मुंबई : (Road Safety Board) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करून प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. नवी दिल्लीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुख्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गांवरील विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित रस्ते अभियांत्रिकी आणि आपत्कालीन मदत यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर चर्चा झाली. (Road Safety Board)
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉ. नितीन आर. गोकरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, विविध राज्य प्रशासनांचे अधिकारी तसेच रस्ता सुरक्षा तज्ज्ञ उपस्थित होते. (Road Safety Board)
अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष
राष्ट्रीय महामार्गांवरील धोकादायक आणि अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. देशातील अपघातप्रवण अशा टॉप-१० ठिकाणांची स्वतंत्रपणे ओळख करून तेथे आवश्यक सुरक्षा उपाय करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रस्त्यांची रचना, वाहतूक व्यवस्था, वेग नियंत्रण, रस्ता सुरक्षा ऑडिट आणि महामार्गांच्या सुरक्षित अभियांत्रिकी पद्धतींचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी महामार्गांचे नियोजन आणि संचालन अधिक सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला. (Road Safety Board)
AI आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर
रस्ता सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावरही चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, भविष्यसूचक AI उपाय आणि रुग्णवाहिकांसाठी डिजिटल मॅपिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे अपघात घडल्यानंतर मदत पोहोचविण्याचा वेळ कमी करण्यास तसेच आपत्कालीन सेवांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे. (Road Safety Board)
टोल कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण
अपघातग्रस्तांना सुरुवातीच्या काही मिनिटांत मिळणारी मदत जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. टोल प्लाझावर प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. (Road Safety Board)
‘सेफ सिस्टम’ दृष्टिकोनावर भर
रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी केवळ वाहनचालकांवर जबाबदारी न टाकता रस्ते, वाहतूक व्यवस्था, वाहने, तंत्रज्ञान आणि आपत्कालीन सेवांचा एकत्रित विचार करण्याच्या ‘सेफ सिस्टम’ दृष्टिकोनावर भर देण्यात आला. जोखीम ओळख, सुरक्षित रस्ते अभियांत्रिकी, सुरक्षित महामार्ग संचालन, व्यावसायिक वाहनांची सुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद, डिजिटल सुरक्षा व्यवस्थापन आणि संस्थात्मक जबाबदारी या प्रमुख क्षेत्रांवर पुढील काळात काम केले जाणार आहे. (Road Safety Board)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयांनी राज्य प्रशासनांसोबत अधिक समन्वयाने काम करून रस्ता सुरक्षा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ यांच्यात भविष्यात नियमित आढावा बैठका घेऊन राष्ट्रीय महामार्गांवरील सुरक्षा उपाय अधिक मजबूत करण्यावर सहमती झाली. थोडक्यात, महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी ‘अपघात झाल्यानंतर मदत’ यासोबतच ‘अपघात होऊच नये’ यावर अधिक भर देण्याची दिशा या बैठकीत निश्चित करण्यात आली. (Road Safety Board)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.