१०० वर्षांची वाटचाल पूर्ण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहताना त्याचे वय १०० वर्षे आहे, असे सहज म्हणता येईल. मात्र, संघाच्या शाखांमध्ये, उपक्रमांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात डोकावले तर एक वेगळेच चित्र दिसते. कारण, संघाच्या कार्याची खरी ऊर्जा आजही तरुण आणि बालस्वयंसेवकांकडूनच प्रवाहित होत आहे. शतकभरापूर्वी काही बालकांना एकत्र करून सुरू झालेली ही संघटनयात्रा आज लाखो तरुणांच्या सहभागातून विराट स्वरूप धारण करत आहे. आजच्या शाखांपासून ते शिक्षण, सेवा आणि सामाजिक उपक्रमांपर्यंत नव्या पिढीचा ठसा स्पष्टपणे दिसतो. म्हणूनच संघाची शताब्दी ही केवळ भूतकाळाचा गौरव करण्याची संधी नसून, पुढील शतकाची दिशा ठरवणार्या नव्या पिढीकडे पाहण्याचीही वेळ आहे.
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सरसंघचालकांनी ‘जनरेशन-झेड’ मुलांमध्ये प्रचलित असलेला ‘लॉक-इट’ (म्हणजे समजले किंवा लक्षात आले) हा हातवारा खेळकरपणे करून दाखवला आणि मंचावरून हसत म्हणाले, "आज मी तुमच्याकडून एक नवीन अभिव्यक्ती शिकलो.” त्यावर उपस्थित तरुणांनी टाळ्या आणि जल्लोषाने सभागृह दणाणून सोडले. दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत तरुणांशी संवाद साधत होते. त्या कार्यक्रमात मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नांना, शंकांना आणि चिंतांना त्यांनी दिलेल्या उत्तरांची चर्चा आजही विविध माध्यमांमध्ये सुरू आहे.
२०२५ मध्ये संघाच्या ४ हजार ४१५ प्रारंभिक आणि प्राथमिक वर्गांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे तीन दिवसांचे आणि सात दिवसांचे प्रशिक्षणवर्ग होते. विशेष म्हणजे, हे वर्ग संघाच्या प्राथमिक प्रवेश प्रशिक्षणाचे महत्त्वाचे माध्यम असून, त्यामध्ये १४ ते २५ वर्षे वयोगटांतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्या कार्यक्रमात आपण जे पाहिले, तो एक अत्यंत मनस्वी आणि आश्वासक संवाद होता. २१व्या शतकासोबत जन्मलेली आणि वाढलेली ‘जनरेशन-झेड’ आणि ‘जनरेशन-अल्फा’ आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या संघटनेचा ज्येष्ठ मार्गदर्शक या नव्या पिढीशी इतया सहज, आपुलकीने आणि समरसतेने कसा संवाद साधतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. हे नेमके कसे घडते, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.
आज बहुतेकांना माहीत आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म, वाढ आणि विस्तार हा बालस्वयंसेवकांच्या माध्यमातूनच घडला. डॉ. केशवराव हेडगेवार यांनी काही लहान मुलांना एकत्र करून सुरू केलेला संघ प्रत्येक पिढीतील तरुणांच्या सामूहिक भावनेवर, समर्पणावर आणि कार्यतत्परतेवर उभा राहत सर्व अडथळे पार करत पुढे गेला. एकेकाळी संघाला ‘मुलांचा लब’ किंवा ‘पोरांचा खेळ’ म्हणून हिणवले गेले, तरीही त्याच तरुणशक्तीच्या बळावर संघाचा विस्तार होत राहिला. संघावर बंदी आली, आणीबाणीसारखी कठीण वेळ आली, देशावर युद्धाचे संकट आले किंवा आपत्तीच्या काळात स्वयंसेवक मदतीसाठी धावून गेले, तेव्हा सर्वप्रथम धैर्याने पुढे उभे राहिले ते तरुण स्वयंसेवकच! पिढ्यान्पिढ्या असंख्य तरुणांनी अमानुष छळ सहन केला आणि संघकार्याच्या ध्येयासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान दिले.
सन २०२५-२६च्या वार्षिक अहवालानुसार, संघाचे जाळे आज ८८ हजार ९४९ शाखांपर्यंत विस्तारले आहे. यांपैकी बहुसंख्य शाखा ‘जनरेशन-झेड’ स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चालतात आणि टिकून आहेत. संघाच्या शताब्दी वर्षातील विविध कार्यक्रमांमध्ये ‘जनरेशन-झेड’ तरुणांचे प्रतिनिधित्व अभूतपूर्व होते. २०२५च्या विजयादशमी उत्सवात २७ लाख ८ हजार १८६ तरुण-स्वयंसेवक आणि ५ लाख ३६ हजार ९५५ बालस्वयंसेवक सहभागी झाले. ही एकत्रित संख्या नव्या पिढीच्या प्रचंड सहभागाची साक्ष देते. शताब्दी वर्षात देशभर आयोजित पथसंचलने आणि विविध कार्यक्रमही नव्या पिढीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष ठरले. हे स्वयंसेवक शहरी, ग्रामीण आणि जनजातीय भागांतून, तसेच शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शिक्षणसंस्थांतून पुढे येतात. समाजातील प्रत्येक क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करतात. याच वयोगटात संघाशी आत्मीयतेने जोडलेले लाखो हितचिंतक आणि सहप्रवासीही आहेत, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे.
