त्यांनी आयुष्यात लिहिल्या. सहा ओळींच्या कवितेपासून ४० ओळींच्या कवितेपर्यंत. त्यातही दुपानी कवितांची संख्या जेमतेम १२ ते १५. बस्स. पण, एकेक कविता अशी तालेवार आणि आशयसंपन्न की, वाचणार्याच्या मेंदूला दीर्घ काळ पुरेल एवढा खुराक. अगदी अलीकडेच त्यांनी, आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण केले. त्या अलिबाबाच्या गुहेत आबांनी काय काय दडवून ठेवलंय, हे त्यांचे त्यांनाच माहीत. प्रकाशित होईपर्यंत ‘खुल जा सिम सिम’ म्हणायची सोय नाही. तर, असे हे बिलंदरपणाचा अंशही नसलेले सरळमार्गी कलंदर साहित्यिक.
एकनाथ दत्तात्रय अडावदकर हे माझे मामा आणि दभांचे सख्खे मित्र. तत्त्वचिंतन हा या दोघांचे मैत्र जुळविणारा महत्त्वाचा दुवा. संस्कृत, मराठी व इंग्रजी साहित्य आणि तत्त्वज्ञान यात मामा पारंगत, तर निसर्ग, माणूस आरपार व अंतर्बाह्य जोखणारे आणि अध्यात्माची आवड असणारे दभा. दोघे एकमेकांना भेटले की, विचारांना खाद्य पुरविणार्या तासन्तास गप्पा, चर्चा. अशा काही भेटींचा, गप्पांचा, चर्चांचा मी साक्षीदार आहे. सामान्य दिसणारी व असणारी माणसं किती असामान्य असू शकतात, प्रत्यक्षात याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे दोघे मित्र. मामाने त्यांची मला प्रथम ओळख करून दिली, त्याला ४० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. दभांच्या सकस कवितेबद्दल, त्यातील गूढ तत्त्वचिंतनाबद्दल मामाला किती आदर आहे आणि मामाच्या विद्वत्तेबद्दल दभांना किती आदर आहे, याचा अनुभव मला आहे . "तुमचे मामा म्हणजे दुर्लक्षित हिरा आहेत,” असे दभा एकदा सहज म्हणून गेले. "गुणी गुणं वेत्ति’ हेच खरे!
गेल्या ४० वर्षांत दभांच्या आणि माझ्या १०-१२ अशा मोजक्याच भेटी झाल्या. पण, प्रत्येक भेट संस्मरणीय. मेंदूला झिणझिण्या आणणारी. कधी मी त्यांच्या घरी गेलो, तर कधी ते माझ्या घरी, काही भेटी तर रस्त्यातच. जिथे भेटू तिथे साहित्यविषयक चर्चा ठरलेलीच. एकदा ते मला उद्देशून सहज म्हणाले, "इंग्रजीचे प्राध्यापक खूप पाहिले. पण, इंग्रजी साहित्याचे खरे जाणकार फार कमी.” तेव्हा अंगावर मूठभर मांस चढल्याचाच अनुभव मी घेतला. प्रत्येक भेटीत ते दोन प्रश्न हमखास विचारत, ‘हल्ली तुम्ही नवे काय वाचताय’ आणि ‘इंग्रजी कवितेत नवे असे काय जाणवले,’ या प्रश्नांच्या उत्तरांची तयारी असल्याशिवाय, मी शक्यतो त्यांना भेटतच नसे. माझ्या घरी आले की, ते माझ्या ग्रंथसंग्रहात खूप रमत. एका भेटीत त्यांनी मला ‘बरेच काही उगवून आलेले’ हा काव्यसंग्रह भेट दिला. तेव्हा माझ्या डोळ्यांतले आनंदाश्रू मी लपवू शकलो नाही. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘प्रा. श्याम अत्रे यांसी स्नेहपूर्वक, कृतज्ञतापूर्वक... द. भा. धामणस्कर.’ अक्षर रेखीव, सही लफ्फेदार, थेट मंगेश पाडगांवकरांच्या देखण्या सहीचीच आठवण करून देणारी. मी उत्तरादाखल एवढेच म्हणालो, "आबा, कृतज्ञता तर माझ्या मनात दाटली आहे.”
माझ्या ग्रंथसंग्रहात प्लेटो, अॅरिस्टोटलपासून मार्क्स, रसेलपर्यंत अनेक वैचारिक ग्रंथ आहेत. हिंदू चिंतनावरही अनेक ग्रंथ आहेत. या सर्वसमावेशक ग्रंथसंग्रहाचे त्यांना अपार कौतुक होते. इंग्रजी, मराठी काव्यसंग्रही आहेत. एकदा त्यांच्या हाती कोलरिज या आंग्लकवीचा काव्यसंग्रह लागला. तेव्हा मी म्हणालो, "आबा, कोलरिजची Ancient imariner ही कविता आठवते का? त्यातल्या त्या खास ओळी? Water, water everywhere, But not a drop to drink! त्यावर आबा उत्स्फूर्तपणे म्हणाले, "राजकवी भा. रा. तांबे यांच्या वाचनात कोलरिजची ही कविता आली होती की नाही, हे मला माहीत नाही. पण त्यांच्या एका कवितेत ‘समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही!’ या ओळी आल्या आहेत.” ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो.
