ठाणे : (Thane Ganeshotsav) आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्व मंडळांनी काटेकोर पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले. गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, विसर्जन घाटांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मंडळांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, जितेंद्र निकम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी विद्या सावंत, महापालिकेचे अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर तसेच ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (Thane Ganeshotsav)
१३२ विसर्जन स्थळे, २३ कृत्रिम तलाव
गणेशोत्सवासाठी महापालिकेने मोठी तयारी केली असून, महापालिका हद्दीत एकूण 132 विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 23 ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. सहा फुटांपर्यंत उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Thane Ganeshotsav)
मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आवश्यक ठिकाणी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तांत्रिक बाबींचा विचार करून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ठाण्यासह मुलुंड परिसरातील मोठ्या गणेशमूर्तींचेही काही घाटांवर विसर्जन होत असल्याने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व विसर्जन घाटांची स्वतः पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Thane Ganeshotsav)
खड्डे बुजवा, परवानग्या द्या!
गणेशोत्सवापूर्वी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मंडळांना विविध समस्या असल्यास संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी निवेदन द्यावे, त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. (Thane Ganeshotsav)
मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी घेताना तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच गृहनिर्माण संस्थांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठीही ऑनलाइन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. (Thane Ganeshotsav)
बैठकीनंतर महापौरांनी सहाय्यक आयुक्तांची स्वतंत्र तातडीची बैठक घेतली. प्रत्येक प्रभागातील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडळांच्या परवानग्या लवकर द्याव्यात, प्राप्त तक्रारींचे त्वरित निराकरण करावे आणि विसर्जन घाटांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. (Thane Ganeshotsav)
नियमांचे पालन करावे
'पर्यावरणाचे रक्षण करत उत्सवाची परंपरा जपत, प्रशासन आणि पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मंडळांनी सहकार्य केल्यास ठाण्यातील गणेशोत्सव अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होईल असा मला विश्वास आहे" - शर्मिला पिंपळोलकर,महापौर-ठाणे (Thane Ganeshotsav)