ठाणे : (RTO) रिक्षाचालकांचा नकार, मनमानी भाडेवसुली आणि प्रवासी-चालकांमधील रोजचे वाद आता थांबण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात लवकरच प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्यात येणार असून, या प्रस्तावाला सोमवारपर्यंत शासनाची मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. या व्यवस्थेमुळे प्रवाशांना निश्चित भाड्यात सुलभ आणि सुरक्षित रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे.
मागील आठवड्यात आमदार केळकर यांनी वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक समस्यांची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात वाहतूक शाखा, आरटीओ आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, रिक्षाचालकांची मनमानी आणि प्रवाशांच्या तक्रारींसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.(RTO)
आधी भाडे निश्चित, मग रिक्षा!
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने प्री-पेड रिक्षा सेवेचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासंदर्भात प्रधान सचिवांशी चर्चा झाली असून सोमवारपर्यंत मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे केळकर यांनी सांगितले. (RTO)
या योजनेनुसार, रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशाने आपल्या गंतव्यस्थळाची माहिती देऊन आधीच निश्चित भाडे भरायचे आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्यामुळे भाड्यावरून होणारी घासाघीस, चालकांकडून होणारी मनमानी, प्रवाशांना दिला जाणारा नकार आणि गंतव्यस्थळावरून होणारे वाद रोखण्यास मदत होणार आहे. (RTO)
रिक्षाचालकांच्या अरेरावीवर आरटीओची नजर
ठाणे स्थानक परिसरात काही रिक्षाचालकांकडून होणारी अरेरावी आणि मुजोरी रोखण्यासाठी आरटीओकडून आता सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत चार-चार तास दोन अधिकारी तैनात ठेवले जाणार आहेत. यामुळे रिक्षाचालकांच्या गैरवर्तनावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच स्थानक परिसरातील वाहतूकही अधिक शिस्तबद्ध होईल, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. (RTO)
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही उपाययोजना
बैठकीत वागळे इस्टेट, कोपरी, इंदिरानगरसह विविध भागांतील वाहतूक समस्यांवरही चर्चा करण्यात आली. अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजनांची माहिती बैठकीत दिल्याचे केळकर यांनी सांगितले. (RTO)
या बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरय्या, अनिता यादव तसेच जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदी उपस्थित होते. (RTO)