आर्टिक महासागराच्या रशियाच्या उत्तरेकडील किनार्यालगत जाणारा ‘नॉर्दर्न सी रूट’ आता केवळ भविष्यातील संभाव्य सागरीमार्ग राहिलेला नाही. ऑगस्ट २०२६ मध्ये चीनच्या ‘सी लिजंड’ कंपनीने चीन आणि युरोपदरम्यान या मार्गावर नियमित कंटेनर सेवा सुरू केली. त्यामुळे आर्टिकमधील हा मार्ग आशिया-युरोप कंटेनर व्यापारासाठी प्रत्यक्ष वापरात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
२०२५ मध्ये चीनमधील निंग्बो-झौशान बंदरातून ब्रिटनमधील फेलिस्टोपर्यंत कंटेनर जहाजाने ‘नॉर्दर्न सी रूट’मार्गे सुमारे २० दिवसांत प्रवास केला होता. या चाचणीच्या अनुभवाच्या आधारावर आता नियमित सेवा सुरू करण्यात आली आहे. सुएझ कालव्याच्या तुलनेत आर्टिक मार्गामुळे चीन-युरोप प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शयता आहे. काही अहवालांनुसार, सुएझमार्गे लागणारा ४० दिवसांहून अधिक कालावधी आर्टिक मार्गाने सुमारे १८ दिवसांपर्यंत कमी होऊ शकतो.
मात्र, या मार्गासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते आर्टिकचे बदलते हवामान. समुद्री बर्फाचे प्रमाण आणि हंगामी विस्तार कमी होत असल्याने वर्षातील काहीकाळ जहाजांची हालचाल सुलभ झाली आहे. तरीही, ‘नॉर्दन सी रूट’ वर्षभर बर्फमुक्त आणि सुरक्षित झालेला नाही. बर्फाची स्थिती वर्षानुसार बदलते आणि काही हंगामात जहाजांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियमित कंटेनर सेवेसाठी आवश्यक असलेली वेळेची निश्चितता अद्याप प्रश्नचिन्हाखाली आहे.
कमी अंतर हा या मार्गाचा प्रमुख फायदा असला, तरी व्यावसायिक जहाजांसाठी अंतरापेक्षा विश्वसनीय वेळापत्रक आणि एकूण ऑपरेशनल खर्च अधिक महत्त्वाचे आहेत. आर्टिकमध्ये विशेषतः मजबूत जहाजरचना, प्रशिक्षित कर्मचारी आणि अत्याधुनिक उपकरणांची गरज असते. काही परिस्थितींमध्ये आईसब्रेकरची मदत घ्यावी लागते. मर्यादित बंदरे, दुरुस्ती सुविधा, इंधनपुरवठा आणि आपत्कालीन शोध-बचाव यंत्रणेमुळेही खर्च आणि जोखीम वाढतात. त्यामुळे ‘नॉर्दन सी रूट’ सध्या सुएझ कालव्याचा पूर्ण पर्याय नसून, विशिष्ट हंगामात आणि विशिष्ट मालासाठी उपयुक्त ठरणारा पर्यायी मार्ग आहे.
या मार्गाचा मोठा भाग रशियाच्या आर्टिक किनारपट्टीजवळून जात असल्याने मॉस्कोचा प्रभाव निर्णायक आहे. नौवहन परवानग्या, मार्गदर्शक सेवा, आईसब्रेकर आणि इतर पायाभूत सुविधांसाठी रशियावर अवलंबित्व राहते. त्यामुळे ‘नॉर्दन सी रूट’ हा केवळ व्यापारीमार्ग नसून, भू-राजकीय आणि रणनीतिक साधनही बनत आहे. चीनसाठी रशियासोबतचे सहकार्य युरोपशी जोडणारा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देते आणि ‘पोलर सिल्क रोड’ संकल्पनेला व्यावसायिक आधार देते.
भारतासाठीही या मार्गाचे महत्त्व वाढत आहे. भारत-रशिया व्यापार आणि ऊर्जा वाहतुकीसाठी ‘नॉर्दन सी रूट’ भविष्यात पर्यायी लॉजिस्टिक मार्ग ठरू शकतो. भारत २०२७ मध्ये या मार्गावरून पहिल्या कार्गो जहाजाच्या प्रवासाची तयारी करत आहे. रशियाच्या आर्टिक प्रदेशातील ‘अर्खांगेल्स्क’सोबतच्या चर्चांमुळे हा पर्याय पुढे आला आहे. हा प्रवास भारतासाठी केवळ व्यापाराचा प्रयोग नसून, आर्टिक ‘कनेटिव्हिटी’ची महत्त्वाची चाचणी ठरू शकतो.
२०२६ मधील चीनची नियमित सेवा आणि भारताची २०२७ साठीची तयारी ‘नॉर्दन सी रूट’च्या भवितव्यासाठी महत्त्वाची आहेत. पुढील दशकात बर्फाची स्थिती, विमा खर्च, आईसब्रेकरची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि रशियन नियंत्रण यावर या मार्गाची व्यावसायिक क्षमता ठरणार आहे. म्हणूनच, ‘नॉर्दन सी रूट’चा खरा प्रश्न ‘सुएझला तोड देईल का?’ हा नाही, तर ‘तो किती विश्वासार्ह, नियमित आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य जागतिक सागरीमार्ग बनू शकेल?’ हा आहे. आर्टिकचा हा मार्ग आता प्रयोगाच्या टप्प्यातून जागतिक व्यापाराच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गालाही जलवाहतुकीत एक वेगळे प्राप्त निश्चितच प्राप्त झालेले दिसेल, याबाबत शंका नाही.