ऑपरेशन सफेद सागर : कारगिल युद्धातील हवाई दलाची शौर्यगाथा

    22-Aug-2026
Operation Safed Sagar Review
 
 
रगिल युद्धातील लष्करी जवानांची देशभक्ती, शौर्य आणि त्याग यांवर ‘एलओसी कारगिल’, ‘लक्ष्य’ आणि ‘शेरशाह’ यांसारखे अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले असले, तरी या युद्धातील भारतीय हवाई दलाचे योगदान केंद्रस्थानी आले नाही. याचसंदर्भात, भारतीय हवाई दलाची ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही वेबसीरिज, आपल्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि अढळ मनोबलाने १९९९च्या युद्धात देशाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करणार्‍या त्या हवाई दलातील वीरांना वंदन करते.
 
एकूण सहा भागांची ही वेबमालिका ‘नेटफ्लिस’वर नुकतीच प्रदर्शित झाली असून, दिग्दर्शक ओनी सेन यांचा हा देशभक्तीपर युद्धपट निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. ही कथा आहे, ‘रेझर ब्लेड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हवाई दलाच्या ‘गोल्डन अ‍ॅरोज’ या शूर तुकडीची, ज्यांनी कारगिल युद्धादरम्यान ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही जगातील सर्वांत उंच आणि सर्वांत कठीण हवाई मोहीम यशस्वीपणे पार पाडली. १९९९ साली जेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (अंजन श्रीवास्तव) शेजारील पाकिस्तानसोबत शांततेच्या आशेने बसने लाहोरला तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ (विनय पाठक) यांच्यासोबत शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी रवाना होते; त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (मनू ऋषी चड्ढा) भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याची रणनीती आखत होते. मुशर्रफ यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून कारगिल, द्रास, बटालिक आणि मशकोह यांसारखी भारताची उंच शिखरे ताब्यात घेतली. त्यामुळे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या या हिमशिखरांवर पुन्हा भारताचा तिरंगा फडकावण्यासाठी प्रयत्नशील असणारे भारतीय जवान हुतात्मा होत होते. कारण, पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या उंचावरील पोस्ट्स. म्हणूनच मग हवाई दलाच्या जवानांनी सैन्याला पाठिंबा देण्यासाठी आकाशात झेप घेतली.
 
विंग कमांडर बिरेंद्रसिंग धनोआ (जिमी शेरगिल) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा (सिद्धार्थ), फ्लाईंग ऑफिसर आरएस धालीवाल ऊर्फ धाली (अभय वर्मा), सीएच बाल रेड्डी ऊर्फ बालदी (मिहिर आहुजा), जितेंद्र संगवान संगीना (गोटुका) यांनी १५ हजार ते १८ हजार फूट उंचीवर, शत्रूच्या क्षेपणास्त्रांना नेस्तनाबूत करत आणि आपला जीव धोयात घालून शत्रूचे अनेक हल्ले परतवून लावले.
 
या मोहिमेत अजय अहुजा हुतात्मा झाले. तरीही, जास्त उंची, कमी ऑसिजन पातळी, प्रतिकूल हवामान, जेट विमानांच्या मर्यादा आणि खाली असलेला समुद्रासारखा बर्फ यांसारख्या आव्हानांना न जुमानता, या शूर सैनिकांनी अचूक लेझर बॉम्बच्या साहाय्याने शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त केली आणि भारताचा विजय निश्चित केला.
 
या मालिकेचे निर्माते, कुशल श्रीवास्तव हे स्वतः हवाई दलात कार्यरत होते, त्यामुळे ही मालिका, त्यातील मोहिमा, आव्हाने, हवाई दलाच्या वैमानिकांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांचे परस्परांशी जुळलेले ऋणानुबंध आणि कार्यपद्धती यांचे वास्तववादी चित्रण वेबसीरिजमध्ये उत्तमरीत्या मांडण्यात आले आहे. तसेच या वेबसीरिजच्या निमित्ताने पाकिस्तानातील सरकार, सैन्य आणि दहशतवाद्यांचा भारतविरोधी खरा चेहराही पुन्हा समोर आणण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. या मालिकेत सगळ्याच पात्रांना योग्य न्याय देण्यात आले आहे. अर्थातच, अजय अहुजाच्या भूमिकेतील सिद्धार्थ त्याच्या हौतात्म्यामुळे आणि धनोआच्या भूमिकेतील जिमी शेरगिल त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि निर्भय नेतृत्वामुळे अधिक प्रभाव पाडून जातात. या दोघांव्यतिरिक्त इतर कलाकारांनाही अभिनयनातून पराक्रम दाखवण्याची समान संधी मिळाली आहे.
 
