जंतरमंतरवरील आंदोलकांवर झालेल्या कथित पोलीस अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली असली, तरी राहुल गांधी यांना रस्त्यावर ‘ठिय्या’ देऊन तमाशा करण्यातच अधिक स्वारस्य. पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर केल्याचे पुरावे राहुल गांधींनी या समितीला द्यायला हवेत. ते न करता, पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यामागे ताज्या ‘वन्दे मातरम्’ अवमानाच्या प्रकरणावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचाच त्यांचा डाव काल उघडा पडला.
जंतरमंतरवरील आंदोलक संसदेवर मोर्चा घेऊन जात होते, तेव्हा त्यांना अडविण्यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षकांना बळाचा वापर करावा लागला. तेव्हा पोलिसांनी ‘पॅलेट गन’चा वापर केला आणि विद्यार्थ्यांना खिळे ठोकलेल्या लाठ्यांनी मारहाण केल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. गंमत म्हणजे, ज्या ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून हे आंदोलन आयोजित केले होते, त्या पक्षाच्या नेत्यांनी याविषयी पुढे काहीच केल्याचे ऐकीवात नाही. मात्र, राहुल गांधींना या आंदोलनाचे राजकीय श्रेय लाटायचे असल्याने, त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे बेछूट आरोपांच्या फैरी झाडल्या. पण, याच आंदोलनात पोलिसांवरही मोर्चेकर्यांकडून हल्ले झाले आणि त्यात दीडशेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते, त्याबद्दल मात्र राहुल गांधी सोयीस्कर मौन बाळगून आहेत.
गेल्या दि. २० जुलै रोजी जंतरमंतरवरील आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला होता. पण, संसदेवर मोर्चा नेण्यास कायद्याने बंदी आहे. कारण, संसद हा अतिसंवेदनशील भाग. तेव्हा या आंदोलकांना संसदेबाहेर रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता आणि तो समर्थनीयच म्हणावा लागेल. पण, याच गोंधळात पोलिसांवरही विद्यार्थ्यांकडून भीषण हल्ले करण्यात आले. त्यात सुमारे दीडशे पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यात साध्या कॉन्स्टेबलपासून उपायुक्त पदावरील अधिकार्यांचाही समावेश आहे. मात्र, हे हल्ले विद्यार्थ्यांनी केले नसून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून काही समाजकंटकांनी केल्याचा दावा करण्यात आला. अलीकडेच पोलिसांनी देशभरात टाकलेल्या धाडींमधून शहजाद भट्टी या गुंडाच्या अड्ड्यांवर धाडी टाकून सुमारे २०० आरोपींना अटक केली आहे. या आंदोलनाच्या आडून पोलिसांवर हल्ले करणे आणि दिल्लीत हिंसाचार भडकविणे, हा त्याच्या टोळीचा हेतू असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, याकामी पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या दहशतवादी लष्करी संस्थेने त्याला मदत केल्याचेही म्हटले आहे. जंतरमंतर आंदोलनाला परकीय शक्तींची सक्रिय मदत होती आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या समस्यांपेक्षा मोदी सरकारला अस्थिर करण्यासाठीच होते, ही गोष्टही एव्हाना स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या कथित आंदोलनाला पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांकडून मदत मिळाली असल्यास त्यात नवल नाही. भट्टी याच्या टोळीवरील धाडीतून हे सत्य बाहेर पडेलच.
राहुल गांधी यांनी यापैकी कशाचीही दखल घेतलेली नाही. त्यांनी एकच टुमणे लावले आहे की, या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या रक्षकांनी हल्ले केले आणि त्यांच्यावर ‘पॅलेट गन’ चालविली. सरकारने त्याचा ठामपणे इन्कार केलेला आहे. दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येते. परिणामी, राहुल गांधी यांना या लाठीमाराचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी लावायचा असून, त्यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जंतरमंतरवरील आंदोलनाचा विषय आता संपुष्टात आला असून, ना जनता, ना विद्यार्थ्यांना (अगदी ‘कॉकरोच जनता पार्टी’लाही) आता त्यात काही स्वारस्य उरलेले दिसते. तरीही, राहुल गांधी हे त्या आंदोलनातून बाहेर पडण्यास तयार नाहीत, यामागे वेगळेच कारण असावे असे वाटते.
‘जन-गण-मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ या दोन राष्ट्रीय गीतांचे वादन सुरू असताना त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यास वा अन्य प्रकारे अवमान केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा कायदा संसदेने नुकताच संमत केला. योगायोगाने यंदा स्वातंत्र्य दिनी काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल व सोनिया गांधी यांच्याकडून ‘वन्दे मातरम्’ या गीताचा उघड अवमान करण्यात आला. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचे व्हिडिओ चित्रण अगदी स्पष्ट आणि निर्विवाद असल्याने हे प्रकरण आपल्या अंगावर शेकेल, याची खात्री गांधी परिवाराला वाटते. या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच तर राहुल गांधींनी पोलीस ठाण्यासमोर हे ‘ठिय्या’ आंदोलन सुरू केले नाही ना, अशी शंका येते.
विद्यार्थ्यांवरील या हल्ल्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमली असून, ती या अत्याचारांची चौकशी करीत आहे. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी ‘पॅलेट गन’ चालविली वा खिळे ठोकलेल्या लाठ्यांनी हल्ला केला, असे पुरावे ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी या समितीकडे ते सुपूर्द केले पाहिजेत. राहुल गांधी यांना आपल्या या दाव्यावर भलताच विश्वास आहे, असे दिसते. त्यांनी अशा हल्ला झालेल्या एका विद्यार्थ्यालाही पत्रकारांपुढे सादर केले होते. राहुल गांधींकडे या कथित पोलीस अत्याचाराचा सज्जड पुरावा असेल, व्हिडिओ चित्रण असेल; तर तो पुरावा त्यांनी या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला दिला पाहिजे. पोलिसांकडे तक्रार नोंदवितानाही त्यांनी हा पुरावा पोलिसांना द्यावा. याला ‘कॉमन सेन्स’ म्हणतात. मात्र, तसे काही करण्यात राहुल गांधींना अजिबात स्वारस्य नाही. त्यांना या प्रकरणाचा राजकीय तमाशा करायचा असून, पुन्हा एकदा आंदोलन करायचे आहे. पण, सामान्य लोक आणि विद्यार्थ्यांसाठी हा विषय संपुष्टात आला आहे, याची जाणीवही त्यांना नाही. याचे कारण, त्यांचे हेतू शुद्ध नाहीत आणि त्यांना जनतेची नाडी सापडलेली नाही. विद्यार्थी आणि सामान्य जनता आता जंतरमंतर आंदोलनाच्या पुढे निघून गेले आहेत. पण, राहुल गांधी यांचे राजकीय ईप्सित साध्य झाले नसल्याने ते या जुन्याच कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, त्यातून काहीही साध्य होणार नाही.
केवळ प्रसिद्धीसाठी आणि तरुणांचे नेते आपणच आहोत, याचे श्रेय घेण्यासाठी राहुल गांधी हे ‘राजकीय मदारी’ बनले आहेत. पाळलेल्या माकडाकडून रस्त्यावर काही कसरती करवून बघ्यांकडून मदारी पैसे कमावतो. राहुल गांधींचे रस्त्यावरील आंदोलन म्हणजे ‘राजकीय मदारीपणा’च!