माझ्या संग्रहात वॉट व्हिटमन या कवीचा ’लिव्ह्ज ऑफ ग्रास’ हा कवितासंग्रह आणि त्याचा प्रा. सदानंद रेगे यांनी केलेला मराठी अनुवाद, हे दोन्ही ग्रंथ आहेत (तृणपर्णे). त्यातील एकपानी, अल्पाक्षरी कवितेचा संदर्भ देत मी म्हणालो, "आबा, व्हिटमनच्या कविता वाचताना मला तुमच्या कवितांची आठवण येते. two great people think alike असं काही आहे का?” त्यावर ते प्रसन्नपणे हसले.
दि. २३ एप्रिल ही शेक्सपियरची जन्मतारीख. हा दिवस‘जागतिक वाचन दिन’ म्हणूनही साजरा होतो. काही वर्षांपूर्वी यानिमित्ताने झालेल्या एका खासगी कार्यक्रमात, ४०-५० जाणकार व रसिक श्रोत्यांसमोर मी ‘शेक्सपिअरच्या शोकांतिका’ हा विषय दीड तास मांडला. माझे सुदैव असे की, दभा त्या कार्यक्रमात श्रोता म्हणून आवर्जून उपस्थित होते. व्याख्यानानंतर ते माझ्या जवळ आले आणि पाठीवर कौतुकाची थाप मारली, मी निःशब्द. आबांनी केलेले ते कौतुक मला आशीर्वादरूपच होते. अशा आबांच्या अनेक आठवणी असून, तीच माझी खरी श्रीमंती आहे.
त्यांच्या कवितेबद्दल चार शब्द लिहिल्याशिवाय, हे छोटेखानी टिपण पूर्णच होऊ शकत नाही. त्यांच्या कवितेत निसर्ग, माणूस आणि अध्यात्म जागोजागी दिसते. आबांचे सर्व जाणते आयुष्य, डोंबिवलीतील सिमेंटच्या जंगलात गेले. नोकरी रिझर्व्ह बँकेत असल्याने, रुक्ष आकडेमोड आणि खर्डेघाशी यात गेले. दररोज तीन-साडेतीन तास लोकलच्या जीवघेणा प्रवास आलाच. मात्र, या प्रवासाचा त्यांना एक फायदा झाला. ते माणसं वाचायला शिकले. नाना प्रकार, नाना वृत्ती-प्रवृत्ती, त्यातून आलेले व्यामिश्र अनुभव, हे सारेच त्यांच्या कवितेत झिरपत राहिले. माणूस त्यांनी अंतर्बाह्य पाहिला, अनुभवला. त्याला चिंतनाची जोड मिळाली आणि एक एक कविता सहजपणे फुलत, उमलत गेली. त्यांच्या कवितेत निसर्गाची नाना रूपे आहेत, मानवी स्वभावाच्या बर्या-वाईट सर्व छटा आहेत. कधीकधी त्यांच्या कवितेत उपहास आणि उपरोध जाणवतो पण, तो मनाला जखमा करीत नाही, तर अंतर्मुख करतो. दभा कोणत्याही वादात (ism) अडकले नाहीत. त्यांच्या चिंतनातूनच त्यांचे तत्त्वज्ञान विकसित झाले. त्यामुळे त्याला जमिनीवरील वास्तवाचा, त्यांच्या व्यक्तित्वाचा गंध आहे.
आपल्या ‘या फुलांचे काय करायचे’ या कवितेत ते म्हणतात, "पाहा कशी असतात अस्तित्वाच्या मस्तीत/पहा कशी असतात सर्वस्वी त्यांचीच/सदैव झाडावर वा मातीत/फुलण्यापूर्वी, फुलताना वा निर्माल्य झाल्यावरही/परमेश्वराला शरण गेलेल्या ह्या कोमल पाकळ्यांनी/मृत्यूला नगण्य केले आहे.” आणखी एका कवितेत ते म्हणतात, "माझी चाहूल लागता पक्षी/घाबरून आकाशात उडाला/मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक/नवीन वाक्य लिहिले/क्षुद्राकडून धोका संभवताच शहाणे/विराटाकडे धाव घेतात.” अशी टोकदार, धारदार कविता लिहितात दभा, म्हणूनच ते मोठे कवी!
दभा कोणत्याच कवी संमेलनाच्या व्यासपीठावर फारसे कधी दिसले नाहीत. याची त्यांना खंत नव्हती आणि खेदही. हा अंतर्मुखी माणूस कमी, पण आशयघन बोलणारा, लिहिणारा. खोलवर विचार करणारा, निसर्गात रमणारा व एकांतप्रिय. वृत्तीने आत्मविलोपी, मीपणाचा लवलेश नसणारा. कविवर्य बा. भ. बोरकरांच्या शद्बांत सांगायचे तर,
मीपण ज्यांचे पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो!
तर असे होते, मी अनुभवलेले कविवर्य द. भा. धामणस्कर!
प्रा. श्याम अत्रे
९३२४३६५९१०