याचे श्रेय सुसंतुलित पटकथा आणि कलाकारांच्या अभिनयालाही द्यावे लागेल. आदिल हुसेन, विनय पाठक, मनु ऋषी चड्ढा, जिमी शेरगिल, सिद्धार्थ, अभय वर्मा, मिहिर अहुजा आणि अजय अहुजाच्या पत्नीची, अलका अहुजाची भूमिका साकारणारी अमृता बागची, या सर्वांनी मर्यादित ‘स्क्रीन स्पेस’ असूनही उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी आपापल्या पात्रांना जिवंत केलं आहे. दिया मिर्झा आणि प्राजक्ता कोळी यांना फारसा वाव मिळालेला नाही; पण तरीही त्यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. बरुण सोबती, संजय सुरी आणि महेश मांजरेकर यांनी पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत प्रभाव पाडला आहे.
 
अनावश्यक गोंधळ किंवा भडक देशभक्तीऐवजी, खरी रणनीती, तांत्रिक अडचणी आणि वैमानिकांमधील समन्वय यांवर या वेबमालिकेत जास्त भर दिला आहे.
 
काही ठिकाणी युद्धाची गती मंद वाटू शकते; पण त्यातील भावनिक ओढ आणि हवाई लढाईची दृश्ये अचूक समतोल साधतात. ओनी सेन यांचे मालिकेच्या कसदार दिग्दर्शनाबद्दल कौतुक करावे तितके कमीच. सेन यांनी मोठी स्टारकास्ट असलेली ही आव्हानात्मक मालिका यशस्वीपणे हाताळली. हवाई दलाच्या मोहिमेचे अगदी काटेकोर केलेले नियोजन असो वा युद्धमोहिमांसंबंधीचे अन्य बारकावे असो, ही मालिका दाखवून देते की, लढाऊ विमान उडवणे, हे केवळ धाडसाचेच काम नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णयालाही इथे सर्वाधिक महत्त्व. निर्मात्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्षातील प्रसंगांसाठी जुन्या व्हिडिओ फुटेजचा वापर खुबीने केला आहे, ज्यामुळे काही दृश्ये अधिक परिणामकारक वाटतात.
 
त्याचबरोबर तांत्रिक बाबींसाठी सिनेमॅटोग्राफर सत्यजित पांडे कौतुकास पात्र आहेत. पण, ‘व्हीएफएस’ अधिक चांगले आणि परिणामकारक असू शकले असते. त्यात थोड्या त्रुटी जाणवतात. असो. तरीही आपल्या सैनिकांच्या शौर्य आणि देशभक्तीने भरलेली ही वेबमालिका आवर्जून पाहण्यासारखी अशीच. त्यामुळे वेळ काढून आपल्या जवानांची ही शौर्यकथा एकदा आवर्जून बघा! जय हिंद!
 
निर्माता : अभिजीत सिंह परमार आणि कुशल श्रीवास्तव
दिग्दर्शक : ओनी सेन
कलाकार : सिद्धार्थ, जिमी शेरगिल, अभय वर्मा, दीया मिर्जा, प्राजक्ता कोळी, आदिल हुसैन, मिहिर आहूजा, तारुक रैना, अर्नव भसीन, अमृता बागची, विनय पाठक, बरुण सोबती
लेखक : संदीप जैन, बरुण कश्यप, निखिल रवि, अभिजीत सिंह परमार आणि कुशल श्रीवास्तव
रेटिंग :
(कपिल देशपांडे)




संबंधित मजकूर