१०० वर्षांची संघटनात्मक वाटचाल पूर्ण करणार्या या संघटनेत आज असे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत, जे ९० वर्षांहून अधिक काळ संघाशी जोडलेले आहेत. तरीही, संघाच्या कार्याकडे बारकाईने पाहणारा प्रत्येकजण एकमुखाने म्हणेल की, संघाचे वय आजही १६ वर्षांचेच आहे. याचे कारण म्हणजे, भारतभरातील हजारो शाखांचे स्पंदन आजही मुख्यत्वे तरुण आणि बालस्वयंसेवकांमुळे जिवंत आहे. वार्षिक अहवाल सातत्याने सांगतात की, दैनंदिन शाखेत उपस्थित राहणार्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक जण विद्यार्थी आहेत. अगदी ‘कोविड’ काळातही शाखेतील ६१ टक्के उपस्थिती विद्यार्थ्यांचीच होती. म्हणजेच, वर्ष २००० नंतर जन्मलेल्या नव्या पिढीची. याशिवाय, जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे (अभाविप) साडेसात दशलक्षांहून अधिक सक्रिय सदस्य याच पिढीचा महत्त्वाचा भाग आहेत. तसेच ‘विद्या भारती’ संचालित शाळांमधून संस्काराधिष्ठित शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थीही याच नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात.
२०२२ मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेपूर्वी तत्कालीन सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेल्या आकडेवारीनुसार, केवळ ‘कोविड’ काळातच ‘जॉईन आरएसएस’ या ऑनलाईन व्यासपीठाद्वारे १ लाख २५ हजार तरुणांनी संघात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०१२ मध्ये या व्यासपीठाची सुरुवात झाल्यापासून लाखो युवक-युवती संघकार्याशी जोडण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामध्ये हजारो तरुणींचाही समावेश आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे, या अर्जदारांमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर यांसारख्या ईशान्येकडील राज्यांतील तरुणांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सरसंघचालकांनी विविध उपक्रमांच्या आयोजन आणि समन्वयासाठी दोन वर्षे पूर्णवेळ विस्तारक म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत २ हजार ४५३ स्वयंसेवकांनी ‘शताब्दी विस्तारक’ म्हणून घरपरिवार आणि वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवत पूर्णवेळ कार्याची जबाबदारी स्वीकारली. त्यागाची ही भावना याच नव्या पिढीची ओळख ठरते. २०२५ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’दरम्यान पत्रकार परिषदेत अखिल भारतीय सहसरकार्यवाह मुकुंद सी.आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी झालेल्या प्रारंभिक वर्गातील २ लाख २२ हजार ९६२ सहभागींपैकी १ लाख ६३ हजार स्वयंसेवक १४ ते २५ वर्षे वयोगटांतील होते. गेल्या १०० वर्षांत संघाने समाजाला हे दाखवून दिले आहे की, पाच वर्षांचा बालक असो, १५ वर्षांचा तरुण असो किंवा ५० वर्षांचा प्रौढ असो, प्रत्येकजण राष्ट्रनिर्मितीत सारख्याच अर्थपूर्णपद्धतीने योगदान देऊ शकतो.
+
आजची ही नवी पिढी केवळ संघाच्या दैनंदिन कार्याचे नेतृत्व करत नाही; तर त्याच्या बहुतेक शैक्षणिक, सामाजिक आणि सेवा उपक्रमांचाही प्रमुख आधार बनली आहे. यादृष्टीने पाहिले, तर आजची ‘जनरेशन-झेड’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विराट चळवळीची प्रेरक शक्ती आहे. देशभरातील दैनंदिन शाखा या गोष्टीची साक्ष देतात की, स्पष्ट दृष्टी, कृती क्षमता आणि राष्ट्रभावनेने प्रेरित अशी एक उत्साही नवी पिढी समाजात सशक्तपणे उभी आहे. हीच पिढी संघाचे उद्याचे भविष्य घडवत आहे. अलीकडे माध्यमांमधून देशाच्या विविध भागांतील ‘जनरेशन-झेड’ तरुण सरसंघचालकांसोबत एका मंचावर संवाद साधताना जनतेने पाहिले. मात्र, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे की, गेल्या १०० वर्षांपासून सरसंघचालक आणि संघाचे कार्यकर्ते या तरुणपिढीशी सातत्याने संवाद साधत आले आहेत. ते त्यांच्या परिसरात जाऊन, त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेले आहेत. म्हणूनच, १००व्या वर्षातही संघ आजही १६ वर्षांच्या तरुणाईच्या ऊर्जेने कार्यरत आहे, यामागचे हेच खरे रहस्य आहे.
(लेखक ‘प्रज्ञा प्रवाह’चे राष्ट्रीय संयोजक आहेत.)
-जे.नंदकुमार